बार्बाउल्ड, ॲना लेटिटिया (एकिन) : (२० जून, १७४३ – ९ मार्च, १८२५). प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका, कवयित्री आणि संपादक. राजकीय आणि सामाजिक विषयांवर सर्वोत्तम लेखन करण्याबद्दल ती सर्वश्रुत आहे. ती तत्कालीन ब्रिटिश साहित्यात श्रीमती बार्बाउल्ड म्हणून ओळखली गेली. जन्म इंग्लंडच्या लेसेस्टरशायर, किबवर्थ हार्कोर्ट येथे झाला. ॲना एका उदारमतवादी मोठ्या कुटुंबातील शाळा शिक्षक जॉन एकिनची एकुलती एक आणि प्रामुख्याने घरी शिक्षण घेतलेली मुलगी होती. ती वर्किंग्टन, लँकशायर येथे वयाच्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते तीस वर्षाची होईपर्यंत राहिली. याच ठिकाणी तिच्या वडिलांनी नॉन -कॉन्फॉर्मिस्ट प्रोटेस्टंट अकादमीमधे तिला शिकविले. तेथे तिला तिच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी शिक्षण आणि साहित्यिक कलागुणांची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. १७७४ मध्ये तिने रोचेमोंट बार्बाउल्ड या फ्रेंच प्रोटेस्टंट पाद्रीशी लग्न केले. दुर्देवाने बार्बाउल्ड कुटुंबाला मानसिक आजाराचा इतिहास होता आणि मानसिक आजार नवीन पिढीकडे संक्रमित होऊ शकतो या भीतीने ॲना आणि रोचेमोंट यांनी अपत्य जन्माला घालणे नाकारले. तथापि, या जोडप्याने ॲनाच्या भावाचा मुलगा, चार्ल्स याला दत्तक घेतले आणि त्याला स्वतःचे मूल मानून त्याचे संगोपन केले.

ॲनाने अनेक प्रदीर्घ कविता रचल्यात, साहित्यिक परीक्षण आणि विविध विषयांवर राजकीय भाष्यही केले. तिच्या कविता मूलतः १८ व्या शतकातील चिंतनात्मक स्तोत्राच्या स्वरूपात आहेत. प्रामुखाने ती तिच्या ‘लाइफ! आइ नो नॉट व्हॉट दाऊ आर्ट’ या स्तोत्रासाठी प्रसिद्ध झाली होती. तिच्या सर्वात महत्वाच्या कवितांमध्ये ‘कोर्सिका'(१७६८) आणि ‘द इन्व्हिटेशन’ (१७७३) यांचा समावेश केला जातो. तिने आणि तिच्या पतीने सफोकमध्ये त्यांची स्वतःची शाळा चालवली आणि त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या बालशिक्षण वाङ्मयासाठीही ती प्रसिद्ध झाली होती. तिच्या लेसन फोर चिल्ड्रन (१७७८) आणि त्यानंतरचे हिमन्स इन प्रोझ फॉर चिल्ड्रन (१७८१) ह्या कृती घरा-घरात आणि शाळेत लोकप्रिय झाल्या होत्या.

१७९० च्या दशकात ॲनाच्या लेखनाचा केंद्रबिंदू राजकीय सुधारणांकडे वळला होता. तिचे ॲन ॲड्रेस टू द अपोझर्स ऑफ द रिपिल ऑफ द कॉर्पोरेशन अँड टेस्ट ॲक्टस (१७९०) हे पुस्तक म्हणजे मतभेदांच्या नागरी हक्कांवरील राजकीय वादाच्या दरम्यान लिहिलेले सर्वात उल्लेखनीय राजकीय पत्रक आहे. या कायद्यांद्वारे जवळजवळ एका शतकासाठी मतभेदकांचे अधिकार मर्यादित राहिले होते. तसेच द एपिस्टल टू विल्यम विल्बरफोर्स (१७९१) या सारख्या कवितेमधून ब्रिटनच्या गुलामगिरी धोरणास ॲनाने विरोध दर्शिवला. विल्बरफोर्सच्या अनेक समर्थकांप्रमाणे तिने आणि तिच्या कुटुंबाने अनेक वर्षांपासून साखरेवर बहिष्कार घातला होता. कारण हे असे एक उत्पादन होते जे कॅरिबियनमधील ब्रिटिश वसाहतींमधून आयात केले गेले होते आणि जेथे गुलामांचा ऊस कापणीसाठी वापर केला जात होता. पुढे १७९३ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांमधील शत्रुत्वाच्या विरोधात तिने सिन्स ऑफ गव्हर्नमेंट, सिन्स ऑफ द नेशन हे पुस्तक लिहिले. ॲनाने तिच्या भावासोबत विविध वाङ्मयीन प्रकल्पांवर काम केले. तिच्या भावाने अनेक वर्षे मंथली मॅगझीन नावाच्या नियतकालिकाचे संपादन केले आणि ॲनाने त्यात नियमित आपले लेखिका म्हणून योगदान दिले. तिने विल्यम कॉलिन्सचे पोएटिकल वर्क्स (१७९४) आणि द ब्रिटिश नॉव्हेलिस्ट्स (१८१०) हे खंड संपादित केले.

कालांतराने दुर्दैवाने रोचेमोंट बार्बाउल्ड मनोरुग्ण झाला आणि हिंसकही बनला. जानेवारी १८०८ मध्ये त्याने ॲनावर चाकू हल्ला केला, मात्र ती खिडकीतून बागेत उडी मारून पळून गेली. एकंदरीतच त्यामुळे तिचे वैवाहिक आयुष्य बिघडले. नंतर रोचेमोंटने नदीत उडी मारून आत्महत्या केली. ॲनाचे स्वतंत्रपणे प्रकाशित होणारे शेवटचे लेखन एटीन हंड्रेड अँड इलेव्हन, अ पोएम (१८१२) होते. या कवितेत ॲनाने ब्रिटन आणि फ्रान्समधील सातत्याने चालणाऱ्या युद्धावर टीका केली आहे. यानंतरही ॲना लिहित राहिली; परंतु तिने तिचे लिखाण प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला नाही. १८२५ मधे तिच्या मृत्यूनंतर, तिची भाची लुसी एकिनने ॲनाच्या साहित्याचे दोन संग्रह द वर्क्स ऑफ ॲना लेटिटिया बार्बाउल्ड, विथ ए मेमोअर बाय लुसी एकिन (१८२५) आणि अ लेगसी फॉर यंग लेडीज (१८२६) प्रकाशित केले. लुसी एकिनने ॲनाच्या हस्तलिखितांमधून या संग्रहासाठी साहित्य निवडले होते.

एकंदरीतच, ॲनाचे लेखन तिच्या विचारांसारखेच विशाल आहे. तिच्या कवितांनी तसेच निबंध, साहित्यिक समीक्षण, शैक्षणिक आणि राजकीय लेखनाने ती प्रशंसा आणि निंदा अशी दोन्हीची धनी झाली. ॲना तिच्या हयातीतच अलौकिक बुद्धिमत्ता आणि प्रतिभेसाठी प्रसिद्ध झाली होती. ऑलिव्हर गोल्डस्मिथ, सॅम्युअल टेलर कोलरिज आणि विल्यम वर्ड्सवर्थ या तिघांनी तिच्या कवितेची भरभरून प्रशंसा केली. ॲना प्रणयरम्य (रोमँटिक) कालखंडातील एक अग्रगण्य लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली. तिचा मृत्यू लंडनजवळील स्टोक न्यूयिंग्टन येथे झाला.

संदर्भ :

  • Britannica, The Editors of Encyclopaedia. “Anna Laetitia Barbauld”. Encyclopedia Britannica, 16 Jun. 2021.
  • https://www.britannica.com/biography/Anna-Laetitia-Barbauld. Accessed 29 July 2021.

    समीक्षण :  लीना पांढरे