देशमुख, सदानंद नामदेव : (३० जुलै १९५९). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त कवी, कथाकार, कादंबरीकार आणि ललितगद्य लेखक. सदानंद देशमुख यांच्या कादंबऱ्या, कथा या साहित्यकृतींचे मोल ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिकदृष्ट्या मोठे आहे. त्यांचा जन्म विदर्भातील अमडापूर (जि.बुलढाणा, ता.चिखली) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याच विषयातून त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : कादंबरी तहान (१९९८), बारोमास (२००३), चारीमेरा (२०१६);  कथासंग्रहलचांड (१९९३), उठावण (१९९४), महालूट (१९९५), रगडा (२००६), खुंदळघास (२००७), गाभुळगाभा (२०१२), जमीनजुमला (२०१८); कवितासंग्रहगावकळा (२००५), बळ घेऊन भुईचे (२०१८); ललितगद्य मेळवळ (२००८), भुईरिंगणी (२०१३) इत्यादी. कथा, कविता आणि ललितलेखन या स्वरूपातील त्यांचे संग्रहरूपाने प्रकाशित नसलेले पण नियतकालिकांतून प्रसिध्द झालेले साहित्य विपुल आहे. तळपातळीवरचा शोषित, पीडित, कर्जबाजारी सामान्य माणूस त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. गावगाड्यातील माणसांचे मरणासन्न जगणे, त्यांच्या आत्महत्या, या माणसांचे आर्थिक शोषण, अवहेलना, आर्थिक कुत्तरओढ, कौटुंबिक पातळ्यांवरची आणि सामाजिक पातळ्यांवरची होत असलेली घुसमट अशा सामाजिक विषयांना सदानंद देशमुख यांचे कथात्मक लेखन अधोरेखित करते.
खेड्यातील भीषण पाणीटंचाईचे वास्तवदर्शी चित्रण हा त्यांच्या तहान या कादंबरीचा विषय आहे. पाणीटंचाईच्या समस्येचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या समस्येमुळे साधलेले आणि नंतर ढासळलेले अर्थकारण आणि या दोहोंमध्ये आपल्या आयुष्याची नासाडी करणारा युवक, पाणीटंचाईकडे कानाडोळा करणारे शासन आणि गावकऱ्यांनी संघटितपणे आंदोलनाचे शस्त्र उगारल्यावर थातूरमातूर उपाययोजना करणारे लोकप्रतिनिधी यांचे चित्रण या कादंबरीत आहे. ही कादंबरी जागतिकीकरणानंतरचे भारतीय ग्रामीण वास्तव सूक्ष्मपणे वाचकांसमोर मांडते. बारोमास या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीत शेतकऱ्यांच्या जगण्याचे नानाविध संदर्भ व्यक्त झाले आहेत. कृषिप्रधान म्हटल्या जाणाऱ्या भारतात शेतकऱ्यांची सर्व पातळ्यांवर कोंडी, मुस्कटदाबी कशी होते; शेतकऱ्याच्या हितासाठीच्या साऱ्या यंत्रणा दमणकारी कशा होतात याचे वास्तवदर्शी चित्रण या कादंबरीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे समाजशास्त्र मांडणारी ही कादंबरी आहे. राजकीय व सामाजिक व्यवस्थेबद्दलचा तीव्र संताप आणि या सांस्कृतिक पर्यावरणात आपण एकटे, अगतिक, पराधीन आहोत ही परात्म जाणीव या कादंबरीत अभिव्यक्त झाली आहे. गावगाड्याचे उद्ध्वस्त झालेले सांस्कृतिक पर्यावरण, भ्रष्ट राजकीय यंत्रणा, बदललेले जीवनमान यांमुळे मेटाकुटीला आलेल्या, अर्थकारण ढासळलेल्या शेतकऱ्यांची शब्दातीत व्यथा आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी प्राणपणाने जपलेली माणुसकी या बाबी या कादंबरीतून उत्कटपणे मांडल्या गेल्या आहेत. १९९८ मध्ये प्रकाशित झालेल्या तहान कादंबरीतील गावगाड्याचे वातावरण २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या चारीमेरा मध्ये पार बदलले आहे. शेतजमीन वाहितीत ठेवून पीक घेतले तर पिकाला भाव मिळत नाही. दारिद्र्य कायमच राहते, शेती विकतो म्हटले तर एक पिढी जगवता येईल एवढीही किंमत मिळत नाही. सावकारी आणि बँकाची कर्जवाटप पद्धती देखील बदलली. नव्या जीवनमानाच्या आणि नव्या अर्थकारणाच्या वरवंट्याखाली गेल्या वीस वर्षात शेती आणि शेतीनिष्ठ जीवन भरडले जाऊ लागले. गेल्या दोन दशकात शेतकऱ्याच्या सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक जीवनात मोठी स्थित्यंतरे आली. या स्थित्यंतरांमुळे शेतकरी पार खचून गेला; उमेद हारला. पण ही स्थितीही फार काळ असणार नाही, असा आशावाद मनाशी बाळगून गावगाडा आणि शेतकरी पुन्हा उठून उभा राहातो आहे. तो भूमीनिष्ठा आणि प्रखर जीवननिष्ठा, त्याची नैतिकता आणि कष्टाळूपणा या गुणांनी नव्याने जगण्याचे मार्ग शोधत आहेत. चारीमेरा ही कादंबरी या नव्या बदलांचा कलापूर्ण पण वास्तवदर्शी वेध घेते. जागतिकीकरणाच्या गतिमान प्रक्रियेत सामाजिक दृष्टिकोण, नैतिक मूल्ये, विचार, राजकीय भूमिका या साऱ्या बाबींना बाजारात विक्रीमूल्य येणार असेल आणि विवेक, नैतिकता, प्रबोधनमूल्ये यांचेसह शेतकऱ्यांसारखे वंचित घटक पायदळी तुडविले जाणार असतील तर गंभीर विचार करून कृतिशील अशी जागरुकता शेतकऱ्यांसह एकूणच शेतकरी नसलेल्या माणसांमध्येही निर्माण होण्याची गरज आहे, हे भान सदानंद देशमुख यांच्या कादंबऱ्यांतून गवसते.
तहान, बारोमास, चारीमेरा या कादंबऱ्यांच्या तळाशी संक्रमणकालीन विपथगामी समाजवास्तवाच्या असंख्य रूपांची गुंतवळ आहे. गावगाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, परिसरीय, अस्मानी, सुलतानी वगैरे अनेक प्रश्नांची जाण ज्यांच्या हाती सत्तासूत्रे आहेत अशांना अजिबात नाही, ही स्पष्ट जाणीव बऱ्यापैकी संवेदनशून्य बनलेल्या गावगाड्याबाहेरच्या शहरी जगाला करून देण्याची आणि जगाचे लक्ष गावगाड्यावर केंद्रीत करण्याची प्रामाणिक धडपड या कादंबऱ्यांच्या लेखनप्रेरणांच्या तळामूळाशी आहे. या कादंबऱ्यांमधून मांडलेल्या समकालीन समाजवास्तवातच परिवर्तनाच्या प्रेरणा दडल्या आहेत.
सदानंद देशमुख यांच्या सात कथासंग्रहांतील कथांचे लेखन साधारणपणे १९९० ते २०१८ या अठ्ठावीस वर्षांच्या काळात झालेले आहे. या सर्व कथांना बदलत्या ग्रामीण समाजवास्तवाची पार्श्वभूमी आहे. जागतिकीकरणाच्या गतिमान प्रक्रियेत गावगाडा उदास, भकास आणि दयनीय झाला. ज्यांच्या जगण्याचे केंद्र शेती आहे, त्या माणसांचे अतोनात हाल झाले – होत आहेत. एकाबाजूने समग्र सांस्कृतिक पर्यावरणच झपाट्याने बदलले तर दुसऱ्या बाजूने अर्थकारणात फसलेला, कंबरडे मोडलेला शेतकरी साऱ्या प्रगतीच्या, प्रवाहांपासून पार दूर राहिला. कुटुंब, भाषा, शिक्षण, पेहराव, खानपानाचे पदार्थ व पद्धती, मनोरंजनाची माध्यमे व साधने, संपर्काची माध्यमे व साधने, उपचाराच्या पद्धती व औषधे, जीवन व्यवहार सारे काही फार बदलले पण या बदलाचे केंद्रस्थान असणारा पैसा कधीच पुरेसा हाती नसल्याने शेतकरी मात्र या बदलांच्या आवर्तांच्या बाहेरही राहू शकला नाही आणि आतही आपले स्थान शोधू शकला नाही. परिणामी कायम गोंधळलेल्या स्थितीत शेतकरी बदलांच्या आवर्तनात फरफटत राहतो या बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणापासून शेतकरी वेगळा, अलिप्त राहू शकत नव्हता, आणि पैसाच नसल्याने बदलती जीवनशैली सहजपणे स्वीकारू शकत नव्हता, अशा कोंडीत सापडलेल्या मुस्कटदाबी झालेल्या शेतकऱ्याला व्यापारीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, बाजारीकरण आदी नावांच्या परिघात येणाऱ्या सर्व यंत्रणा सतत लुबाडत राहिल्या, अशा अवस्थेत शेतकरी सापडलेला आहे. हा अगतिक शेतकरी सदानंद देशमुख यांच्या कथांचा नायक आहे. ‘कडकी’, ‘अणक’, ‘कुरण’, ‘इळद’,’लचांड’, ‘उठावण’, ‘वाघरुळ’,’महालूट’,’बरास’,’करंट’,’भगदाड’,’कचाटा’, ‘अमृतफळ’, ‘उतारा’, ‘रगडा’,’लवकांड’, ‘बखाड’,’लाल अंधार’, ‘मांडव’,’सर्कती’,’पळसपापडी’,’गाभुळगाभा’ या आणि अनेक कथांमधून या अगतिक व्यक्तिरेखा त्यांच्या कथांमध्ये येतात. गावगाड्यातले हे स्त्री-पुरुष त्यांच्या सभोवतीच्या साऱ्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणासह कथेत येतात. अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीत ही माणसे आपल्या भावना, वासना, वात्सल्य, वेदना, विचार, क्रौर्य, संयम, लोभ, मोह, प्रेम या साऱ्या गोष्टींचा निचरा करीत राहतात. ही माणसे गावाच्या, शेतीच्या, शिवाराच्या मातीने मळलेली आहेत गरिबी, उपेक्षा, दुःखे यांनी गांजलेली आहेत. रूपानेही ही माणसे चारचौघासारखी तर काही अगदी ओंगळवाणीच आहेत. तरीही ही माणसे माणूसपणाचे सारे पीळ आणि पैलू आपल्या व्यक्तिमत्त्वात जोपासणारी आहेत. या देशातील तळपातळीवरची गरीब कष्टकरी माणसे नीतिमत्ता जोपासणारी आहेत सदाचारी आहेत. ही असीम नीतिमत्ता, हा अभंग सदाचार या देशाचे सामर्थ्य आहे. या कथांमधील या स्त्रीपुरुषांच्या भावविश्वाच्या माध्यमातून सदानंद देशमुख समग्र भारतीय पातळीवर ग्रामजीवनाचा पोत, पदर, पीळ आणि पैलू साकार करतात. भाषेसकट सारा गावगाडाच मृत्युपंथाला लागल्याचे वास्तव साऱ्या देशात असताना सामाजिक मूल्यभावासह परिवर्तनाचा विचार रुजविणाऱ्या सदानंद देशमुख यांच्या कथा आशावाद आणि दिलासा देणाऱ्या आहेत.

 

सदानंद देशमुख यांच्या कथांची भाषा साक्षात ग्रामजीवनाची जिवंत अशी भाषा आहे. अगदी कथांच्या शीर्षकांकडे नजर फिरविली तरी ग्रामजीवनातील भाषेतील जिवंत आणि आशयप्रधान शब्दांचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ ‘भोगवटा’, ‘कडकी’, ‘चिरोटी’, ‘भणक’, ‘इळद’, ‘सारवण’, ‘लचांड’, ‘उठावण’, ‘वाघरुळ ‘ ही सारी कथाशीर्षके ग्रामीण बोलीतली आहेत. अर्थसघन हेल, आशयसमृद्ध म्हणी, वाक्प्रचार, शब्दांच्या पलीकडचा आशय मांडणारी काव्यात्मकता ही आणि अशी सारी सामर्थ्य एकवटलेली बोली सदानंद देशमुख यांच्या कथांमध्ये साऱ्या स्वरूप वैशिष्ट्यांसह प्रकटली आहे. बोलीभाषेतील शब्दश्रीमंतीचा प्रत्यय प्रत्येक कथा वाचताना येतो. गाठोळी, गुंडाळी, गिचमीड, खुंदळणे, खुंदळघास, चिंधीचोळ बारदाणा, दोंबकळी, रेंडकाळणे, गळाठले, बुडपाणी, आप्तमानधपक्या, टेपारणे, तडकबंद, उळनमाळ, भुईतळ, गुतमळा असे कितीतरी शब्द नवे वाटतील असे आहेत. बोलीतील आशयसघन शब्द देशमुखांच्या कथेचे वैभव आहेत. त्यांच्या कथेत बोलीतील कितीतरी जोडशब्द येतात. प्रत्यक्ष संवाद व्यवहारातील हे शब्द वाक्यांत एक अर्थपूर्ण लय निर्माण करतात. बोलीतील म्हणी आणि वाक्प्रचार यांच्या कथांमध्ये ठिकठिकाणी आढळतात. प्रत्यक्षसंवाद व्यवहारातील बोली जशीच्या तशी या कथांमध्ये अवतरल्यामुळे म्हणी व वाक्प्रचारांचे सौंदर्यही जसेच्या तसे या कथांच्या भाषेला लाभले आहे. म्हणी वाक्प्रचारांनी या कथांची भाषा आशयसमृद्ध झाली आहे. “भूईत राबणाऱ्या माणसाले भुईपासून तोडणं म्हणजे थानपित्या लेकराले थानापासून दूर करणं”, “तो तापड बैलासारखा थयथय करीत राहिला”, “मावळतीला सूर्य लाल गोळा होऊन भूईच्या कडेवर ठेवल्यासारखा दिसत होता”, “तासात पेरला दाणा किड्यामुंग्यांनी टोकरून खाणा, तसं झालं”, “भाऊ वखरल्या भूईसारखा मऊ झाला”, “पाऊस भोगल्या रानासारखा तो एकदम तरारुन गेला”अशी कितीतरी अर्थसघन काव्यात्म वाक्ये सघन आशय व्यक्त करणारी आहेत. त्यांच्या कथेच्या भाषेची ही वैशिष्ट्ये थोड्याफार फरकाने त्यांच्या तीनही कादंबऱ्यांत देखील आढळतात.

सदानंद देशमुख यांच्या कवितेत गावगाड्याचे वास्तव चित्रण आले आहे. गावगाड्याचे सांस्कृतिक पर्यावरण आणि समकालीन वास्तव यांचे मर्मस्पर्शी आकलन, विश्लेषण सदानंद देशमुख कविता आणि ललित गद्य या साहित्य प्रकारातून करतात. “शेतीप्रमाणेच भाषेच्या निर्मितीत आणि सर्जक वापरात स्त्रियांचं योगदान फार मोठं आहे. भोवतीच्या निसर्गातील वारा, पाऊस, पशुपक्ष्यांचे, झाडांच्या सळसळीचे आवाज यांना तिने शब्दरूप दिलं. त्यातून स्थळपरत्वे भाषा निर्माण झाल्या. या भाषेतून तिने आपल्या विचारशक्तीचा आणि भावनिक आंदोलनाचा समावेश करून पुढच्या ग्रामविकासात काव्याची निर्मिती केली ” या शब्दांत सदानंद देशमुख यांनी भाषेच्या संदर्भातील स्त्रीचे योगदान अधोरेखित केले आहे. सदानंद देशमुख यांच्या एकूणच साहित्यात स्त्रियांच्या भाषेचे वैभव आणि वैविध्य ठिकठिकाणी प्रकट झाले आहे.

सदानंद देशमुख यांच्या बारोमास या कादंबरीला साहित्य अकादमीचा २००४ या वर्षीचा पुरस्कार मिळाला. याच कादंबरीला महाराष्ट्र शाासन, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार व महाराष्ट्र साहित्यपरिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार देखील मिळाला आहे. या कादंबरीचा हिंदी, इंग्रजी, मैथिली, उर्दू या भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या कादंबरीच्या कथानकावर हिंदी चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. तहान या कादंबरीला मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु. ल. देशपांडे स्मृती पुरस्कार, यशवंतराव दाते संस्थेचा शिक्षण व सहकार महर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळालेले असून या कांदबरीचा हिंदी भाषेत अनुवाद झाला आहे. तहानबारोमास या कादंबऱ्यांचे आकाशवाणीच्या जळगाव, नागपूर व अकोला केंद्रांवरून नभोनाट्य स्वरूपात प्रसारण झाले आहे. खुंदळघास या कथासंग्रहास विदर्भ साहित्य संघाच्या वा. कृ.चोरघडे स्मृती पुरस्कारासह सहकार महर्षी शंकरराव मोहिते पुरस्कार मिळाला असून या संग्रहाचा हिंदी भाषेत अनुवादही झाला आहे. या कथासंग्रहातील सर्कती या कथेवर चित्रपट तयार झाला आहे. चारीमेरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांच्या एकूणच वाङ्मयीन कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील विविध नामवंत साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. चंद्रपूर येथे झालेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देशमुख यांनी भूषविले आहे.
संदर्भ :
  • देशपांडे, अजय (संपा), नागरमोथा (सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा), नागपूर, २०२२.