बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यत: आकलन-क्षमता असा समजला जातो; परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे ‘निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन’ होय. पाच ज्ञानेंद्रियांद्वारे बाह्य वस्तूंचे ज्ञान होते, त्यामुळे त्यांना बाह्येंद्रिये किंवा बाह्य-करण असे म्हणतात; तर मन, अहंकार व बुद्धी यांद्वारे बाह्य तसेच सुख-दु:ख इत्यादी आभ्यंतर विषयांचेही ज्ञान होते, म्हणून या तिघांना अंतरिंद्रिये किंवा अंत:करण म्हणतात. बुद्धी ही अंत:करणातील तीन घटकांपैकी सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याने तिला महत्-तत्त्व किंवा महान् असेही म्हणतात.
बुद्धी ही प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यामुळे प्रकृतीमध्ये असणारे सत्त्व, रज व तम हे तीन गुण बुद्धीमध्येही दिसून येतात. परंतु, बुद्धीमध्ये हे तीन गुण समान प्रमाणात राहत नाहीत. कधी सत्त्व, कधी रज तर कधी तम प्रबळ राहून अन्य दोन गुण दबलेल्या अवस्थेत राहतात. त्रिगुणांमधील वेगवेगळ्या प्रमाणामुळे बुद्धी या अंत:करणाची आठ वेगवेगळी रूपे दिसून येतात, त्यांनाच बुद्धीचे आठ भाव असे म्हटले आहे. ते आठ भाव पुढीलप्रमाणे आहेत – धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, वैराग्य, राग, ऐश्वर्य आणि अनैश्वर्य. बुद्धीमध्ये सत्त्वगुणाच्या प्रभावामुळे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे चार भाव अभिव्यक्त होतात, तर तमोगुणाच्या प्रभावामुळे अधर्म, अज्ञान, राग आणि अनैश्वर्य हे चार भाव अभिव्यक्त होतात. या सर्व भावांच्या प्रकटीकरणासाठी रजोगुणाचे साहाय्य लागते.
(१) धर्म व अधर्म : जीवाने कोणत्याही प्रकारचे कर्म केल्यानंतर त्या कर्माचे सूक्ष्म संस्कार बुद्धीमध्ये जमा होतात. त्या संस्कारांनाच धर्म आणि अधर्म अशी संज्ञा आहे. चांगल्या कर्मांद्वारे उत्पन्न होणारे संस्कार म्हणजे धर्म आणि वाईट कर्मांद्वारे उत्पन्न होणारे संस्कार म्हणजे अधर्म होय. बुद्धीमध्ये असणाऱ्या या धर्म-अधर्मरूपी सूक्ष्म संस्कारांमुळेच जीवाला केलेल्या कर्माचे फळ कालांतराने अनुभवावे लागते. अधर्म म्हणजे धर्माचा ‘अभाव’ नसून अधर्म हा सुद्धा एक ‘भाव’ पदार्थ आहे. तसेच, धर्मरूप संस्कारांमुळे बुद्धीतील अधर्मरूप संस्कारांचा नाश होत नाही व अधर्मरूप संस्कारांमुळेही धर्मरूप संस्कारांचा नाश होत नाही. कर्म करणाऱ्या जीवाला धर्म आणि अधर्म हे दोन्हीही संस्कार स्वतंत्रपणे फळ देतात. सर्वसामान्य जीवाला स्वत:च्या बुद्धीमध्ये असणाऱ्या धर्म आणि अधर्म यांचे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे होत नाही, तर ते अनुमानाद्वारे होते.
(२) ज्ञान व अज्ञान : ज्ञान म्हणजे एखादी वस्तू जशी आहे तशी यथार्थ रूपाने जाणणे व अज्ञान म्हणजे वस्तू आहे त्यापेक्षा विपरीत रूपाने ज्ञान होणे. अर्थात् अज्ञान हा ज्ञानाचा अभाव नसून तेही एक प्रकारचे ज्ञानच आहे. फक्त ते ज्ञान वस्तूच्या यथार्थ रूपाविषयी नसून त्यापेक्षा वेगळे असे भ्रांतियुक्त ज्ञान आहे. उदा., शिंपले हे शिंपले आहे असे ज्ञान होणे हे यथार्थ ज्ञान होय. शिंपल्याचे ज्ञान ‘ही चांदी आहे’ असे होणे हे अयथार्थ ज्ञान होय, यालाच अज्ञान असे म्हणतात.
(३) वैराग्य व राग : एखाद्या वस्तूचा अनुभव अंत:करणात सुख उत्पन्न करतो, तेव्हा त्या अनुभवानंतर त्या सुखकारक वस्तूचा पुन्हा पुन्हा अनुभव घेण्याची आसक्ती बुद्धीमध्ये उत्पन्न होते, त्या आसक्तीलाच ‘राग’ असे म्हणतात. राग हा सुखानंतर उत्पन्न झालेला असला, तरीही राग स्वत: दु:ख उत्पन्न करतो. कारण सुखकारक वस्तूचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याची इच्छा नेहमी पूर्ण होईलच असे नाही. वस्तूचा पुन्हा उपभोग नाही मिळाला तरीही दु:ख उत्पन्न होते व उपभोग मिळाला तरीही आसक्ती अधिक दृढ होत जाते व त्यामुळेही दु:ख उत्पन्न होते. बुद्धीमधील सुखकारक वस्तूंविषयी असणारी आसक्ती नष्ट झाली की, त्याच भावाला विराग किंवा वैराग्य असे म्हणतात. रागाचा अभाव म्हणजे वैराग्य होय.
(४) ऐश्वर्य व अनैश्वर्य : बुद्धीमध्ये असणाऱ्या आठ सिद्धी म्हणजे ऐश्वर्य होय. आठ ऐश्वर्य पुढीलप्रमाणे आहेत – (१) अणिमा : शरीर अणुप्रमाणे छोटे करण्याचे सामर्थ्य; (२) महिमा : शरीराचा आकार मोठा करण्याचे सामर्थ्य; (३) लघिमा : शरीर कापसाप्रमाणे हलके बनवण्याचे सामर्थ्य; (४) गरिमा : शरीर वजनदार बनवण्याचे सामर्थ्य; (५) प्राप्ति : क्रिया न करताही क्रियेचे फळ प्राप्त करण्याचे सामर्थ्य; (६) प्राकाम्य : सर्व इच्छा पूर्ण होण्याचे सामर्थ्य; (७) वशित्व : पंच महाभूते व अन्य भौतिक जीव यांवर नियंत्रण मिळविण्याचे सामर्थ्य व (८) ईशित्व : महाभूते व अन्य जीव यांची उत्पत्ती, स्थिती व विनाश करण्याचे सामर्थ्य. विशिष्ट प्रकारच्या साधना केल्यानंतर बुद्धीतील ही आठ ऐश्वर्ये अभिव्यक्त होतात. या आठ ऐश्वर्यांचा अभाव म्हणजे अनैश्वर्य होय.
बुद्धीतील धर्माच्या आधिक्यामुळे पुढील जन्म उत्तमोत्तम योनींमध्ये प्राप्त होतो, तर अधर्माच्या आधिक्याने अधम योनींमध्ये प्राप्त होतो. ज्ञानाचे आधिक्य झाल्यास विवेकख्यातीद्वारे कैवल्य प्राप्ती होते, तर अज्ञानामुळे जीव अधिकाधिक बंधनात अडकतो. रागाच्या आधिक्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र चालू राहते व ज्ञानरहित वैराग्यामुळे जीवाचा प्रकृतीमध्ये लय होतो. ऐश्वर्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात, परंतु अनैश्वर्यामुळे इच्छांची पूर्ती होत नाही. अशाप्रकारे बुद्धीमध्ये असणाऱ्या या आठ भावांचे वर्णन सांख्य दर्शनाने केलेले आहे.
पहा : अविद्या, कैवल्य, राग, विवेकख्याति, वैराग्य, प्रकृतिलय.
समीक्षक : कला आचार्य