(पब्लिक हेल्थ). सर्वसामान्य लोकांच्या किंवा एकूण समाजाच्या आरोग्यविषयक स्थितीला ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. सर्व लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, आरोग्याची गुणवत्ता वाढविणे आणि त्यात सुधारणा करणे यांसाठी समाजाचे संघटितपणे केलेले प्रयत्न म्हणजे सार्वजनिक आरोग्य होय. सार्वजनिक आरोग्य हे जसे विज्ञान आहे, तसेच ती एक व्यवस्थापन कलाही आहे. यामुळे लोकांच्या आजारांना प्रतिबंध होतो. विज्ञानाच्या विविध शाखा, कौशल्ये आणि लोकसमजुती यांचा यात अंतर्भाव होतो. अशा रीतीने सर्व लोकांचे निरोगी आरोग्य टिकविणे आणि त्यात सुधारणा करणे यांसाठी सार्वजनिक आरोग्य प्रणाली सामूहिक कृतीद्वारे वापरतात. रोगांचा प्रतिबंध करणे, सर्व लोकांच्या आरोग्यविषयीच्या गरजा भागविणे यांच्यावर या प्रणालीत भर देतात आणि त्यासाठी या प्रणालीतील कार्यक्रम सेवा व तिच्याशी निगडित संस्था यांचा उपयोग करून घेतात. या उद्दिष्टांशिवाय सार्वजनिक आरोग्यविषयक पुढील पूरक उद्दिष्टेही असतात. उदा., रोगांचे प्रमाण, अकाली होणारे मृत्यू, अनारोग्य, कुपोषण इ. कमी करण्याची कामे करणे. यातून आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे आपसूकच सार्वजनिक स्वच्छता साध्य होते.

रोगांचा प्रतिबंध करणे, शारीरिक व मानसिक आरोग्य आणि स्वच्छता टिकवून ठेवणे, संसर्ग नियंत्रणात आणणे, आरोग्यविषयीच्या सेवा संघटित करणे आणि माणसाचा आयु:काल वाढविणे या बाबी सार्वजनिक आरोग्यविषयक प्रणालीत येतात. सार्वजनिक जीवनातील प्रश्नांचा विचार करताना लोकांमध्ये घडणाऱ्या परस्परक्रियांतून आरोग्यात सुधारणा करणे आणि रोगांवर उपचार करणे, या बाबीही सार्वजनिक आरोग्य या संकल्पनेत येतात.

विज्ञानाच्या विविध शाखा आणि निरनिराळी तंत्रे यांचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध येतो. उदा., रोगपरिस्थितिविज्ञान आणि जैवसंख्याशास्त्र. या विज्ञानशाखा सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात मूलभूत महत्त्वाच्या आहेत. यांचा उपयोग करून सार्वजनिक आरोग्याच्या दर्जाचे मापन करता येते. तसेच आरोग्यविषयीच्या समाजात असलेल्या प्रवृत्ती किंवा समजुती लक्षात येतात. रोगपरिस्थितिविज्ञानाच्या भक्कम संशोधन पद्धतीमुळे रोगाची कारणे लक्षात येतात. विविध परिस्थिती कशा उद्भवितात आणि विनाशक जोखमी कोणत्या हे निश्चित करण्याला हे संशोधन उपयुक्त असते. उदा., एड्स या विकाराचे कारण असलेल्या एचआयव्ही विषाणूने होणाऱ्या संसर्गाचे स्वरूप मुख्यत: या तंत्राने स्पष्ट होते. सूक्ष्मजीवविज्ञान, विषविज्ञान इ. विज्ञानशाखांमुळे पर्यावरणातील जैव, रासायनिक आणि भौतिकीय धोके ओळखण्यास मदत होते. पर्यावरणीय दोष ओळखून ते सुधारणेही त्यांच्यामुळे शक्य होते. सामाजिक वर्तनाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून मूल्यमापन सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत मोलाचे ठरत आहे. कारण उद्योग नसणे, एकाकीपणा जाणविणे, धूम्रपानासारखे व्यसन इत्यादींमुळे अकाली मृत्यू होणे, चिरकाली रोगांमुळे येणारी विकलांगता यांच्यात होणाऱ्या वाढीचे प्रमाण साहाय्यभूत ठरू शकतात.

सार्वजनिक आरोग्य या सेवेचा वैद्यकावरच नव्हे, तर वैद्यकाच्या तत्त्वज्ञानावरही प्रभाव पडतो. शिवाय समाजाच्या हितासाठी पर्यावरणावर नियंत्रण राखणे आणि ते नियंत्रणात ठेवणे यांकडे खास लक्ष द्यावे लागते. यांमुळे घर बांधणे, पाणीपुरवठा, खाद्यपदार्थ / खानपान सेवा या नेहमीच्या बाबींशी सार्वजनिक आरोग्यविषयक कामे निगडित होतात. अशा रीतीने बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, स्वच्छता अभियंते, तापन व वायुवीजन अभियंते, कारखाने व अन्न यांचे निरीक्षक, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकीविद, विषवैज्ञानिक असे अगदी भिन्न विषयांतील तज्ज्ञ सार्वजनिक आरोग्याशी निगडित असतात. कारण सार्वजनिक आरोग्य टिकविणे आणि सुधारणे हे एक व्यापक क्षेत्र आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तिगत आरोग्यविषयक सोयी, सुरक्षितता व समाजकल्याण या बाबीही सार्वजनिक आरोग्याची कामे करताना लक्षात घेतात; कारण पर्यावरणविषयक धोके कमी करणे, हा सार्वजनिक आरोग्याचा विषय होतो.

सार्वजनिक आरोग्य टिकविणे, त्याचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे यांकरिता माहिती मिळविण्यासाठी ठरावीक पद्धती वापरतात. यांतून लक्षात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी कृतीतून प्रत्यक्षात उतरण्यासाठी व्यावसायिक व्यवस्था आणि यंत्रणा आवश्यक असतात. याकरिता आहार, पर्यावरण, तरंगरूपातील ऊर्जा किंवा धूम्रपान यांसारखे व्यसन यांचा रोग उद्भविण्याशी आणि त्याचा प्रसार होण्याशी असलेला संबंध स्पष्ट करतात. याच्या आधारे सरकार कायदे आणि नियम तयार करते. साथीच्या रोगाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन वेगळी यंत्रणा उभारते. उदा., संसर्गजन्य रोगाचा देशात शिरकाव होऊ नये म्हणून बंदरे व विमानतळ या ठिकाणी तपासणी केली जाते. येथे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून साथीच्या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बाधित व्यक्तींचे विलगीकरण सक्तीचे करते. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न, साधनसंपत्तीच्या मर्यादा, सार्वजनिक आरोग्यविषयक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इ. बाबी लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा आराखडा तयार करावा लागतो. यांव्यतिरिक्त या क्षेत्रांतील अत्याधुनिक प्रगती, तसेच न सुटलेले विशिष्ट प्रश्न यांचाही विचार असा आराखडा तयार करताना करतात.

भारतातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढविणे, तिचे चांगले पोषण होणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे भारताच्या घटनेनुसार शासनाचे प्राथमिक कर्तव्य ठरले आहे. हे मार्गदर्शक तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नाला शासनाने योग्य अग्रक्रम दिला आहे. यांविषयीचे अधिनियमन आणि तरतुदीही घटनेत दिलेल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य हा मुख्यत: राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे; तथापि आरोग्याची पातळी सुधारण्यासाठी केंद्र शासन राज्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करते. तसेच सार्वजनिक आरोग्यविषयक विविध योजना आखून त्यांसाठी राज्यांना आर्थिक मदतही करते.

जागतिक स्तरावरही जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) विविध उपक्रम, कार्यक्रम यांद्वारे आरोग्यविषयक जनजागृती करीत असते.