(बॅट). वटवाघूळ हा हवेत उडणारा एक सस्तन प्राणी आहे. वटवाघळाच्या पुढच्या पायांचे रूपांतर पक्ष्यांच्या पंखांसारख्या अवयवामध्ये झाले असल्याने ते हवेत उडू शकतात. स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गाच्या किरोप्टेरा गणात वटवाघळाचा समावेश होतो. किरोप्टेरा गणाचे मेगाकिरोप्टेरा आणि मायक्रोकिरोप्टेरा असे दोन उपगण केले जात असत. मेगाकिरोप्टेरा उपगणात मोठ्या आणि फळे खाणाऱ्या वटवाघळांचा समावेश केला जात असे. अलीकडच्या काळात हे वर्गीकरण बदलले असून किरोप्टेरा गणाचे यिनटेरोकिरोप्टेरा आणि यांगोकिरोप्टेरा असे दोन उपगण केले आहेत; यिनटेरोकिरोप्टेरा उपगणात फळे खाणाऱ्या वटवाघळांबरोबर (मेगाकिरोप्टेरा उपगणातील वटवाघळे) पूर्वीच्या मायक्रोकिरोप्टेरा उपगणातील पाच कुलांचा समावेश केलेला आहे. त्यानुसार यिनटेरोकिरोप्टेरामध्ये ६ कुले (मोठी वटवाघळे) आणि यांगोकिरोप्टेरामध्ये १२ कुले (लहान वटवाघळे) येतात. अतिथंड प्रदेश वगळता, वटवाघळे जगात सर्वत्र आढळतात.
वटवाघळांच्या जगात सु. १,२०० जाती असून अनेक जाती कीटकभक्षी आहेत; उरलेल्या जातींमध्ये बहुतकरून फळे खाणाऱ्या आहेत. तीन जातींची वटवाघळे कीटकांऐवजी इतर प्राण्यांवर जगतात. उदा., रक्तशोषक (व्हॅम्पायर) वटवाघळे. ती मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, चिली इ. देशांत दिसतात, जनावरांचे रक्त पितात आणि जगतात.
वटवाघळांच्या आकारमानात विविधता आढळते. शरीराची लांबी १.९—३७.५० सेंमी. असून पंखांचा विस्तार १५ सेंमी.—१.५ मी. पर्यंत असतो. शरीर मऊ फरने आच्छादलेले असून तिचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा काळा असतो. तोंडात दात असतात; हृदय चार कप्प्यांचे असून ते फुप्फुसे व इतर अवयवांना स्वतंत्रपणे रक्त पुरविते. नर मादीपेक्षा मोठा असतो. किटी हॉग नोझ्ड बॅट प्रकारचे वटवाघूळ (क्रॅसिओनिक्टेरिस थाँग्लॉग्याई) सर्वांत लहान असून त्याची लांबी सु. ३ सेंमी., वजन सु. २.५ ग्रॅ. आणि पंखविस्तार सु. १५ सेंमी. आहे. फ्लाईंग फॉक्स प्रकारची वटवाघळे (टेरोपस गिगँशियस) मोठी असून सर्वांत मोठ्या वटवाघळाचे वजन सु. १.६ किग्रॅ. आणि पंखविस्तार सु. १.७ मी. असतो.
वटवाघळांच्या पुढच्या पायांचे रूपांतर पंखांमध्ये झालेले असून त्यांना चर्मप्रसर म्हणतात. चर्मप्रसर हा कोपरापर्यंत असलेला बाहू, नंतर मनगटापर्यंत आलेल्या बाहूची दोन हाडे व बोटांची चार हाडे यांना सामावून घेतो. बोटे लांब असून ती मनगटापासून आऱ्यांसारखी निघालेली असतात. चर्मप्रसरामध्ये संयोजी ऊती, स्नायू, रक्तवाहिन्या, चेता असून तो छत्रीसारखा उघडता अथवा मिटता येतो. तसेच चर्मप्रसराची उघड-झाप करून त्यांना वर-खाली जाता येते. पक्ष्यांपेक्षा ते सहज संचार करतात. पंखांमध्ये पक्ष्यांच्या तुलनेत अधिक हाडे असतात. पंख पातळ असून ते फाटू शकतात, परंतु लवकर जुळून येतात. पंखांच्या पृष्ठभागावर अन्य पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे स्पर्शसंवेदी मर्केल पेशी असतात. त्याद्वारे हवेच्या प्रवाहातील बदल त्यांना समजतो आणि त्यानुसार ते उड्डाण करतात. ते ताशी सु. ५५ किमी. वेगाने उडू शकतात.
वटवाघळे अंधाऱ्या गुहा, खडकांच्या कपारी, झाडांच्या ढोल्या, इमारती, बोगदे इ. ठिकाणी वसाहती करून राहतात. ती घरटी तयार करत नाहीत. खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत झाडाच्या फांद्यांना, वीजेच्या किंवा दूरध्वनीच्या तारा, कपारी यांना ती टांगून राहतात. टांगून राहण्यासाठी त्यांच्या पायात बदल झालेले असतात. त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वळलेली असून नखेही वाकडी झालेली असतात. एकदा वटवाघूळ एखाद्या फांदीला किंवा खडकाच्या खडबडीत पृष्ठभागाला चिकटले की, ते टांगलेले राहते. मृत्यूनंतरही ते बहुधा टांगलेले राहते. काही वेळा ती नुसती जमिनीवर पडूनही राहतात. क्रियाशील असताना वटवाघळांच्या शरीराचे तापमान ३७°–४०° से.च्या दरम्यान असते आणि या अवस्थेत ती आपल्या शरीराच्या तापमानाचे नियमन करतात. त्यांच्या पंखांचा पृष्ठभाग मोठा असल्याने शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जाते. या अवस्थेत त्यांच्या शरीराचे तापमान ६°–३०° से. इतके कमी होते. तेव्हा ते विश्रांती घेतात किंवा झोपी जातात. शरीराचे तापमान कमी झाले की हृदयाचे ठोके व श्वसन क्रिया सावकाश होतात आणि शरीरातील ऊर्जेचा व्यय ५०–९०% इतका कमी होतो.
वटवाघळे निशाचर असून संधिप्रकाशात तसेच रात्री क्रियाशील असतात. रात्रीच्या अंधारात ती सहज उडू शकतात. यांगोकिरोप्टेरा उपगणातील वटवाघळे आणि काही मोठी वटवाघळे प्रतिध्वनी (इको) निर्माण करतात. त्यांची दृष्टी क्षीण असते. रात्रीच्या काळोखात ती प्रतिध्वनी निर्माण करून दिशा व स्थान यांची निश्चिती करतात. प्रतिध्वनीच्या निर्मितीसाठी ती स्वनातीत ध्वनी बाहेर फेकतात. वटवाघळाने बाहेर फेकलेला स्वनातीत ध्वनी आणि त्यापासून निर्माण झालेला प्रतिध्वनी यांची तुलना करून त्यांच्या चेतासंस्थेद्वारे वटवाघळच्या सभोवतालची प्रतिमा तयार होते. या प्रतिमेच्या मदतीने वटवाघळे पूर्ण अंधार असताना भक्ष्य ओळखतात, भक्ष्याचे स्थान पक्के करतात आणि भक्ष्य पकडतात. काही वेळा ते एवढा तीव्र आवाज काढतात की त्यांच्या आवाजाची तीव्रता ६०–१४० डेसिबल असते. दिशा निश्चितीखेरीज वटवाघळे आवाजाचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी किंवा संदेशवहनासाठी करतात. काही मोठी वटवाघळे पाहू शकतात. त्यांची दृष्टी जवळजवळ माणसाच्या दृष्टीइतकी सक्षम असते. दिवसा तसेच रात्री स्पष्ट दिसण्यासाठी त्यांच्या दृष्टीचे अनुकूलन झालेले असते.
वटवाघळांमध्ये पचनक्रिया जलद घडून येते. ती अन्नाचे बारीकबारीक तुकडे करीत असल्यामुळे पचनक्रिया मोठ्या पृष्ठभागावर होते. खायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या ३० ते ६० मिनिटांत ती मलविसर्जन करतात. त्यामुळे उड्डाणाच्या वेळी वजन कमी राहते. ते बरेच कीटक खात असल्यामुळे त्यांची विष्ठा (ग्वानो) भरपूर प्रमाणात असते. मेक्सिकोसारख्या ठिकाणी ती जोरखत म्हणून वापरतात. घुबड, ससाणा, गरुड इ. शिकारी पक्षी तसेच झाडावर चढू शकणारे प्राणी, मांजर इ. त्यांचे शत्रू आहेत.
अन्य सस्तन प्राण्यांप्रमाणे वटवाघळांची वीण होते. बहुसंख्य वटवाघळांत वर्षाकाठी एकदा आणि एकच पिलू होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वटवाघळांच्या अनेक जातींच्या माद्या योग्य जागी एकत्र येऊन पिलांना जन्म देतात. पिले मोठी होईपर्यंत मादी काळजी घेते. पिलू मादीच्या स्तनाग्राला घट्ट धरून राहते. काही माद्या वसाहतीतल्या अन्य पिलांनाही पाजतात. पिलांची वाढ झपाट्याने होते.
जगाच्या काही भागात जसे, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया देशांत साधारणपणे ८००–१,२०० ग्रॅ. वजनाच्या वटवाघळांचे मांस खाल्ले जाते. ती फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वटवाघळाच्या त्वचेवरील पिसवा अनेक विषाणूंचे वाहक आहेत. त्यांच्या चाव्याने आलर्क रोग (रेबीज) होऊ शकतो. वटवाघळे फुलांच्या परागणाचे कार्य करतात. तसेच कीटकांचा नाश करून कीडनाशकांचा खर्च कमी करतात. प्राणिविज्ञानात अभ्यासासाठी व संशोधनासाठी वटवाघळांचा वापर करतात. यूरोपमधील प्राणिसंग्रहालयांत काही फ्लाईंग फॉक्स व फळभक्षक वटवाघळे ठेवण्यात आलेली आहेत.
भारतात वटवाघळाच्या १०० पेक्षाही अधिक जाती आढळतात. त्यांपैकी टेरोपस गिगँशियस (इंडियन फ्लाईंग फॉक्स) ही जाती सर्वत्र दिसून येते. वटवाघळांमध्ये आकारमानाने ही एक मोठी जाती असून ती भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांत आढळते. शरीराची लांबी १५.५–२२ सेंमी., वजन ०.६–१.६ किग्रॅ. आणि पंखांचा विस्तार १.२–१.५ मी. असतो. रंगात विविधता असून पाठीकडील बाजू काळी, डोके करडे आणि पोटाकडचे भाग गडद तपकिरी असतात.