प्राचीन काळापासून इटली व स्पेन पारा उत्पादनात अग्रेसर आहेत. इ. स. पू. १५०० मधील ईजिप्तमधील थडग्यांमध्ये पारा आढळून आला. भारतीय आणि चिनी लोकांना प्राचीन काळापासूनच पारदाची माहिती होती. सहाव्या शतकातील किमयागार पाऱ्याकरिता मर्क्युरीअस (Mercurius) संज्ञा वापरत असत. ही संज्ञा मर्क्युरी (बुध) या ग्रहावरून घेतली असावी, Hg ही संज्ञा Hydragyrum म्हणजे द्रव चांदी यावरून आली आहे. पाऱ्याला त्याचा रंग व त्याची गतीशीलता यावरून ‘क्विक सिल्व्हर’ असेही संबोधले जाते.

औषधीय खनिजांत पारदाला विशेष स्थान आहे. पारदाचे स्वरूप, त्याचे उत्पत्ती स्थान, गुणदोष आणि उपयोग यांचा विचार करून पारदाला विविध नावाने संबोधिले जाते. उदा., मृत्युनाशनः, रसायनः, दिव्यरस, रसेन्द्र, सौभाग्य, गलदरौप्यनिभम् (पातळ झालेल्या चांदीप्रमाणे), महावहनिः, चपल इत्यादी.

पारा हा सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारा एकमेव धातू. पारा निसर्गात मुक्तरूपात अल्प प्रमाणात आढळतो. पारा प्रामुख्याने संयुगांच्या स्वरूपात आढळतो. हिंगूळ हे पाऱ्याचे महत्त्वाचे खनिज आहे. हिंगुळाशिवाय सेलेनाइड, टेल्युराइड व क्लोराइड या खनिजांमध्ये पारा आढळून येतो. इ. स. पू. ४०० – ४५० च्या सुमारास आल्मादेन (स्पेन) येथील खाणीतून प्रथम हिंगूळ बाहेर काढण्यात आला. सन १४९० साली ईद्रीया (इटली) येथील पाऱ्याच्या खाणीचा शोध लागला.

भारतात ८ व्या शतकात नागार्जुनाने पाऱ्याचा उपयोग रसशास्त्रात करण्यास सुरुवात केली. सर्व रोगावर, औषधनिर्मितीत पारदाचा वापर  केला आहे. पारा आपले गुण न सोडता ज्याच्याशी संयुक्त होतो; त्याचेही गुण घेतो, इतकेच नाही तर तो वाढवितो, दीर्घकाल टिकवितो. पारा पार्थिव व अती चंचल असल्याने त्यास बद्ध करावे लागते. गंधकाबरोबर बद्ध केलेला पारद औषधात फार उपयुक्त आहे. कज्जली हा घर्षणबद्ध व रससिंदूर हा अग्निबद्ध हे पारद बद्धचे प्रकार आहेत.

हिंगूळ याला सिनॅबार (Cinnabar) असे इंग्रजीत म्हटले जाते. प्राचीन ग्रीक शब्द “किनॅबरी” (Kinnabari) वरून सिनॅबार शब्द निर्माण झाला. याचा अर्थ पाऱ्याचे रूप प्रखर शेंदरी ते विटकरी लाल तसेच पर्शियन शब्द झिंजिफ्राह (Zinjifrah) वरून सिनॅबार शब्द तयार झाला .आयुर्वेदात हिंगूळसाठी दरद, म्लेंच्छ, सुरंग, रक्त, रसोद्भव, हंसपाद, इंगुल व चित्रांग अशी पर्यायी नावे आहेत. त्याचे रासायनिक संघटन HgS आहे. त्यामध्ये सल्फर १३.८ % आणि पारा ८६.२ % असून पुष्कळदा मृतिका, लोह ऑक्साइड आणि बिट्युमेन अधिमिश्रित होऊन हिंगूळ अशुद्ध होतो. स्फटिकप्रणाली (crystal system) त्रिकोणीय ट्रॅपिझोहेड्रल (Trigonal-Trapizohedral) आहे. रूप (Form) कणीदार, अभाज्य किंवा पापुद्र्या स्वरूपात असते.

हिंगूळ हे किरमिजी (व्हर्मिल्यन) लाल ते उदसर लाल अथवा गडद तांबडा, कधीकधी खनिजात तपकीरी किंवा काळसर छटात आढळते. तर रेखा (streak) शेंदरी रक्तवर्णी आहे. द्युती किंवा चमक (Lustre) शुद्ध वज्रासम किंवा धातू सारखी आहे. विपत्रण (cleavage) त्रिकोणकृती, घनाला (Prism) समांतर व स्पष्ट दिसते. भंजन अर्धशंखाभ (Sub concoidal) काहीसे असमान (Uneven) छेद्य असते. काठिण्य (Hardness) २.५ असून विशिष्ट गुरुत्व ८.१० असते.

हिंगुळाचा उपयोग : पार्‍याचे धातुपाषाण (Ore) रंग निर्मितीत होतो. आयुर्वेदात त्रिभुवनकीर्ति, आनंदभैरवरस, सुवर्णमालिनी वसंत, इत्यादी औषधी कल्प तयार करण्यासाठी वापरतात. वैद्याच्या सल्ल्यानुसार नेत्ररोग, आमवात, प्रमेह, कुष्ठ, ज्वर इत्यादी व्याधीमध्ये याचा वापर केला जातो.

आढळ : हिंगूळ थोड्याच ठिकाणी सापडते. अलीकडच्या काळातील ज्वालामुखी खडक व उन्हाळी यांच्या सांन्निध्यात आढळते किंवा खडकांच्या शिरांमधील भरलेल्या द्रव्याच्या रूपात आढळते. लालकिरमजी रग, शेंदरी रेखा, उच्च घनता आणि स्पष्ट विपत्रण ही हिंगूळ वेगळे ओळखण्याची वैशिष्ट्ये आहेत. अमेरिका, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, रशिया इत्यादी देशात हिंगूळ आढळते. भारतात राजस्थानमधील झुनझुनु जिल्ह्यात चंदमारी निक्षेपात, तसेच  गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात सिद्धपुरा येथे सापडते.

संदर्भ :

  • Dole, Vilas; Paranjpae Prakash A Text Book of Rasashastra, Chaukhamba Sanskrit Pratishtan, Delhi, 2006.
  • Kulkarni, P.H. Ayurveda Minerals, Ayurveda Education Series, Pune, 1998.
  • Murthy, S. R. N. Minerals of Indian System of Medicine, Prasad Narasimha Publishers, Bangalore, 2003.
  • Sharma, Sadanand Rasatarangini, Motilal Banarsidas Publishers Private Limited, Delhi, 1979.

समीक्षक : यू. डी. कुलकर्णी