तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणे उठून दिसतो. कधीकधी याला खंडीय पठार वा टेबल डोंगर असेही म्हणतात. महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील पाचगणीचे टेबललँड हे याचे परिचित उदाहरण आहे. पाचगणीच्या टेबललँडची सस.पासूनची उंची सुमारे १,३८७ मी. असून त्याच्या सपाट माथ्याचे क्षेत्र सुमारे ४० हेक्टर आहे. आशियातील हे सर्वांत मोठे टेबललँड असल्याचे समजले जाते. त्याच्यावरून दिसणारा सूर्योदय, सूर्यास्त आणि परिसराचा देखावा विशेष मनोहारी असतो. टेबललँडची उंची २,००० मी. पर्यंत, तर क्षेत्रफळ शेकडो चौ. किमी.पर्यंत असू शकते.

मोठ्या पठाराची सर्व बाजुंनी झीज (क्षरण) होत जाऊन बनलेल्या अधिक लहान भूरूपाला मेसा म्हणतात. काही अवशिष्ट शैल टेबललँड अथवा मेसासारखे दिसतात. पृष्ठभागी अग्निज खडक वा पिंडाश्म यांसारख्या कठीण खडकांचा व त्याखाली गाळवटी खडक वा पाटीचा दगड (स्लेट) यांसारख्या मऊ खडकांचा थर असतो. नदी, नाले, वारे यांनी मऊ खडकाची अधिक झीज होते आणि कठीण खडकाखालील आधार निघून गेल्याने त्याचे कडे तुटतात. अशा प्रकारे तीव्र उताराच्या बाजू असलेले टेबललँड तयार होते. टेबललँडची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दीर्घ काळ झीज होत राहिल्यास ते लहान होत जाऊन ब्यूट (स्कंधगिरी) हे भूरूप तयार होते. त्याला फार्ट्रेस हिल असेही म्हणतात. वाईजवळील पांडवगड हे याचे उदाहरण म्हणता यईल. कोठे कोठे टेबललँड दऱ्यांमुळे अधूनमधून खोलवर कापले गेलेले आढळते. या दऱ्या घळई (निदऱ्या) व कॅन्यन यांच्यासारख्या असतात.

समीक्षक : वसंत चौधरी