बेल, क्लाइव्ह : (१६ सप्टेंबर १८८१—१८ सप्टेंबर १९६४). प्रसिद्ध इंग्लिश कलासमीक्षक, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वज्ञ. जन्म ईस्ट शेफर्ड, बर्कशर येथे. संपूर्ण नाव आर्थर क्लाइव्ह हॉवर्ड बेल. शिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे. प्रसिद्ध ‘ब्लूम्सबरी गटा’चे ते एक सदस्य होते. व्हर्जिनिया व लिओनार्ड वुल्फ, लिटन स्ट्रेची, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स इत्यादींचा ह्या गटांत अंतर्भाव होत होता. क्लाइव्ह बेल यांचा विवाह सर लेस्ली स्टीव्हन्स यांची कन्या आणि व्हर्जिनिया वुल्फ यांची बहीण व्हॅनेसा स्टीव्हन्स यांच्याशी झाला होता.
सौंदर्यशास्त्रात बेल यांनी रूपवादी किंवा आकारवादी (Formalist) उपपत्तीचा पुरस्कार केला. मात्र आपली आकारवादी उपपत्ती त्यांनी चित्रकलेसारख्या दृष्य कला व संगीत यांच्यापुरती मर्यादित ठेवली आणि ललित साहित्य तिच्या व्याप्तीपासून वगळले. ह्या उपपत्तीप्रमाणे कलाकृतीचे सौंदर्य किंवा तिचे कलाकृतीपण हे पूर्णपणे तिच्या आकारात सामाविलेले असते. तिच्या सौंदर्याचा तिच्या आशयाशी काही संबंध नसतो. उदा., चित्राचा आशय काय आहे, ते कशाचे चित्र आहे, ते ज्या प्रकारच्या वस्तूचे किंवा प्रसंगाचे आहे, त्याचे जीवनात किती महत्त्व आहे, त्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या, त्या चित्राने घडविलेल्या दर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात कोणत्या करुणा, शोक, आनंद इ. भावना जागृत होतात ह्या गोष्टींवर चित्राचे सौंदर्य यत्किंचितही अवलंबून नसते, तर चित्राचे चित्र म्हणून जे रंग, रेषा, पृष्ठभाग इ. भाग असतात. त्यांच्या परस्परसंबंधांमधून सिद्ध होणाऱ्या त्याच्या आकारावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते. थोडक्यात, कलाकृतीचे कलामूल्य तिच्या जीवनमूल्यांवर अधिष्ठित नसते, तर तिच्या आकारिक मूल्यांवर अधिष्ठित असते.
ह्यामुळे कलाकृतीचे सौंदर्यग्रहन करताना आपला जीवनानुभव बाजूला सारून तिच्या केवळ आकारावर लक्ष केंद्रित करावे लागते. ह्या आकारवादी सिद्धांतापासून निष्पन्न होणारा एक निष्कर्ष असा की, कोणत्याही कालखंडातील किंवा संस्कृतीतील व्यक्ती कोणत्याही कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला समर्थ असते; कारण रसिकाला कलाकृतीच्या आशयाचे किती यथार्थपणे आकलन झाले आहे आणि ह्या आशयाला तो भावनिक प्रतिसाद कितपत देऊ शकतो ह्या गोष्टींचा तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रक्रियेंशी काही संबंध असत नाही. उलट, कलाकृतीचा आशय जर आपल्या व्यावहारिक जीवनाशी व भावनांशी निगडित असला, तर त्याच्या आकलनामुळे आपल्या मनात अनेक विचार व भावना उत्तेजित होतील. आपल्या प्रत्यक्ष जीवनाच्या दृष्टीने त्यांचे कितीही महत्त्व असले, तरी कलाकृतीच्या सौंदर्यस्वादाच्या दृष्टीने त्या पूर्णपणे गैरलागू असतात आणि कलाकृतीच्या सौंदर्याचा शुद्ध आस्वाद घेताना त्यांचा अडथळा होऊ शकतो.
तेव्हा कलाकृतीचे सौंदर्य केवळ तिच्या आकारात सामावलेले असते किंवा केवळ तिच्या आकारावर अधिष्ठित झालेले असते. ज्या प्रकारच्या आकारावर अधिष्ठित झालेले असते. ज्या प्रकारच्या आकारात कलाकृतीचे सौंदर्य सामावलेले असते (किंवा ज्या प्रकारच्या आकारावर कलाकृतीचे सौंदर्य अधिष्ठित असते) त्याला बेल ‘अर्थपूर्ण आकार’ म्हणतात. हे काहीसे दिशाभूल करणारे पद आहे; कारण अर्थपूर्ण आकार स्वतःपलीकडचा कोणताही अर्थ व्यक्त करीत नाही. त्याला अर्थ नसतो. तो स्वतःच अर्थपूर्ण असतो. ह्या अर्थपूर्ण आकाराच्या स्वरूपाचे विश्लेषणही बेल करीत नाहीत. त्याच्या स्वरूपाचे त्यांनी केलेली व्याख्या अशी की, ज्या आकारामुळे आपली सौंदर्यभावना जागृत होते, तो आकार म्हणजे अर्थपूर्ण आकार होय. पण सौंदर्यभावना म्हणजे कोणती भावना, तिचे स्वरूप काय असते ह्याचे उत्तर एवढेच मिळते की, ‘अर्थपूर्ण आकारामुळे जी भावना जागृत होते ती सौंदर्यभावना होय’. अर्थात राग, द्वेष, प्रेम इ. आपल्या जीवनविषयक भावनांहून सौंदर्यभावना वेगळी असते. मुख्यत्वे दृश्य कलांमधील रचनातत्त्वांच्या आधारे सौंदर्यभावनेचा वेध घेऊन ‘अर्थपूर्ण रूपबंध’ (Significant Form) हे सर्व कलांचे सत्त्व सांगू पाहणारे तत्त्व बेल यांनी मांडले.
थोडक्यात, बेल यांची भूमिका अशी की, सौंदर्यानुभव हा आपल्या अनुभवाचा अलग व स्वायत्त असा प्रांत आहे; त्याचा इतर अनुभवप्रकारांशी काही संबंध असत नाही आणि अर्थपूर्ण आकाराचे दर्शन आणि त्याने उत्तेजित होणारी आणि त्याच्याशी अनुरूप असणारी अशी एक विशिष्ट अशी सौंदर्यभावना यांचा मिळून सौंदर्यानुभव घडलेला असतो.
बेल यांची ग्रंथसंपदा : आर्ट (१९१४), पीस ॲट वन्स (१९१५), ॲड फॅमिलीॲरिटी (१९१७), पॉट-बॉयलर्स (१९१८), पोएम्स (१९२१), सिन्स सेझान (१९२२), ऑन ब्रिटिश फ्रीडम (१९२३), लँडमार्क्स इन नाइन्टिन्थ-सेंच्यूरी पेंटिंग (१९२७), सिव्हिलायझेशन : ॲन एसे (१९२८), प्राउस्ट (१९२८), ॲन अकाउन्ट ऑफ फ्रेंच पेंटिंग (१९३१), एन्जॉयिंग पिक्चर्स : मेडिटेशन्स इन द नॅशनल गॅलरी अँड एल्सव्हेअर (१९३४), वॉरमॉन्गर्स (१९३८), ओल्ड फ्रेंड्स : पर्सनल्स रिकलेक्शन (१९५६).
बा. सी. मर्ढेकर (१९०९–५६) यांच्या सौंदर्यविषयक उपपत्तीवर बेल यांच्या विचारांचा बराच प्रभाव आहे, हे उघड आहे.
लंडन येथे ते निधन पावले.
संदर्भ :