ऑर्वेल, जॉर्ज : (२५ जून १९०३ – २१ जानेवारी १९५०). ब्रिटिश कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत. खरे नाव एरिक आर्थर ब्लेअर. जन्म भारतात मोतीहारी (बंगाल) येथे. १९११ मध्ये ससेक्स मधील बोर्डिंग स्कूल आणि नंतर इंग्लंडमधील ईटन येथे स्कॉलरशिप मिळवून १९१७ ते १९२१ याकाळात शिक्षण. आल्डस हक्स्ले हे शिक्षक म्हणून लाभले आणि कॉलेजमध्येच पहिले लेखन प्रकाशित. १९२२ मध्ये परंपरेप्रमाणे बर्मा येथे पोलीस दलात डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट म्हणून नोकरीस सुरुवात.

१९२७ मध्ये सुटीसाठी इंग्लंडला आल्यावर बर्माला परत न जाण्याचा निर्णय. त्यानंतर सुमारे दीड वर्ष त्याने पॅरिसमध्ये भ्रमंती आणि लेखन करण्यात घालविले. नंतर ईस्ट जिलीया मधील ऑर्वेल या नदीवरून आडनाव घेऊन जॉर्ज ऑर्वेल ह्या टोपणनावाने तो लिहू लागला.

डाउन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन (१९३३) या पॅरिस मधील वास्तव्यातील अनुभवांवर आधारित या पहिल्या पुस्तकानेच सुरूवातीला त्याला नाव मिळवून दिले. बर्मिज डेज (१९३४) या पहिल्या कादंबरीतून त्याने ब्रिटीश साम्राज्यवादावर हल्ला चढविला. बर्मा येथे असतांना आलेल्या अनुभवांवर आधारित दोन प्रकरणे या कादंबरीत प्रविष्ट आहेत. क्लर्जिमन्स डॉटर (१९३५) मधून शेतकरी आणि श्रमिकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केले तर कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंग (१९३६) या कादंबरीत मध्यमवर्ग आणि सरंजामी वर्ग यांचे चित्रण आहे. कमिंग अप फॉर एयर (१९३९) यातून त्याने एका मध्यमवर्गीय माणसाचे आधीच्या आणि समकालीन इंग्लंड बाबतचे स्मरणरंजन आणि भाष्य मांडले. ॲनिमल फार्म (१९४५) व नाइन्टीन एटीफोर (१९४९)  ह्या त्याच्या कादंबऱ्यांनी खळबळ उडवून दिली. ॲनिमल फार्म हे रशियन राज्यक्रांतीवरील उपरोधप्रचुर रूपक होय. “सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत”, यावर आधारित प्राण्यांचे रूपक वापरून उपरोधातून सटीक भाष्य या कलाकृतीत केले आहे. ऑर्वेलच्या या कादंबरीला त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती समजले जाते. नाइन्टीन एटीफोर  मध्ये स‌र्वंकष राजसत्तेवर विदारक टीका केलेली आहे. यातील बिग ब्रदर आणि थॉट ऑफ पोलिस सारख्या संज्ञा फार प्रभावी ठरल्या.या दोन्ही कादंबर्‍यांसाठी हॉल ऑफ फेम पुरस्काराने गौरविण्यात आले.

कादंबरी खेरीज रोड टू विगन पिअर (१९३७) हे उत्तर इंग्लंड भागातील लँकाशरमघील श्रमिक खाणकामगारांचे  यथार्थ वर्णन करणारे पुस्तक आणि होमेज टू कॅटलोनिआ (१९३८) हे स्पेनमधील यादवी युध्दासंबंधीचे आपले अनुभव चित्रित करणारे पुस्तक हे त्याचे राजकीय स्वरूपाचे लेखन. या यादवी युद्धात सेकंड लेफ्टनंट म्हणून काम करतांना गंभीर स्वरूपाची इजा होऊन त्याचा आवाज कायमस्वरूपी बाधित झाला. इन्‌साइड द व्हेल (१९४०), क्रिटिकल एसेज (१९४६) आणि शूटिंग ॲन एलिफंट (१९५०) हे त्याच्या टीकात्मक लेखांचे संग्रह. त्याची स‌मीक्षा काही ठिकाणी पूर्वग्रहदूषित वाटली तरी मर्मग्राही आणि स्वतंत्र विचारांची निदर्शक आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बी.बी.सी.) वरील कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याने उचलली होती. १९४३ मध्ये बी.बी.सी. सोडून द ट्रिब्यूनचा संपादक म्हणून त्याने काम पाहिले. या काळात त्याने पत्रकार म्हणून विविध वृत्तपत्रातून लेख आणि परीक्षण लिहिले. याशिवाय समीक्षेची लेखमाला लिहिली. द लॉयन अँड द युनिकॉर्न (१९४१) सारखी इंग्लंड बाबतची पुस्तके आणि चार्ल्स डिकन्सच्या पुस्तकांवर निबंधांचे लेखन केले. लंडन येथे त्याचे निधन झाले. लहानपणीच्या कष्टप्रद दिवसांच्या आठवणीवर आधारित आत्मचरित्रपर निबंध  सच,सच वेअर द जॉयज (१९५३) मृत्यूपश्चात प्रकाशित झाले.

संदर्भ :

  • www.britannika.com