समुद्र व जलाशयाच्या तळावर राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे, रंध्रे किंवा भोके असतात म्हणून त्यांच्या संघाला छिद्री संघ म्हणतात. या संघात सु. ५,००० जाती आहेत. बहुतेक स्पंज समुद्री आहेत; परंतु त्यांच्या सु. २० जाती गोड्या पाण्यातही आढळतात.समुद्रात ओहोटीच्या रेषेपासून ५-६ किमी. खोलीपर्यंत छिद्री प्राणी आढळतात. हे प्राणी जलपृष्ठाखालील खडकांना, शंखांना, शिंपल्यांना व खेकड्यांच्या कवचाला चिकटलेले असतात. प्रौढ छिद्री प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. ते वनस्पतींसारखे दिसतात. स्पंज उभ्या नळकांड्यासारखे, दंडगोलाकार व पुष्पपात्रासारखे असतात.
छिद्री संघ

स्पंज बहुपेशीय असून त्यांमध्ये ऊतींचा अभाव असतो. परंतु ऊतीनिर्मितीची काही लक्षणे दिसून येतात. स्पंजाच्या देहभित्तीमध्ये बाह्यस्तर आणि अंत:स्तर असतात. बाह्यस्तर चपट्या पेशींचा असतो. स्पंजपोकळीचा अंत:स्तर विशिष्ट पेशींचा बनलेला असतो. या पेशींना जत्रुक पेशी म्हणतात. जत्रुक पेशी अंडाकार असून त्यांच्या एका टोकाला नरसाळ्यासारखी आकुंचन-प्रसरण पावणारी गळपट्टी (जत्रुक किंवा ग्रैवेय म्हणजे कॉलर) असते. या पेशींच्या मोकळ्या टोकावर एक पक्ष्माभिका असते. या दोन स्तरांमध्ये एक मधला स्तर असतो. या स्तरात सांगाड्याचे अथवा कंकालाचे घटक व मुक्त हालचाल करणाऱ्या आणि सतत आकार बदलणाऱ्या अमीबीय पेशी (ॲमीबोसाइट) असतात. स्पंजाचा सांगाडा हा कंटिकांचा, स्पंजिन-तंतूंचा किंवा दोन्हींनी बनलेला असतो. काही स्पंजांमध्ये सांगाडा नसतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेटाच्या किंवा सिलिकापासून तयार झालेल्या असून त्या विविध आकारांच्या असतात.

देहभित्तिकेत अनेक अंतर्वाही (आत उघडणारी) छिद्रे असतात. त्याचप्रमाणे नाली, स्पंजपोकळी आणि एक वा अनेक बहिर्वाही छिद्रे असतात. अंतर्वाही छिद्रांमधून पाणी नालींद्वारे शरीरातील स्पंजपोकळीत येते. पाण्याबरोबर ऑक्सिजन व अन्नकण आत येतात. पक्ष्माभिका एकसारख्या पुढे-मागे हलत असल्याने आत आलेले पाणी बहिर्वाही छिद्रांतून बाहेर जाते. जत्रुक पेशी प्लवक व सेंद्रिय अन्नकण आत घेऊन त्याचे पचन करतात. एक लिटर आकारमानाचा स्पंज एका तासाला ३५—१२५ लिटर पाणी गाळतो.

बहुतेक स्पंज उभयलिंगी असतात. त्यांच्यात अलैंगिक व लैंगिक पद्धतीने प्रजनन होते. अलैंगिक प्रजनन विखंडन, मुकुलन अथवा पुनरूद्भवनाने होते. लैंगिक प्रजननामध्ये शरीरातच फलन होते व डिंभ तयार होऊन बाहेर पडतो. काही काळ मुक्त पोहल्यावर डिंभ आधाराला चिकटतो व त्यापासून नवीन स्पंज तयार होतो. जगभर स्पंज गोळा करावयाचा मोठा व्यवसाय आहे. हे स्पंज वाळवून व विरंजन करून विकतात. स्पंजातील पेशी मरून गेल्या तरी त्यांच्या वसाहतींचे सांगाडे राहतात, यालादेखील स्पंज म्हणतात. या स्पंजाचा उपयोग प्राचीन काळापासून आंघोळीसाठी केला जात आहे. याच उद्देशाने आता बाजारात जे बाथ-स्पंज मिळतात, ते कृत्रिम रीत्या तयार केलेले असतात. एलीफंट इयर स्पाँजमध्ये ‘एजेलॅस्टॅटिन’ या गटातील अल्कलॉइडे असतात. वैज्ञानिकांच्या मते कर्करोगावरील उपचारात त्यांचा उपयोग होऊ शकतो.

एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव उत्क्रांत होताना पेशींच्या श्रमविभाजनासाठी जी जनुके आवश्यक असतात ती छिद्री संघात आढळली आहेत. छिद्री संघात सांगाड्यातील घटकांच्या गुणधर्मावरून पुढील तीन वर्ग केले जातात.

कॅल्केरिया: या वर्गात सायकॉन, ग्रँशिया अशा स्पंजांचा समावेश होतो. हे स्पंज आकाराने लहान व उंचीला कमाल १० सेंमी. असतात. यांचा सांगाडा कॅल्शियमाच्या कंटिकांचा बनलेला असून या कंटिका एक-आरी, तीन-आरी किंवा चार-आरी असतात.

हेक्झॅक्टिनेलिडा : या वर्गात युप्लेक्टेला (व्हिनस फ्लॉवर बास्केट), हायलोनेमा या स्पंजांचा समावेश होतो. हे स्पंज आकाराने मध्यम व उंचीला कमाल १ मी. लांब असतात. यांच्या सांगाड्यात कॅल्शियमाच्या कंटिका असून त्या सहा-आरी असतात.

डेमोस्पंजिया : या प्रकारात क्लायोना, बाथ-स्पंज, स्पाँजिला (गोड्या पाण्यातील) अशा स्पंजांचा समावेश होतो. यातील काही आकाराने लहान तर काही १ मी.हून अधिक लांब असतात. काहींमध्ये सांगाडा नसतो तर काहींचा सांगाडा सिलिकांच्या कंटिकांचा, स्पंजिन-तंतूंचा आणि काहींमध्ये दोन्हींचा बनलेला असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा