तापमान हे पदार्थाचा गरमपणा किंवा थंडपणा यांची पातळी मोजण्याचे प्रमाण आहे. तापमान हा पदार्थाचा तुलनात्मक गुणधर्म आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला गरम लागणारा चहा हा दुसऱ्यासाठी थंड असू शकतो. त्यामुळे तापमान मोजण्यासाठी तुलनात्मक एककाचा वापर केला जातो. तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला तापमापक असे म्हणतात.

नलिकेत द्रव भरलेले तापमापक : एखाद्या द्रव पदार्थाला उष्णता दिल्यास ते प्रसरण पावते, या गुणधर्मावर तापमापक कार्य करते. तापमापकामध्ये साधारणपणे पारा किंवा इथेनॉल ही द्रव्ये वापरली जातात. तापमापकमध्ये एक काचेची नळी असून तिच्या खालच्या टोकाला काचेचा गोल असतो. त्या काचेच्या गोलामधील पारा किंवा इथेनॉल गरम पदार्थाजवळ नेल्यास ते प्रसरण पावते. या गुणधर्माचा वापर करून तापमापकामध्ये तापमान मोजले जाते. पाण्याचा गोठण बिंदू (शून्य अंश सेल्सिअस) आणि उकळ बिंदू (१०० अंश सेल्सिअस) वापरून तापमापक अंकित केले जाते. त्या दोन बिंदूंमध्ये पुन्हा समान भाग करून तापमापकाचे अंकन पूर्ण केले जाते. आता एखाद्या पदार्थाजवळ तापमापक नेल्यास त्यातील द्रव्य जेथपर्यंत प्रसरण पावते, ते त्या पदार्थाचे तापमान आहे असे म्हटले जाते.

तापमापक

 

वरील तापमापकाशिवाय तापयुग्म तापमापक आणि उत्तापमापक ही तापमान मोजण्याची काही इतर साधने आहेत. ही विनासंपर्क तापमान मोजण्याची साधने आहेत.

तापयुग्म तापमापक : दोन वेगवेगळ्या धातूंच्या तारा एका टोकाशी जोडल्या असता तापयुग्म तयार होते. तापयुग्माची दोन्ही टोके वेगवेगळ्या तापमानांना ठेवलेली असतात. या दोन टोकांमध्ये विद्युत् चालक प्रेरणा(emf) निर्माण होते. निर्माण झालेल्या विद्युत् चालक प्रेरणांवरून त्याच्या गुणोत्तरामध्ये तापमान मोजले जाते.

उत्तापमापक : यामध्ये तापमान मोजण्यासाठी पदार्थामधून निघणाऱ्या विद्युत्-चुंबकीय किरणांचा वापर केला जातो. या तापमाकांचा उपयोग उच्च तापमानापर्यंत करता येतो.

तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस(C), फॅरेनहाईट(F) आणि केल्विन(K) ही एकके साधारणपणे वापरली जातात. वरील एककांमधील तापमानांचे एकमेकांसोबत संबंध खालीलप्रमाणे आहेत :

F =९/५ C + ३२

K = C + २७३.१५

प्रतिक्रिया व्यक्त करा