सापसंद (Pit-fall flower) ॲरिस्टोलोकिएसी कुलातील आहे. फुले मोठी व असामान्य रंगांची असून त्यांना उग्रसा वास असतो. परागकोश आणि बीजांडे पाकळ्यांच्या, नळीच्या आकाराच्या, देठाकडच्या फुगीर भागामध्ये बंद असतात. या नळीची अंतर्गत भिंत पातळ, श्लेष्मल आणि निसरडी असते व तीवर टोकदार केस असतात. आतून नळी विस्तारित होऊन त्याच्या तळाजवळ पारदर्शक खिडक्यासदृश ठिपके असतात. फुलांचा वास, चमकदार रंग आणि मोठा आकार लहान कीटकांना आकर्षित करतात. हे कीटक एका फुलाला भेट देऊन येताना त्या फुलांतील पराग घेऊन आलेले असतात. दुसऱ्या फुलाला भेट देताना नळीतील केसांच्या अस्तरांमुळे आणि नक्षीदार ठिपक्यांच्या मार्गदर्शनामुळे ते नळीच्या पायथ्यापर्यंत सहज जातात, परंतु त्यांचा परत बाहेर जाण्याचा मार्ग टोकदार केस रोखतात. जेव्हा कीटक फुलांच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी त्यांचा स्पर्श किंजल्क – कुक्षीला होतो व कीटकांच्या अंगावर असलेले इतर फुलांमधून वाहून आणलेले पराग कुक्षीला चिकटतात. परागीभवनाची क्रिया पूर्ण होण्याच्या सुमारास आतील केस गळून पडतात आणि कीटक या फुलांतील पराग घेऊन फुलांच्या बाहेर पडू शकतात, आणखी वेगळ्या फुलांना भेट देऊन परपरागीकरण करतात.

संदर्भ :

समीक्षक : शरद चाफेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.