टेलर, टॉमस ग्रिफिथ (Taylor, Thomas Griffith) : (१ डिसेंबर १८५० – ५ नोव्हेंबर १९६३). ब्रिटिश भूगोलज्ञ, मानवशास्त्रज्ञ आणि समन्वेषक. टॉमस यांचा जन्म इंग्लंडमधील एसिक्स परगण्यातील वॉल्थमस्टो शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जेम्स टेलर व आईचे नाव लिली अ‍ॅग्नेस नी ग्रिफिथ असे होते. वडील धातुशास्त्रीय रसायनज्ञ होते. टॉमसच्या जन्मानंतर एका वर्षभरातच नोकरीनिमित्ताने त्यांचे कुटुंब सर्बियाला स्थलांतरित झाले. तेथे त्यांचे वडील तांब्याच्या खाणीत मॅनेजर होते. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांचे कुटुंब पुन्हा ब्रिटनला, तर इ. स. १८९३ मध्ये ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याची राजधानी असलेल्या सिडनी येथे स्थलांतरित झाले. टेलर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सिडनी येथे झाले. इ. स. १९०५ मध्ये त्यांनी सिडनी विद्यापीठातून खाणकाम व धातुकर्म विषयातील बी. ई. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी भूशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांत शास्त्रशाखेची पदवी, तर केंब्रिज येथील इमॅन्यूएल कॉलेजमधून संशोधनातील बी. ए. ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीला प्रयोगनिर्देशक म्हणून नोकरी करीत असताना टेलर यांना इ. स. १९०७ मध्ये ‘१८५१ एक्झिबिशन स्कॉलरशिप’ ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची इ. स. १९०९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीचे ते सन्मान्य सदस्य म्हणून निवडून आले.

ब्रिटिश समन्वेषक रॉबर्ट फॉल्कन स्कॉट यांनी इ. स. १९११ ते इ. स. १९१३ या कालावधीत दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी टेरा नोव्हा (ब्रिटिश अंटार्क्टिका) या अंटार्क्टिका मोहिमेचे आयोजन केले होते. त्या मोहिमेसाठी त्यांनी टेरा नोव्हा हे जहाज वापरले होते. स्कॉट यांनी या मोहिमेसाठी एक वरिष्ठ भूशास्त्रज्ञ म्हणून टेलर यांची नियुक्ती केली. अंटार्क्टिकावरील हवेच्या परिस्थितीचा ऑस्ट्रेलियाच्या हवामानावर होणाऱ्या परिणामाची टेलर यांना माहिती असल्यामुळे स्कॉट यांनी या मोहिमेत हवाविषयक सेवा प्रतिनिधीची जबाबदारी, तसेच अंटार्क्टिकावरील महत्त्वाच्या प्रदेशांचे नकाशे तयार करून त्यांचे विश्लेषण करण्याची जबाबदारी टेलर यांच्यावर सोपविली होती. टेलर यांचे केंब्रिजमधील काही सहकारी मित्रही या मोहिमेत त्यांच्याबरोबर होते. दक्षिण ध्रुवावर सर्वांत प्रथम आपणच पोहोचायचे, असा निश्चय स्कॉट यांनी केला होता; परंतु त्यांच्या आधीच पाच आठवडे नॉर्वेजियन समन्वेषक रोआल आमुनसेन हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले असल्याचे समजले. त्यामुळे स्कॉट यांचा अपेक्षाभंग झाला. आमुनसेन यांनी दक्षिण ध्रुवावर ठेवलेला तंबू, तसेच त्यांनी तेथे पोहोचलो असल्याच्या आशयाचा ठेवलेला संदेश यांचा शोध घेण्यासाठी जानेवारी १९१२ मध्ये स्कॉट यांची मोहीम दक्षिण ध्रुवावर पोहोचली होती. परतीच्या प्रवासात असताना अत्यंत खराब हवामानामुळे मार्च १९१२ मध्ये स्कॉट यांच्यासह त्यांच्या पाच व्यक्तिंचा संपूर्ण गटच मृत्यू पावला. मार्च १९१२ मध्येच टेलर यांचाही गट परतीच्या प्रवासास निघाला. या सफरीत त्यांनी तेथील अनेक भूशास्त्रीय नमुने गोळा केले. तसेच तेथील रॉस समुद्राचा फाटा असलेल्या मकमर्दो साउंडच्या सभोवतालच्या प्रदेशाची भूपृष्ठरचना व हिमावरणाचा सखोल अभ्यास केला होता. इ. स. १९१३ च्या अखेरीस किंग्ज पोलर हा पुरस्कार देऊन टेलर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लंडनच्या रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने त्यांना सन्मान्य सदस्य करून घेतले.

इंग्लंडमध्ये अंटार्क्टिका मोहिमेचे निष्कर्ष लिहिल्यानंतर टेलर यांनी पुढील दहा वर्षे मेलबर्न येथे हवामानविषयक संशोधनात स्वत:ला वाहून घेतले. टेलर यांनी अंटार्क्टिका खंडाची भूपृष्ठरचना व भू-आकृतिविज्ञानविषयक केलेल्या संशोधनामुळे सिडनी विद्यापीठाने इ. स. १९१६ मध्ये त्यांना डॉक्टरेट (डी. एससी.) ही पदवी प्रदान केली. वरिष्ठ हवामान संशोधक पदावर काम करीत असताना ऑस्ट्रेलियाची हवामान परिस्थिती, हवामानाच्या घटकांचे शेती आणि वस्त्यांवर होणारे परिणाम यांवर त्यांनी मोठे लेखन केले आहे. राष्ट्रीय संसाधनांच्या वितरणाचा नकाशा तयार करण्यासाठी त्यांनी स्वत: इ. स. १९१९ मध्ये ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संशोधन परिषदेवर संस्थापक सदस्य पदावर कार्य केले. सिडनी विद्यापीठात इ. स. १९२१ मध्ये टेलर यांची भूगोलाचे सहयोगी प्राध्यापक आणि भूगोलशास्त्र विभागाचे संस्थापक विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील कृषी संसाधने मर्यादित असल्यामुळे, तसेच पर्यावरणीय व इतर घटकांमुळे ऑस्ट्रेलियन लोकसंख्येच्या गरजा नीट भागू शकणार नाहीत, म्हणून त्या वेळी ऑस्ट्रेलियात फक्त श्वेतवर्णीयांनाच स्थलांतर करण्याची परवानगी होती. टेलर यांना ऑस्ट्रेलिया सरकारचे श्वेतवर्णीयांविषयीचे हे धोरण अजिबात मान्य नव्हते. टेलर यांनी आपल्या या विचारसरणीनुसार शाळेसाठी लिहिलेल्या पाठ्यपुस्तकावर पश्चिम ऑस्ट्रेलियन शिक्षण विभागाने बंदी घातली. ऑस्ट्रेलियाच्या भविष्यकालीन विकासावरील टेलर यांच्या विचारांवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली. टेलर हे पर्यावरणीय निसर्गवाद (अशक्यतावाद/नियतिवाद) या विचारांचे समर्थक होते. त्यांच्या मते, नैसर्गिक पर्यावरणानुसार सांस्कृतिक पर्यावरण ठरते. ऑस्ट्रेलियातील प्रभावी पर्यावरणीय घटकांमुळे लोकसंख्या मर्यादित राहील, असे टेलर यांचे मत होते. टेलर यांनी ‘नव-निसर्गवाद’ किंवा ‘थांबा व जा निसर्गवाद’ (स्टॉप अ‍ॅन्ड गो डिटरमिनिझम) ही संकल्पना मांडली. त्यांनी मानव आणि निसर्गाची तुलना शहरातील वाहतूक नियंत्रक संकेतांशी केलेली आहे. टेलर यांच्या मते, वेगवेगळ्या नव्या कल्पना आणि कार्यांनुसार मानव निसर्गात बदल करू शकेल; परंतु त्यावर निसर्गाच्या मर्यादा असतील. जेव्हा निसर्ग प्रतिकूल असेल, तेव्हा मानवाने निसर्ग अनुकूल होईपर्यंत थांबले पाहिजे; अन्यत: निसर्ग मानवाला थांबण्यास भाग पाडेल किंवा नुकसान करेल. इ. स. १९२३ मध्ये अमेरिकन जिऑग्राफिकल सोसायटीने लिव्हिंग्स्टन शताब्दी सुवर्णपदक देऊन टेलर यांना सन्मानित केले. इ. स. १९२७ मध्ये जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ न्यू साउथ वेल्स या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. तसेच ऑस्ट्रेलियन जिऑग्राफरचे साहाय्य्क संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

टेलर यांनी वांशिक उत्क्रांतीवर किंवा जडनघडणीवर पर्यावरणाचे होणारे परिणाम तसेच संस्कृतीच्या स्थलांतराविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी १९३७ मध्ये लंडन येथे लिहिलेल्या एन्व्हायर्नमेंट, रेस अँड मायग्रेशन या पुस्तकामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित झाले. या पुस्तकात वांशिक उत्पत्ती, वितरण आणि स्थलांतर यांवर मांडलेल्या सिद्धांताकडे भूगोलशास्त्रज्ञांबरोबरच इतर अभ्यासकही आकर्षित झाले. हे पुस्तक मानवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले असून त्याची चिनी आणि जपानी भाषांतरे झाली आहेत. टेलर यांच्या मते, अनेक सिद्धांतांच्या अभ्यासावरून, तसेच पुरातनकालीन वस्तूंवरून असे आढळते की, आफ्रिकेमध्ये वांशिक उत्क्रांतीला सुरुवात होऊन तेथून तिचा जगभर सकारात्मक विस्तार झाल्याचे आढळून येते. हा विचार प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकापासून होऊ लागल्याचे ते म्हणतात. अ‍ॅल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांच्या खंडविप्लव (खंडवहन) सिद्धांताशी टेलर सहमत नव्हते. त्यांच्या मते, मानवी वंश व संस्कृतीचे स्थलांतर वेगवेगळ्या कालानुरूप उघडपणे आणि स्वतंत्रपणे झालेले आढळते. महत्त्वाचे म्हणजे भूपट्ट सांरचनिकी सिद्धांताचे ज्ञान पुढे येण्यापूर्वी त्यांनी हे लेखन केलेले आहे. त्यांनी मानवी त्वचेच्या वर्णाचा संबंध तापमानाशी जोडलेला आहे. त्यांच्या मते, भूगोल हे प्राकृतिक जग आणि मानवजातिची उत्कांती व विस्तार यांचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे. मानवशास्त्रामध्ये त्यांनी मानवाच्या केसांची संरचना, ठेवण आणि आकार; कान, नाक आणि डोक्याचा आकार; त्वचेचा रंग, मानवाची उंची, भिन्न वांशिक गटांदरम्यानचे लैंगिक आकर्षण इत्यादी घटकांचा अभ्यास केला आणि हे घटक पर्यावरणाशी निगडित असल्याचे सांगितले. अतिनूतनोत्तर काळातील हिमावरणाच्या विस्तारामुळे जगात चार मोठी स्थलांतरे झाली. स्थलांतरित जेथे गेले तेथील पर्यावरणात ते लोक रूळले. टेलर यांचे भूगोल आणि वंश या विषयाबद्दलचे लेखन बरेच वादग्रस्त ठरले. टेलर यांच्या प्रमाणेच लोकसंख्या आणि मानवी वस्ती या संदर्भातील अभ्यासात विशेष रस असणाऱ्या इझाइह बोमन यांच्याशी त्यांची जवळीक होती.

इसवी सन १९२९ मध्ये टेलर यांची नियुक्ती शिकागो विद्यापीठात भूगोलाचे वरिष्ठ प्राध्यापक पदावर झाली. ते या पदावर इ. स. १९३५ पर्यंत होते. इ. स. १९३६ मध्ये कॅनडाच्या टोराँटो विद्यापीठात भूगोल विभागाचे संस्थापक प्राध्यापक म्हणून ते नियुक्त झाले. इ. स. १९३० च्या दशकात वांशिक अभ्यासविषयक जर्मन संशोधक पत्रिकेचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले. ब्रिटिश असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या भूगोल विषयाच्या गटाचे ते इ. स. १९३८ मध्ये अध्यक्ष होते. इ. स. १९४० मध्ये अमेरिकन भूगोलज्ञ संघाचे पहिले बिगर अमेरिकन अध्यक्ष म्हणून टेलर निवडून आले. इ. स. १९४२ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे सन्मान्य सदस्य झाले. ब्रिटिश कौन्सिलने प्रायोजित केलेली व्याख्याने टेलर यांनी सर्व ब्रिटिश विद्यापीठांत दिली. टोराँटो विद्यापीठात पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर १९५१ मध्ये टेलर सेवानिवृत्त झाले. याच विद्यापीठात त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ‘एमिरीट्स प्रोफेसर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. टोराँटो सोडून ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या कॅनडियन भूगोलज्ञ संघाचे ते पहिले अध्यक्ष झाले. या संस्थेच्या उन्नतीसाठी पुढील काही वर्षे त्यांनी प्रयत्न केले.

सेवानिवृत्तीनंतर टेलर सिडनीला येऊन स्थायिक झाले. १९५४ मध्ये ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत सन्मान्य सदस्य म्हणून निवडून आले. या संस्थेत ते एकमेव भूगोलशास्त्रज्ञ होते. १९५८ मध्ये त्यांनी जर्नीमॅन टेलर हे आपले जीवनचरित्र प्रकाशित केले. १९५९ मध्ये ते ऑस्ट्रेलियन भूगोलज्ञ या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. याच वर्षी सिडनी विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. ही सर्वोच्च पदवी बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. टेलर यांनी विज्ञानावर आधारित २० पुस्तके व २०० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रकाशित केले. टेलर यांचा मॅन्ली या सिडनीच्या उपनगरात मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियाच्या टपाल खात्याने टेलर यांच्या सन्मानार्थ १९७६ मध्ये त्यांचा फोटो असलेले एक तिकीट प्रकाशित केले होते.

समीक्षक : वसंत चौधरी