डार्ट, रेमंड अस्थुर (Dart, Raymond Asthur) : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८). ऑस्ट्रेलियन वंशाचे प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन मानवशास्त्रज्ञ, जंतुशास्त्रज्ञ व शरीरशास्त्रज्ञ. डार्ट यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील तूवाँग (ब्रिस्बेन) येथे एका शेतकरी व धार्मिक कुटुंबात झाला. डार्ट यांचे सुरुवातीचे शिक्षण इप्सविच ग्रामर स्कूल येथे, तर इ. स. १९११ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड येथून त्यांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. विद्यापीठात त्यांना उत्क्रांती सिद्धान्ताचा सामना करावा लागला; परंतु त्यामधूनच त्यांना प्राणिशास्त्र या विषयाबद्दल आवड निर्माण होऊन इ. स. १९१३ मध्ये पदवी संपादन केली आणि इ. स. १९१५ मध्ये एम. एस. ही पदवी मिळविली. तत्पूर्वी त्यांनी इ. स. १९१४ मध्ये सेंट अँड्रुज कॉलेजमध्ये जीवशास्त्र विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. नंतर सिडनी युनिव्हर्सिटी मेडिकल सोसायटीचे ते सचिव झाले. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले. इ. स. १९१० ते इ. स. १०२३ या काळात आफ्रिकेच्या जोहॅनिसबर्ग येथील विटवॉटर्सरँड विद्यापीठात शरीरशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि इ. स. १९२२ मध्ये तेथेच ते विभागप्रमुख झाले. इ. स. १९२५ ते इ. स. १९४३ या काळात ते अधिष्ठाता, तर १९५८ पर्यंत तेथेच ते संचालक म्हणून कार्यरत होते.
डार्ट यांचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याशिवाय विविध संशोधन आणि उत्खनन कार्यात वाटा होता. इ. स. १९२४ मध्ये आफ्रिकेतील टाँग येथील चुनखडीच्या खडकात त्यांना एक कवटीचा भाग मिळाला, जो आजही एक महत्त्वाचा अवषेश मानला जातो. कवटीचा तो भाग ऑस्ट्रेलोपिथेसीनचा एक महत्त्वाचा अवषेश प्रथमच मिळाला होता. डार्ट यांनी त्याचे ‘ऑस्ट्रेलोपिथिकस आफ्रिकॅनस’ असे नामकरण केले. यालाच ‘सदर्न एप ऑफ आफ्रिका’ असे म्हणतात. ही कवटी एका तान्ह्या बाळाची असल्याने त्याला ‘टाँग चाइल्ड’ असेही म्हटले जाते.
इसवी सन १९२५ च्या नेचर जर्नलमधील संशोधन निबंधात हा अवषेश म्हणजे एप किंवा कपी आणि मानव यांच्यामधील एक हरवलेला दुवाच असावा, असे त्यांनी म्हटले. मानवासारखे दात, शरीराची उभी अवस्था ही मानवासारखी लक्षणे, तर आकारमानाने कमी क्षमतेचे डोके हे कपी वर्गाचे लक्षण असल्यामुळे कपी आणि मानव यांच्यामधील दुवा, असे त्यांनी या अवषेशाचे वर्णन केले. त्यांच्या या मताला ऑर्थर किथ आणि स्मिथ वुडवर्ड यांनी विरोध केला होता. त्यानंतर ट्रान्सव्हाल येथील उत्खननातील अवषेश पाहून रॉबर्ट ब्रूम यांनी डार्ट यांच्या निष्कर्षाला मान्यता दिली होती. इ. स. १९४० मधील मकापांस्गाट येथील उत्खनन डार्ट यांच्या देखरेखीखाली झाले होते. वयाच्या ७० वर्षांनंतर लहान मुलांच्या मेंदुविषयक समस्यांवर काम करणाऱ्या इंन्स्टिट्यूट फॉर अचिव्हमेंट ऑफ ह्यूमन पोटेंशिअल या संस्थेमध्ये त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या कार्याशिवाय ते आपल्या ‘किलर एप थिअरी’साठी प्रसिद्ध आहेत.
डार्ट यांचे १९५९ मध्ये ॲडव्हेंचर्स विथ द मिसिंग लिंक हे आत्मचरीत्र प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी पुड्वोकिन्स लिंक्स अँड थिअरी (१९७६), स्किल अंड पॉइज (१९९६), ओल्डुवाइ जॉर्ज (२००९), थ्रो माय आईज (२०२०) या ग्रंथांचे लेखन केले आहे. डार्ट यांना १९५७ मध्ये व्हायकिंग फंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ ‘स्टडी ऑफ मॅनकाइंड इन आफ्रिका’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
डार्ट यांचे दक्षिण आफ्रिकेतील जोहॅनिसबर्ग येथे निधन झाले.
संदर्भ :
- Dart, Raymond A., Adventures With Missing Link, New York, 1959.
- Fagan, Brian, The Passion of Raymond Dart Archaeology, Vol. 42, 1989.
- Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.
समिक्षक : सुभाष वाळिंबे