आपटे, हरि नारायण : (८ मार्च १८६४ – ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळे या गावी. शिक्षण मुंबई व पुणे येथे. शालेय जीवनातच त्यांचे इंग्रजी व संस्कृत साहित्याचे विपुल वाचन झाले होते. कालिदास आणि भवभूती ह्यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी केसरीतून चाललेल्या वादात कालिदासाच्या बाजूने त्यांनी लिहिलेले एक मार्मिक पत्र आणि आगरकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटवरून रचिलेल्या विकारविलसितावरील त्यांची अभ्यासपूर्ण टीका ह्या दृष्टीने लक्षणीय आहेत. गणित कच्चे असल्यामुळे महाविद्यालयाच्या पहिल्याच परीक्षेत त्यांना अपयश आले आणि उच्च शिक्षणाचा विचार त्यांनी सोडून दिला. लेखन-वाचनाखेरीज अन्य व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या चुलत्यांनी स्थापिलेल्या पुण्यातील आनंदाश्रम ह्या संस्थेचे व्यवस्थापकपद मात्र त्यांनी आमरण सांभाळले. जुन्या संस्कृत पोथ्यांचा संग्रह करून त्या प्रसिद्ध करणे हे या संस्थेचे कार्य होते. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन  ह्या कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. ह्या कादंबरीखेरीज त्यांनी इतर नऊ सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरूपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. पण लक्ष्यांत कोण घेतो ? (१८९३), जग हे असे आहे (१९०१), यशवंतराव खरे (१९१६), मी (१९१६), गणपतराव (अपूर्ण- १९१९), कर्मयोग (१९२३), आजच (१९२४), मायेचा बाजार (३ री आवृ. १९२९) आणि भयंकर दिव्य (४ थी आवृ. १९३०) ह्या त्या कादंबऱ्या होत.

मध्यमवर्गीय समाजातील स्त्रीपुरुषांच्या, विशेषतः स्त्रियांच्या, समस्यांना हरिभाऊंच्या कादंबर्‍यांत विशेष स्थान प्राप्त झाले. पुनर्विवाहाचा प्रश्न, सासरच्या छळामुळे पिचणाऱ्या सुना, अल्पवयातच त्यांच्यावर लादले जाणारे मातृत्व, कमावती होऊन स्वतःच्या पायांवर उभी राहू पाहणाऱ्या स्त्रीला समाजाशी करावा लागणारा मुकाबला यांचे प्रभावी चित्रण त्यांनी केले. तसेच तत्कालीन तरुणांच्या मनातील वैचारिक संघर्ष, त्यांनी जोपासलेली ध्येये, स्त्रीशिक्षणाला अनुकूल होऊ लागलेली त्यांची मनोवृत्ती इ. विषयही त्यांनी आपल्या कादंबर्‍यांतून समर्थपणे मांडलेले आहेत. स्वत्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबर्‍यांतून दिसते. पण लक्ष्यांत कोण घेतो ?मीयशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी  होय. म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी. पुस्तकरूपाने मात्र ती १९२५ मध्ये प्रकाशित झाली. मेडोज टेलरच्या टिप्पू सुलतान (१८४०) ह्या कादंबरीवरून त्यांनी ती रचिली आहे. त्यानंतर गड आला पण सिंह गेला (१९०४), चंद्रगुप्त (१९०५), रूपनगरची राजकन्या (१९०९), वज्राघात (१९१५), सूर्योदय (१९१७), केवळ स्वराज्यासाठी (१९१८), सूर्यग्रहण (अपूर्ण- १९१९), कालकूट (अपूर्ण- १९२६), मध्यान्ह (अपूर्ण- १९२७) आणि उषःकाल (५ वी आवृ. १९२९) अशा आणखी दहा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या लेखनासाठी त्या त्या विषयासंबंधी उपलब्ध असलेल्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास हरिभाऊ करीतच परंतु दंतकथा, लोककथा , पोवाडे इत्यादींचा उपयोगही तारतम्याने करून घेत. काही काल्पनिक व्यक्तिरेखाही त्यांनी निर्माण केल्या असल्या, तरी ऐतिहासिक वाटाव्या इतक्या जिवंतपणे त्या रेखाटलेल्या आहेत. हाती असलेल्या ऐतिहासिक सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून त्या त्या काळाचे वातावरण आपल्या कादंबर्‍यांतून निर्माण करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. उषःकाल, वज्राघात आणि गड आला पण सिंह गेला  ह्या त्यांच्या विशेष प्रसिद्ध कादंबऱ्या.

त्यांची कादंबरी अवतरताच मराठी कादंबरीने प्रगतीचा एक फार महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्‍मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्‍भुत आणि असंभाव्य घटनांच्या पकडीतून सोडवून वास्तवतेच्या दिशेने विकसित केले. कादंबर्‍यांनी केवळ मनोरंजन करण्याऐवजी समाजास सद्‍बोध करून सन्मार्गास लावावे, अशा बोधवादी भूमिकेतून लिहूनही त्यांच्या कादंबऱ्या प्रचारपुस्तकांच्या पातळीवर आल्या नाहीत. कादंबर्‍यांची प्रकरणे मासिकांतून क्रमशः लिहिण्याच्या पद्धतीमुळे पाल्हाळिक भाषाशैली, प्रमाणबद्धतेचा अभाव, गौण्यगोपनाच्या अतिरेकामुळे अनेकदा होणारा रसभंग इ. दोष त्यांच्या कांदबर्‍यांत दिसतात. तथापि त्यांची दखल घेऊनही आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हणून त्यांचे मानाचे स्थान मान्य करावे लागते.

लोकरंजनाच्या द्वारा लोकजागृती करण्यासाठी त्यांनी करमणूक हे साप्ताहिक काढले (१८९०). त्यांच्या अनेक कादंबऱ्या करमणूकीतूनच प्रसिद्ध झाल्या. त्याशिवाय शास्त्रीय माहिती, इतिहासातील मनोरंजक कथा, आरोग्यविषयक सल्ला, प्रवासवर्णने, कविता, नाटिका, प्रहसने, चुटके, व्यंगचित्रे इ. आकर्षणे त्यात असतच. आजच्या नियतकालिकांतून आढळणारी अनेक सदरे करमणूकीत होती. ज्ञानप्रकाश, सुधारक, मनोरंजन आणि निबंधचंद्रिका  या इतर नियतकालिकांस त्यांनी भरीव सहकार्य दिले होते.

करमणूकीतून हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी (चार भाग, १९१५) मराठी लघूकथेचा पाया घातला. निव्वळ कल्पनेच्या विश्वात रमलेल्या गोष्टीला त्यांनी भोवतालच्या जीवनातील वास्तव शोधण्यास शिकविले. दुष्काळामुळे शेतकर्‍यांना येणारी विपन्नावस्था, पुण्यातील प्‍लेगच्या साथीत लोकांची उडालेली दैना, बुवाबाजीला बळी पडणारी माणसे, संशयी, व्यसनी पुरुष इ. विषयांवर हरिभाऊंच्या स्फुट गोष्टींची कथानके आधारलेली आहेत. त्यांच्या काही कथा इतक्या दीर्घ आहेत, की त्यांची प्रकरणशः विभागणी केलेली आहे. त्यांच्या कादंबरीलेखनातील बहुतेक दोष त्यांच्या कथांतही दिसतात. तथापि याच कथांतून मराठी लघूकथेला आकार घेता आला. ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही त्यांची कथा त्यांनी इंग्रजीत ‘रामजी : अ ट्रॅजेडी ऑफ इंडियन फॅमिन’ हे शीर्षक देऊन अनुवादित केली होती. त्यांनी काही नाटके व प्रहसने लिहिली आहेत. संत सखूबाई (१९११), सती पिंगला (१९२१) ही त्यांची स्वतंत्र नाटके. याशिवाय व्हिक्टर हयूगो, काँग्रीव्ह, शेक्सपिअर, मोल्येर यांच्या नाट्यकृतींची त्यांनी रूपांतरे केली. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी गद्यानुवाद केला.

काही निबंधांतून आणि प्रासंगिक व्याख्यानांतून आपली वाङ्‍मयविषयक मते त्यांनी मांडली आहेत. ‘मराठी वाङ्‍मयाचा अभ्यास’ व ‘विदग्ध वाङ्‍मय’ या विषयांवर त्यांनी दिलेली व्याख्याने प्रसिद्ध झाली आहेत. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या भाषाशास्त्रविषयक व्याख्यानमालेत (विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स) ‘मराठी: इट्स सोअर्सिस अँड डेव्हलपमेंट’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले होते. त्यांचा शेक्सपिअरचा व्यासंग मोठा होता. त्यांनी लिहिलेले शेक्सपिअरविषयक लेख निबंधचंद्रिकेतून प्रसिद्ध झाले होते.

अकोला येथे १९१२ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विपुल साहित्यनिर्मितीबरोबरच त्यांनी लक्षणीय स्वरूपाची समाजसेवा केली. पुण्याचे ‘नूतन मराठी विद्यालय’ आणि ‘किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’ यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. पुणे नगरपालिकेत बरीच वर्षे काम करून पुणे शहराची त्यांनी सेवा केली. त्या नगरपालिकेचे अध्यक्षपदही काही काळ त्यांच्याकडे होते. त्यांचे निधन पुण्यातच झाले. त्यांची जन्मशताब्दी १९६४ मध्ये साजरी करण्यात आली.

संदर्भ :

  • Karandikar, M. A., Hari Narayan Apte, New Delhi, 1968.
  • अदवंत, म. ना. (संपा). हरिभाऊ विविधदर्शन, कोल्हापूर, १९६४.
  • आंबेकर, वि. बा., दातार, बा. वा.,आंबेकर, अ. वि., पवार, सुधाकर, (संपा). हरिभाऊ काळ आणि कर्तृत्व, नाशिक, १९७२.
  •  भिंगारे, ल. म. हरिभाऊ, कोल्हापूर, १९५६.