वॉलर, एडमंड : (३ मार्च १६०६ – २१ऑक्टोबर १६८७). सतराव्या शतकातील इंग्लिश कवी आणि राजकारणी. जन्म इंग्लंडच्या बकिंघमशायर, कोलेशिल येथे झाला होता. तो बॅरिस्टर रॉबर्ट वॉलर आणि त्यांची पत्नी ॲनी हॅम्पडेन यांचा मोठा मुलगा होता. तो दहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. हाय वायकोम्बेमधील रॉयल ग्रामर स्कुल मध्ये मिस्टर डॉबसन यांना भेटल्यानंतरच खऱ्या अर्थाने वॉलरच्या शिक्षणास सुरुवात झाली. लवकरच त्याच्या आईने त्याला १६१८ मध्ये इटन येथे आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात पाठवले. मार्च १६२० मध्ये त्याला केंब्रिजमध्ये दाखल केले गेले पण पदवी न घेताच त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर वॉलरने लिंकनच्या इन येथे प्रवेश घेतला. हे म्हणजेच लंडनच्या चार इन्स कोर्टांपैकी एक ज्यामध्ये बॅरिस्टर यांचा समावेश होता. दोन वर्षांनंतर त्याचे कुटुंब हॉल बार्नमध्ये गेले आणि वारस हक्काने वॉलरला त्याचे घर मिळाले. याच काळात वॉलर चेपिंग वायकोम्बेचा खासदार म्हणून निवडून आला. नंतर राजा चार्ल्सने संसदेशिवाय राज्य करण्याचे निवडले तेव्हा तो १६२९ पर्यंत अमेर्शाम येथे राजाच्या सोबत होता. मात्र या दरम्यान वॉलरने कोणताही चांगला प्रभाव पाडल्याची नोंद नाही. काही वर्षांनंतर, १६३१ मध्ये, वॉलरने ॲनी बँक्सशी लग्न केले. दुर्दैवाने, हे लग्न फार काळ टिकले नाही. १६३४ च्या ऑक्टोबरमध्ये ॲनीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी तिने एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला. लवकरच वॉलर लेडी डोरोथी सिडनीला भेटला व तिच्या प्रेमात पडला. याच दरम्यान वॉलरने तिच्यावर रचलेल्या व अर्पिलेल्या असंख्य कवितांची रचना केली. पण तिने त्याला नकार दिला.
१६४० च्या सुमारास तो सेंट इव्ह्सचा सदस्य म्हणून पुन्हा संसदेत दाखल झाला. समृद्धशाली भाषेमुळे एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्याने प्रसिद्धी मिळविली होती. आपल्या भाषणाच्या जोरावर तो राजावर होणारी टीका टाळण्यात यशस्वी होत गेला. त्याचे व्यक्तिमत्त्व उंचावत चालले होते ज्यामुळे त्याला बर्याच वेगवेगळ्या विषयांवर पुढाकार घेता आला. त्याला चिंता होती कि संसदेच्या दबावामुळे राजाच्या सत्तेत हस्तक्षेप निर्माण होईल. वॉलर राजेशाहीच्या जवळ चालला होता. तो राजा आणि संसद यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील होता. वॉलरने फ्रान्स आणि स्वित्झर्लंडचा प्रवास केला आणि तेथेच त्याने आपली नवीन पत्नी, मेरीसह स्वत:साठी घर तयार केले. असे मानले जाते कि वॉलर टॉवरमध्ये तुरूंगात असताना या दोघांनी छुप्या पद्धतीने लग्न केले असावे. त्याचा पहिला कवितासंग्रह पोएम्स (१६४५) लंडनमध्ये प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाच्या तीन आवृत्त्या निघाल्या. या संग्रहातील अनेक कविता नंतर संगीतबध्द झाल्या. वॉलर अज्ञातवासात असताना राष्ट्रकुल सरकारशी सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी आशावादी होता. त्याची ही इच्छा जानेवारी १६५२ मध्ये पूर्ण झाली जेव्हा त्याला इंग्लंडमध्ये परत जाण्याची परवानगी मिळाली.
वॉलर हा ऑलिव्हर क्रॉमवेलचा दूरचा चुलत भाऊ होता. इंग्लंडला परत आल्यावर त्याने अ पानहाजीरक टु माय लॉर्ड प्रोटेक्टर (A Panegyric to my Lord Protector,१६५५) हा कवितासंग्रह प्रकाशित केला. हा कवितासंग्रह त्याने ऑलिव्हर क्रॉमवेलला समर्पित केला होता. लवकरच त्याची नियुक्ती व्यापार आयुक्त म्हणून करण्यात आली. त्यानंतरच्या काही वर्षांत त्याने क्रॉमवेलच्या समर्थनार्थ अनेक कविता लिहिल्या. मग त्याने १६६० पासून राजा चार्ल्स दूसरा याला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. याच काळात त्याने ‘टु द किंग, अपॉन हिज मजेस्टीस हॅपी रिटर्न’ (१६६०) ही दीर्घ कविता लिहिली. १६७७ मध्ये दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर वॉलर राजकारणापासून काही काळ लांबच राहिला. १६८५ मध्ये राजा जेम्स दूसरा राजसत्तेवर आल्यानंतर तो पुन्हा राजकारणात परत आला. या काळात वॉलरने सलोख्याच्या भावनांना पुरस्कृत करणाऱ्या राजकीय विषयांवर कविता लिहिल्या आहेत. त्याचा कविता संग्रह डिवाईन पोएम्स (१६८५) प्रकाशित झाला. यात ‘ऑफ द लास्ट वर्सेज इन द बुक’ या कवितेचा समावेश होता. १६९० मध्ये मरणोत्तर, वॉलरच्या कवितांचा दुसरा भाग प्रकाशित झाला.
आधिभौतिक (मेटाफिझिकल) काव्याच्या कठीण आणि बौद्धिक काव्य प्रकारास नाकारून वॉलरने काव्यरचना करण्यास अतिशय सोपी आणि सुलभ शैली स्वीकारली. काव्य प्रकारातील वीरोचित द्विपदी यावर संस्कार करून त्याने नवीन शैली उदयास आणली. अलेक्झांडर पोप या कवीने याच शैलीला रूपांतरित करून त्यात सुधारणा घडवून स्वयंपूर्ण द्विपदी ही नवीन शैली तयार केली, जी आजही प्रचलित आहे. यात वॉलरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अठराव्या शतकात वॉलरच्या कवितांना अत्यंत आदराचे असे उच्चस्थान होते यात काहीच आश्चर्य नाही. इडनने लिहिले आहे की वॉलरने “प्रथम लेखनाला सहज कला बनविली.” अलेक्झांडर पोप यांनी वॉलरला एक निष्णात कवी म्हणून मान्यता दिली आहे. बायोग्राफीक ब्रिटानिका (१७६६) मध्ये त्याला “इंग्लंडने आजपर्यंत निर्माण केलेला सर्वात प्रसिद्ध गीतकार कवी” असे संबोधले गेले आहे. वॉलरची प्रतिष्ठा आणि वाचकवर्ग हळू हळू कमी होत चालला आहे मात्र आजमितीस तो त्याच्या ‘गो, लव्हली रोझ’ आणि ‘ऑन अ गर्डल’या गीतांसाठी ओळखला जातो.
इडिमः मुळे वॉलरचा मृत्यू झाला आणि त्याला सेंट मेरी अँड ऑल सेंट्स चर्चच्या चर्चगार्डमध्ये दफन केले गेले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Edmund-Waller
- https://www.poetryfoundation.org/poets/edmund-waller
- https://poemanalysis.com/edmund-waller/biography/
समीक्षण : लीना पांढरे