शिंदी (फीनिक्स  सिल्व्हेस्ट्रिस): (१) वनस्पती, (२) फुलोरा, (३) फळे.

(वाइल्ड डेट पाम). खजुराच्या झाडासारखा दिसणारा एक वृक्ष. शिंदी हा वृक्ष ॲरेकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फीनिक्स सिल्व्हेस्ट्रिस आहे. ताड, माड, सुपारी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. शिंदी हा वृक्ष मूळचा भारतातील असून म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगला देश या देशांतही तो आढळतो. भारतात हा वृक्ष समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. बहुधा तो ओलसर गाळ असलेल्या जमिनीत, ओढ्यानाल्यांच्या काठी वाढलेला दिसून येतो.

सर्वसाधारणपणे शिंदी वृक्षाची उंची १०–१५ मी. असते. खोडाचा घेर सु. ४० सेंमी. पर्यंत असू शकतो. शिंदीच्या वृक्षाला फांद्या क्वचितच दिसतात. गळून पडलेल्या पानांच्या देठांच्या वणांमुळे खोड खरबरीत दिसते. पाने संयुक्त, एकाआड एक, मोठी व ३–५ मी. लांब असतात. पानांचे देठ सु. १ मी. लांब असून त्यांवर काटे असतात. देठाच्या मध्यशिरेवर अनेक अरुंद, भुरकट करडी व ताठर दले असतात. ती सु. १५–४५ सेंमी. लांब व चिवट असून त्यांच्या टोकांना तीक्ष्ण काटे असतात. फुलोरा पांढऱ्या रंगाचा, सु. १ मी. लांब, पानांच्या बगलेतून येतो. फुलोऱ्यात नर-फुले व मादी-फुले स्वतंत्र असतात. मादी-फुले हिरवी, फुलोऱ्याच्या तळाकडे असतात, तर नर-फुले पांढरट, फुलोऱ्याच्या टोकाकडे असतात. मृदुफळ आयत-लंबगोल, शेंदरट पिवळे, गोड असून दोन्ही टोकांना बोथट असते. फळात बी एकच असून त्यावर एका बाजूला खोलगट खाच असते.

शिंदीच्या खोडावर खाच पाडून त्यातून पाझरणारा रस मडक्यांमध्ये गोळा करतात. ताज्या रसापासून गूळ व जेली तयार करतात. तसेच ताजा रस निरा म्हणून पितात. शिंदीच्या निरेचे किण्वन झाले की शिंदी तयार होते. ती मद्य म्हणून पितात. फळे गोड, शीतल व खाद्य असतात; ती आरोग्य पुन:स्थापक, कामोत्तेजक व मेदवृद्धी करणारी असून त्यांपासून मुरंबा, जेली, शिर्का तयार करतात. पानांचा उपयोग छपरे, चटया, हातपंखे, टोपल्या, पिशव्या, झाडू, केरसुण्या, मासे पकडण्याची जाळी इ. तयार करण्यासाठी होतो. देठ आणि मध्यशिरांचा उपयोग दोर बनवण्यासाठी करतात. खोड कठीण असून त्यापासून डिंक मिळतो.