जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, आवडी-निवडी वेगळ्या असतात, आयुष्याचा कालावधी कमी-जास्त असतो, आयुष्यात उपभोगली जाणारी सुख-दु:खे वेगवेगळी असतात. प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे का असते याचा विचार केल्यास त्यामागे काही ना काही कारण असावे असे अनुमान निश्चितपणे करता येते; कारण सृष्टीत सर्वत्र कार्यकारण संबंध दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे असण्याचे कारण म्हणजे त्या त्या जीवाने केलेली कर्मे होय असा निष्कर्ष काढता येतो. कर्म केल्यामुळे त्याचे फळ जीवाला मिळते, हा कर्माचा सिद्धांत (चार्वाक व्यतिरिक्त) सर्व भारतीय दर्शनांनी स्वीकारलेला आहे. बौद्ध आणि जैन या नास्तिक दर्शनांमध्येही हा सिद्धांत स्वीकारला आहे.

याच सिद्धांतानुसार कोणतेही कर्म केल्यावर कर्म करणाऱ्या जीवाला त्याचे फळ मिळते, त्याला विपाक असे म्हणतात. सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचा बोधक आहे. मुख्यत: जी क्रिया करायची आहे, त्याविषयीचा विचार आणि कर्म हे चित्ताद्वारेच होत असते. शरीर हे चित्ताने दिलेल्या सूचनेनुसार केवळ क्रिया अमलात आणण्याचे काम करते. त्यामुळे चित्त कर्म करते, चित्तामध्येच त्याचे संस्कार उत्पन्न होतात आणि त्या कर्माचा विपाकही चित्ताद्वारेच अनुभवाला येतो.

योगशास्त्रानुसार जर कर्म अविद्या, अस्मिता, राग, द्वेष किंवा अभिनिवेश यापैकी कोणत्याही एका क्लेशाने प्रभावित असेल, तरच त्या कर्माचा विपाक होतो; अन्यथा नाही (योगसूत्र २.१२). कर्म करताना जर ते (१) ज्ञानपूर्वक (२) अहंकाररहित (३) आसक्तिरहित निष्काम भावनेने (४) द्वेषरहित व (५) भयरहित असेल, म्हणजेच क्रमश: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष किंवा अभिनिवेश याशिवाय केलेले असेल, तर कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्याचा विपाक प्राप्त होत नाही. निष्काम भावनेने कर्म केल्यास जीव कर्मबंधनातून मुक्त होतो, हे भगवद्गीतेमध्ये याच अनुषंगाने म्हटले आहे.

काही कर्मांचे फळ त्वरित मिळते, तर काही कर्मांचे फळ उशिराने मिळते. ज्या कर्माचे फळ त्वरित मिळत नाही, असे कर्म केल्यानंतर चित्तामध्ये एक संस्कार उत्पन्न होतो. एखाद्या कर्माचा विशिष्ट विपाक मिळण्यासाठी अनुकूल देश (जागा), काल (वेळ), निमित्त (परिस्थिती) असावे लागतात. जेव्हा विपाक मिळण्यासाठी अनुकूल जागा, वेळ आणि परिस्थिती प्राप्त होते, तेव्हा चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने स्थित असणारे कर्माचे संस्कार जीवाला त्या विशिष्ट कर्माचा विपाक देतात. जर विपाक मिळण्यासाठी अनुकूल देश, काल आणि निमित्त यांची प्राप्ती वर्तमान जन्मात झाली नाही, तर कधी कधी कर्मांचे फळ वर्तमान जन्मात न मिळता पुढच्या जन्मातही मिळते. एका जन्मात केल्या जाणाऱ्या ज्या कर्मांचे फळ त्या जन्मामध्ये मिळालेले नाही, अशा सर्व कर्मांचे संस्कार (कर्माशय) समूहरूपाने त्या जीवाचा पुढचा जन्म कोणता असेल हे ठरवितात, पुढील जन्मामधील त्याच्या आयुष्याचा कालावधी किती असेल हे ठरवितात आणि त्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा भोग त्या जीवाला उपभोगायचा आहे हे ठरवितात. अर्थातच कर्मांचा विपाक पुढील तीन वेगवेगळ्या रूपात प्राप्त होऊ शकतो –

(१) जाति (जन्म) : जीवाला मनुष्य जन्म मिळणार आहे की पशू, पक्षी किंवा वनस्पतीचा जन्म मिळणार आहे, हे जीव स्वत: निवडू शकत नाही. कारण निवड करण्याचे स्वातंत्र्य जीवाकडे असते, तर सर्वच जीवांनी उत्तमोत्तम जन्मांचीच निवड केली असती. जीवाने ज्या प्रकारचे कर्म केले आहे, त्यावरून त्याला कोणता जन्म मिळणार हे ठरते. मनुष्य जन्म जरी मिळाला तरी तो जन्म सुखकारक असेलच असे नाही; तसेच पशू जन्म मिळाला तरी तो दु:खदायक असेलच असेही नाही. ज्या ज्या प्रकारचे भोग जीवाला भोगायचे आहे, त्याच्या अनुषंगाने त्या जीवाला भौतिक शरीराची प्राप्ती होते.

(२) आयु (आयुष्याचा कालावधी) : जीवाला मिळणाऱ्या आयुष्याचा कालावधीही जीवाचे कर्मच ठरविते. काही जीव जन्माला येताच मृत्यू पावतात व काही जीव दीर्घ आयुष्य प्राप्त करतात. जर जीव जन्माला येताच काही कारणाने मृत होत असेल तर हा केवळ अपघात आहे असे म्हणता येत नाही. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी कारण असतेच हा नियम निसर्गामध्ये दिसून येतो. त्यामुळे जीवाचे आयुष्यही त्याच्या कर्मांमुळेच ठरते.

(३) भोग : आयुष्यात येणारे अनुकूल व प्रतिकूल अनुभव व त्यानिमित्ताने होणारा सुख-दु:ख यांचा अनुभव यांसाठी कारणही त्या जीवाची कर्मेच आहेत. (योगसूत्र २.१३).

कर्मांद्वारे प्राप्त होणारा विपाक हा दोन प्रकारचा असू शकतो – (१) नियत-विपाक आणि (२) अनियत-विपाक. जी कर्मे अतिशय तीव्र भावनेने केली जातात, त्या कर्मांचे फळ निश्चित रूपाने अनुभवावेच लागते व त्याला टाळता येत नाही. अशा प्रकारच्या विपाकाला नियत-विपाक असे म्हणतात. कोणत्याही तीव्र भावनेने म्हणजे तीव्र आसक्तीने, क्रोधाने, भयाने, प्रेमाने, श्रद्धेने केलेले कर्म निश्चितरूपाने फळ देते. याउलट जे कर्म मृदु-भावनेने केले जाते, अशा कर्माचा विपाक म्हणजे अनियत-विपाक होय. जे कर्म खूप तीव्रतेने केले जात नाही, तर सौम्यपणे केले जाते, अशा मृदु-भावनेने केलेल्या कर्माचे फळ टाळताही येऊ शकते. अशा अनियत विपाक असणाऱ्या कर्मांची परिणती तीन प्रकारे होऊ शकते – (i) प्रायश्चित्त कर्म केल्यामुळे पूर्वी केलेले मृदु-पापकर्म फळ न देताच नष्ट होते. (ii) कर्माचे फळ स्वतंत्रपणे मिळत नाही, तर अन्य कोणत्या तरी प्रधान कर्माच्या जोडीने या मृदु-कर्माचे फळ मिळते. अन्य प्रधान कर्माच्या अनुषंगाने फळ मिळाल्यामुळे मृदु-कर्माच्या विपाकाची तीव्रता तेवढी अनुभवाला येत नाही, जेवढी स्वतंत्रपणे विपाक मिळाल्यास अनुभवाला आली असती. (iii) चित्तामध्ये असणारा कर्माचा संस्कार योग्य देश, काल, निमित्त प्राप्त झाल्यावर विपाक देतो. जर योग्य देश, काल, निमित्त यांची प्राप्ती झालीच नाही आणि साधनेद्वारे योग्याला विवेकख्यातीचे ज्ञान प्राप्त झाले, तर विवेकख्यातीमध्ये प्राप्त होणाऱ्या ऋतंभरा प्रज्ञेमुळे उत्पन्न होणारे संस्कार चित्तातील कर्माच्या संस्कारांना प्रतिबंध उत्पन्न करतात, त्यामुळे त्यांचे फळ कधीच मिळत नाही.

या कर्म-सिद्धांतानुसार प्रत्येक जीव कर्मे करतो, त्याचा सुख-दु:खरूप विपाक अनुभवतो. पुन्हा त्या सुखाचा अनुभव चित्तामध्ये आसक्ती व दु:खाचा अनुभव चित्तामध्ये द्वेष उत्पन्न करतो. राग-द्वेषामुळे पुन्हा जीव नवीन कर्म करण्यास उद्युक्त होतो व पुन्हा नवीन कर्मचक्र चालू होते. याप्रमाणे अविरत कर्म आणि त्याच्या विपाकामुळे उत्पन्न होणाऱ्या बंधनात जन्मानुजन्मे जीव अडकतो. अंतिमत: विवेकख्यातीचे ज्ञान प्राप्त झाल्यावर चित्तातील अविद्या आणि अन्य क्लेश नष्ट झाल्यावर योगी निष्काम भावनेने अशुक्ल-अकृष्ण (पुण्य-पाप-रहित) कर्म करीत राहतो व क्रमश: चित्ताच्या वृत्तींचा संपूर्ण निरोध झाल्यावर योगी कैवल्य अवस्था प्राप्त करतो.

पहा : विवेकख्याति.

                                                                                                                                                                                                समीक्षक : कला आचार्य