(बॉनसाई; बॉनसाय). कृत्रिम उपायांनी मोठ्या झुडपांची किंवा वृक्षांची वाढ खुंटवली जाते, अशा पद्धतीने तयार केलेल्या लहान व आकर्षक आकारांच्या झाडांना ‘वामनतनू वृक्ष’, ‘वामनवृक्ष’, ‘लघुवृक्ष’, ‘बटू वृक्ष’ किंवा ‘तबकवृक्ष’ म्हणतात. असे आकार देण्याचे तंत्र पहिल्यांदा जपानमध्ये विकसित झाले. या तंत्राद्वारे मूळ वृक्षांचा आकार व बाह्यस्वरूप कायम ठेवून, प्रमाणबद्धता राखून त्यांचे आकारमान लहान करतात. जपानी भाषेत त्यांना ‘बॉनसाई’ म्हणतात; ‘बॉन’ याचा अर्थ उथळ पात्र वा कुंडी व ‘साई’ याचा अर्थ ‘लघुवृक्ष’ असा असून ‘बॉनसाई’ म्हणजे उथळ पात्रातील (कुंडीतील/तबकातील) लघुवृक्ष म्हणून केला जातो. आपल्याकडेही व्यवहारात या वृक्षांना बॉनसाई म्हटले जाते. या तंत्राचा वापर मुख्यत: शोभेचे वृक्ष तयार करण्यासाठी केला जातो. मात्र त्यांपासून अन्नधान्यनिर्मिती किंवा औषधनिर्मिती केली जात नाही.
लघुवृक्ष तयार करण्यासाठी झाडाचे रोप, फांदी किंवा लहान झाड निवडले जाते. कधीकधी भिंतीवर उगवलेली झाडेही वापरतात. निवडलेल्या वृक्षाची मुळे व फांद्या कापून त्याचे आकारमान नियंत्रित केले जाते. उंचीनुसार लघुवृक्षांचे पुढील प्रकार केले जातात; (१) मोठे : या लघुवृक्षांची उंची १५२–२०३ सेंमी. असते. (२) मध्यम : या लघुवृक्षांची उंची १०१–१५२ सेंमी. असते. (३) लहान : या लघुवृक्षांची उंची ४६–१०१ सेंमी. असते. (४) अतिलहान : या लघुवृक्षांची उंची २०–४६ सेंमी. असते. (५) मेम : हे लघुवृक्ष २० सेंमी.पेक्षा लहान असतात.
लघुवृक्ष तयार करताना त्यांची रचना पुढील प्रकारे केली जाते –
(१) औपचारिक सरळ : या प्रकारात मुख्य खोड सरळ उभे ठेवले जाते आणि बाजूच्या फांद्या कापून झाडाला शंकूचा आकार दिला जातो.
(२) अनौपचारिक सरळ : मुख्य खोडाला थोडेसे तिरपे ठेवले जाते. बाजूच्या फांद्यांची लांबी खालून वर कापून शंकूचा आकार दिला जातो.
(३) तिरपा किंवा कललेला : या प्रकारात मुख्य खोड तिरपे करून ३०० पेक्षा जास्त झुकवलेले असते. बाजूच्या फांद्यांची लांबी एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूला कमी ठेवलेली असते.
(४) धबधब्याप्रमाणे प्रपाती : यात मुख्य खोड वाकवून पात्राच्या काठापेक्षा जास्त खाली वाकवलेले असते. त्याच्या फांद्यासुद्धा वाकवून वाढवतात. त्यामुळे झाड धबधब्यासारखे दिसते.
(५) वाऱ्याने वाकलेले : मुख्य खोड एका बाजूला वळवून, त्याच्या फांद्यासुद्धा त्याच दिशेला वाकवलेल्या असतात. त्यामुळे झाड वाऱ्याच्या जोरामुळे वाकलेले दिसते.
(६) वन : एकाच तबकात एकापेक्षा जास्त झाडांची लागवड करून वनाचा भास केला जातो. पात्रातील झाडांची उंची वेगवेगळी ठेवतात. विविध रंगांमुळे शोभा वाढते.
लघुवृक्षांना वेगवेगळे आकार देण्यासाठी तांब्याची किंवा तशीच न गंजणारी पातळ २ मिमी. जाडीची तार वापरतात. खोडाची उंची जेवढी ठेवायची त्याच्या दीडपट ते दुप्पट तारेची लांबी ठेवतात. खोड तसेच फांद्या यांची छाटणी करण्यासाठी लहान पोपट कात्री वापरतात. प्रथम पात्र स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घेतात. पात्राच्या तळाशी दोन छिद्रे समान अंतरावर करतात, ज्यातून तार खालून ओवून घेतात. पात्राखालून ओवलेल्या तारेची दोन्ही टोके बाहेरच्या बाजूला वळवून ठेवतात. पात्रात विटांचे लहान तुकडे, जाड वाळू, पालापाचोळा व थोडी माती यांनी एक तृतीयांश (१/३) भरतात. यावर रोप किंवा झाडाची बांधणी करतात. बाकीचे पात्र मातीने भरून संपूर्ण पात्र काही तास पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. अशा प्रकारे तयार झालेले झाडासह पात्र सावलीत दोन-चार दिवस ठेवून हळूहळू उन्हात आणतात. खत व पाणी वेळच्या वेळी देतात. आकार देणे, मुळांची छाटणी दुसऱ्या वर्षानंतर करतात.
जपान, चीन, अमेरिका, व्हिएटनाम, भारत अशा अनेक देशांमध्ये लघुवृक्ष तयार केले जातात आणि त्यासाठी सु. १५० पेक्षा अधिक जातीचे वृक्ष वापरले जातात. या वृक्षांमध्ये मॅपल, स्ट्रॉबेरी, बर्च, बुगनविलिया, सायप्रस, सीडार, जूनिपर, चेरी, बांबू, जरदाळू, डाळिंब, सफरचंद, हॉथॉर्न, जपानी बीच इत्यादींचा समावेश होतो. भारतात वड, पिंपळ, बांबू, कागदी लिंबू, चिंच, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रे तसेच जास्वंद, सोनचाफा इ. लघुवृक्ष तयार केले जातात. लघुवृक्ष निसर्गातील इतर वृक्षांप्रमाणेच वाढतात आणि त्यांची वाढ, फुले येणे, फळे येणे इत्यादी सर्व गोष्टी इतर गोष्टींप्रमाणे घडतात. तसेच फुले व फळे यांचे आकार सामान्यपणे त्या वृक्षांच्या मूळ वनस्पतींप्रमाणे असतात.
लघुवृक्षाची वाढ होत असताना त्यांना खते पुरवावी लागतात. याकरिता त्यांना सरकी किंवा सोयाबीन यांची पेंड, सुकी मासळी, हाडांचा चुरा, कोंबड्यांची विष्ठा यांपासून बनलेली खते देतात. तसेच जमिनीचा पोत व सामू (पीएच) सुधारण्यासाठी यात थोडी राखही मिसळतात. फुले व फळे येण्याकरिता भरपूर फॉस्फरसयुक्त खते देतात. या वृक्षांची देखभाल नीट करावी लागते. वरचेवर पाणी देणे, छाटणी करणे, अधूनमधून सूर्यप्रकाशात ठेवणे, रोगांपासून बचाव करणे याकरिता काळजी घ्यावी लागते.
जपानमध्ये ही कला वंशपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याची रीत आहे. अनेक कुटुंबामध्ये चारशे वर्षांपेक्षा जास्त जुने लघुवृक्ष आहेत. जगातील सर्वांत जुना लघुवृक्ष सु. एक हजार वर्षांपेक्षा जास्त वयाचा वड आहे. तो इटलीतील क्रेस्पी संग्रहालयात आहे.