महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वनदुर्ग. हा किल्ला कोयना-शिवसागर जलाशयाच्या पश्चिमेस बांधलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फूट आहे. पायथ्याच्या मेट-इंदवली पासून उंची ८०० फूट आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागर जलाशय यांमधील भागात घनदाट जंगल आहे. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणच्या दिशेला असलेले कातळकडे, यांमुळे वासोट्याची दुर्गमता वाढली आहे. या जंगलात वाघ, अस्वल आदी वन्य प्राणी अढळतात.

वासोटा किल्ला, सातारा.

किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा मार्गे बामणोली व तेथून बोटीतून गेल्यावर मेट-इंदवली हे ठिकाण लागते. हे गाव धरणामुळे विस्थापित झाले आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. किल्ल्याची चढाई जेथे सुरू होते, तेथे एक मारुतीचे मंदिर आहे. वासोटा किल्ल्याला दरवाजे होते; सांप्रत त्याचे अवशेषच दिसतात. गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर असून येथून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस म्हणजे उत्तरेकडे जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे मंदिर लागते. येथून पुढे जाणारी वाट विंचवाच्या नांगीच्या आकाराच्या माचीवर घेऊन जाते. या माचीलाच ‘काळकाईचे ठाणे’ म्हणतात. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे जाणारी वाट जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. पुढे ही वाट जंगलातून बाबुकड्या जवळ येऊन पोहोचते. येथून समोर उभा असणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय. सध्या या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्य श्वापदे यांमुळे सहसा येथे कोणी जात नाही. वासोट्याला पावसाळ्यात जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. सांप्रत हा किल्ला संरक्षित वन क्षेत्रात येत असल्याने गडावर जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते.

फार प्राचीन काळी वासोटा ज्या डोंगरावर आहे, तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी दंतकथा आहे. ’वसिष्ठ’ चे पुढे वासोटा झाले असावे, अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. किल्ल्याची बांधणी पन्हाळ्याच्या शिलाहार राजवटीतील भोजराजा दुसरा (११७८–११९३) याने बाराव्या शतकात केली असल्याचे सांगितले जाते; परंतु यास पुरावा उपलब्ध नाही. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. आदिलशाहीतर्फे किल्ल्याचा कारभार शिर्के व त्यानंतर जावळीकर मोरे घराण्याकडे होता. छ. शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर वासोट्यावर भगवे निशाण फडकले (१६ जून १६६०) व किल्ल्याचे नाव ‘व्याघ्रगड’ ठेवले गेले. पन्हाळगडाच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्दी जौहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला होता. राजापूर मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटली आणी तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केले. त्यात ग्रिफर्ड, फॅरन व सॅम्युअल यांना तीन वर्षे वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते.

चिपळूण जवळील ‘गोवळकोट उर्फ गोविंदगडाच्या’ मोहिमेत १७३३ मध्ये या किल्ल्यावरून काही तोफा पाठवल्याचा उल्लेख कागदपत्रांत सापडतो. उत्तर पेशवाईत हा किल्ला औंधच्या पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. दुसऱ्या बाजीरावाने प्रतिनिधींना कैद केले, तेव्हा पंतप्रतिनिधींची उपपत्नी ताई तेलीण उर्फ रमाबाईने हा किल्ला काबीज करून (१८०७) तेथे वास्तव्य केले व प्रतिनिधींची तुरुंगातून मुक्तता केली. पुढे दुसऱ्या बाजीरावाने वासोटा घेण्याची कामगिरी बापू गोखल्यांवर सोपविली (१८०८). त्याने वासोट्यावर चढाई केली व बाजूच्या जुन्या वासोट्यावरून नव्या वासोट्यावर तोफांचा मारा केला. ताई तेलिणीने सु. आठ महिने हा किल्ला लढविला; पण अखेर तिचा पराभव झाला.

पुढे हा किल्ला तुरुंग म्हणूनच वापरात होता. १८१७ मध्ये खडकीच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यावर दुसऱ्या बाजीरावाने छ. प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेसाठी या किल्ल्यावर आणून ठेवले होते. त्यानंतर मराठ्यांनी कॉनेटस् हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना पुण्याकडे जात असताना पकडून वासोट्यास कैदेत ठेवले होते. म्हाताजी कान्होजी चव्हाण नावाच्या शिपायाने त्यांची उत्तम देखभाल केली; म्हणून पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश सरकारने त्यास बक्षीस दिले. शेवटच्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत, म्हणजे सन १८१८ पर्यंत तो मराठ्यांकडेच होता. जनरल प्रिझलर या इंग्रज अधिकाऱ्याने जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवून त्यांच्या मारगिरीने हा किल्ला हस्तगत केला (२९ मार्च १८१८).

संदर्भ :

  • गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २, (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. शाहू रोजनिशी: खंड १, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. सवाई मधवराव पेशवे रोजनिशी – खंड ४ भाग १, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०८.

                                                                                                                                                                                           समीक्षक : सचिन जोशी