ह्यूएल, विल्यम : (२४ मे १७९४—६ मार्च १८६६). इंग्रज तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि इतिहासकार. त्याचा जन्म जॉन ह्यूएल आणि एलिझाबेथ बेनिसन या दांपत्यापोटी लँकेस्टर (लँकेशर) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन तेथल्या व्याकरण शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मदतीने त्याने वेस्टमोरलँडमधील हेव्हरशाम व्याकरण शाळेत प्रवेश केला. तिथे शिष्यवृत्ती मिळवून त्याने केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. त्याच्या आयुष्याचा बराच भाग त्याने ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे व्यतीत केला. तेथे तो शिकला; त्याने शिकविलेही. १८२८–३२ ह्या कालावधीत तो खनिजशास्त्राचा प्राध्यापक होता. नैतिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले (१८३८–५५). केंब्रिज विद्यापीठाचा कुलगुरू म्हणूनही तो काही काळ कार्यरत होता. यामिकीपासून (Mechanics) गतिकीपर्यंत (Dynamics) अनेक भौतिकी विज्ञानांत त्याला स्वारस्य होते; तथापि नीतिशास्त्र आणि विगमनविषयक प्रणाली (Inductive Theory) ह्यांच्यावरील लेखनासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे.

ह्यूएलने लिहिलेल्या ग्रंथांत हिस्टरी ऑफ द इंडक्टिव्ह सायन्स फ्रॉम द अर्लिएस्ट टू प्रेझेंट टाइम (३ खंड, १८३७) आणि द फिलॉसॉफी ऑफ द इंडक्टिव्ह सायन्सिस फाउंडेड अपाउन देअर हिस्टरी (१८४०) ह्या ग्रंथांचा समावेश होतो. द फिलॉसॉफी… ह्या ग्रंथाचे विस्तृतीकरण पुढे तीन स्वतंत्र ग्रंथांत झाले. ते ग्रंथ असे : हिस्टरी ऑफ सायंटिफिक आयडिआज (२ खंड, १८५८), नोव्हम ऑरगॅनन रिनोव्हेटम (१८५८) आणि ऑन द फिलॉसॉफी ऑफ डिस्कव्हरी (१८६०). ह्यांपैकी नोव्हम ऑरगॅनन… हा ग्रंथ फ्रान्सिस बेकन ह्याच्या विगमनाधिष्ठित विचार प्रक्रियेवरील नोव्हम ऑरगॅनम (१६२०) ह्या ग्रंथाशी निगडित आहे. आधुनिक विज्ञानाची जी विगामी पद्धत आहे, तिचा पाया बेकनने घातला आहे.

सतराव्या शतकापासून विज्ञाने विकास पावू लागली. निरीक्षण आणि प्रयोग हा त्यांचा आधार होता आणि विज्ञानात विशेषेकरून उपयोगात येणाऱ्या अनुमानप्रकारांची वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ते यांच्याकडून चिकित्सा होऊ लागली. ह्या चिकित्सेतूनच विगमनाचा वा विगामी तर्कशास्त्राचा उदय झाला; तथापि विज्ञानाची रीती म्हणून विगमनाचे समर्थन करण्यात काही अडचणी येतात. त्यामुळे काही तत्त्वज्ञांनी विज्ञानाची रीती विगमनाधारित असते, हेच अमान्य केले आहे. अशा तत्त्वज्ञांमध्ये विल्यम ह्यूएल आणि कार्ल पॉपर (१९०२–९४) अशा काही तत्त्वज्ञांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांची भूमिका थोडक्यात अशी : विज्ञानात निरीक्षणाने काही पुरावे उपलब्ध होतात. काही गृहीतक कल्पून आपण त्या पुराव्याचा उलगडा करू पाहतो. निरीक्षणाची कसोटी वापरून आपण हे गृहीतक पारखत राहतो. ते पारखण्यासाठी निगमनाने (Deduction) उपलब्ध होणारे निष्कर्ष निरीक्षणाशी जुळतात की नाही हे पाहायचे. ते जुळत नसतील, तर ते गृहीतक बाजूला ठेवावे लागते; पण निष्कर्ष निरीक्षणाशी जुळले, तरीही ते गृहीतक सत्य ठरत नाही. फक्त ते बाजूला टाकून दिले जात नाही. त्याचे परीक्षण चालूच राहते. तेव्हा विगमन ही विज्ञानाची पद्धती नसून गृहीतक-निगामी-पद्धती हे विज्ञानाच्या पद्धतीचे स्वरूप होय.

ह्यूएलने असा विचार मांडला की, निरीक्षणांपासून विगमनाने वैश्विक नियम मिळतात, त्याप्रमाणे विज्ञानाचे पद्धतिशास्त्रदेखील विज्ञानाच्या इतिहासातून जी तथ्ये उपलब्ध झाली आहेत, त्यांच्यापासून मिळविले पाहिजे. येथे तथ्य हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. वैश्विक नियम व उपपत्ती यांच्या बांधणीसाठी उपयोगी पडणारा कोणताही ज्ञानखंड हा तथ्य होय. उदा., केप्लरचे नियम हे न्यूटनच्या उपपत्तीच्या संदर्भात तथ्यच होत. त्यापुढे ह्यूएलने असाही विचार मांडला की, निखळ तथ्य असे काही नसतेच. अगदी साधी वाटणारी तथ्येसुद्धा कोणत्या तरी उपपत्तीच्या अवगुंठणासकटच येतात.

ह्यूएलच्या ईश्वरशास्त्रीय विचारांनी त्याच्या नैतिक प्रणालींना जन्म दिला; तथापि विगमनाच्या संदर्भातल्या त्याच्या कामाच्या तुलनेत त्यांचे महत्त्व दुय्यम मानले गेले आहे. नैतिक तत्त्वज्ञानावरील त्याच्या ग्रंथांत द एलिमेंट्स ऑफ मोरॅलिटी इन्क्ल्यूडिंग पॉलिटी (१८८५) आणि लेक्चर्स ऑन सिस्टिमॅटिक मोरॅलिटी (१८८६) ह्यांचा समावेश होतो. यांशिवाय त्याने कविता, निबंध, भाषांतरे इ. साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.

केंब्रिज, केंब्रिजशर येथे तो निधन पावला.

संदर्भ :

  • Fisch, Menachem; Schaffer, Simon, Eds. William Whewell : A Composite Portrait, Cambridge, 1991.
  • Fisch, Menachem, William Whewell : Philosopher of Science, Oxford, 1991.
  • Mander, W. J. Ed. The Oxford Handbook of British Philosophy in the Nineteenth Century, Oxford, 2014.
  • Snyder, L. J. Reforming Philosophy : A Victorian Debate on Science and Society, Chicago, 2006.
  • Yeo, Rechard R. Defining Science : William Whewell, Natural Knowledge, and Public Debate in Early Victorian Britain, Cambridge, 1993.