ऑर्किड ही ऑर्किडेसी (Orchidaceae) कुलातील पुष्पवनस्पती असून ती अत्यंत विकसित गटातील एक आहे. याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी असतात. जगातील पुष्पवनस्पती कुलांतील हे दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे कुल आहे. बरेच ऑर्किड दुसऱ्या झाडाच्या फांद्या किंवा खोडावर वाढत असतात. परागीभवनाची क्रिया पार पाडण्याकरिता त्यांना आकर्षक रंग आणि गंध इत्यादींचा उपयोग करावा लागतो. परागीभवन प्रक्रियेच्या विपुल विविधतेसाठी ऑर्किड प्रसिद्ध आहेत. परागीभवनाचा अत्यंत विशेष प्रकार यात आढळतो. या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक, विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित व्हावे लागतात. विविध पृष्ठवंशीय (Vertebrates) आणि अपृष्ठवंशी (Invertebrates) जैविक घटक (उदा., मधमाश्या आणि पक्षी) ऑर्किड फुलामध्ये परपरागीभवनाची प्रकिया घडवून आणतात. काही विशिष्ट ऑर्किड फुलामध्ये केवळ एकाच प्रजातीच्या कीटकाद्वारे परागीभवन होत असते. पराग वाहून नेणाऱ्या जैविक घटकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्किड्स मधु, रंग, आकार, सुगंध इ. वापरतात आणि कधीकधी इतर वनस्पतींच्या फुलांची नक्कल करतात.

ऑर्किडच्या फुलांची रचना अतिशय विशेष असून निदलपुंजे आणि पाकळ्या यांमध्ये फरक आढळत नाही. फुलाचे बाहेरील आवरण तीन सारख्या आकाराच्या दलांचे असते. आत तीन दले असून त्यांपैकी एक आकाराने मोठे व पसरट असलेले दल कीटकास उतरण्यास तळाप्रमाणे काम करते; तिला ओष्ठ (Labellum) म्हणतात. कळी अवस्थेत हा ओष्ठ वरच्या बाजूला असतो, तर फुलाची वाढ झाल्यावर ओष्ठ खाली झुकतो व कीटकांकरीता तळाप्रमाणे (Landing) काम करतो. पुंजायांगस्तंभाच्या (Gynostemium) वरच्या बाजूला दोन उघडे परागपुंज (Pollinia) आणि त्यांच्या खाली एक पातळ पृष्ठभाग – नपुंसक कुक्षी (Rosellum) असतो. जेव्हा मधमाशी किंवा कीटक मधाच्या शोधात ओष्ठावर उतरतात, तेव्हा परागपुंज कुक्षीवरील चिकट द्रवपदार्थाच्या साहाय्याने कीटकांच्या पायाला किंवा डोक्याला चिकटतात. जेव्हा हे कीटक दुसर्‍या फुलास भेट देतात तेव्हा कुक्षीला चिकटपणा असल्याने परागपुंज कुक्षीवर पकडले जातात आणि परपरागीकरण घडून येते.

संदर्भ :

समीक्षक: शरद चाफेकर