समुद्रशोफ (अर्जीरिया नर्व्होसा) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(एलिफंट क्रीपर). एक आकर्षक आणि औषधी वनस्पती. समुद्रशोक वनस्पतीचा समावेश कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव अर्जीरिया नर्व्होसा आहे. अर्जीरिया स्पेसिओजा अशा नावानेही ती ओळखली जाते. मराठी भाषेत या वनस्पतीला ‘समुद्रसोक’ अथवा ‘समुद्रशोफ’ असे म्हटले गेले आहे. ती मूळची भारतीय उपखंडातील वनस्पती असून आता तिचा समावेश हवाई बेटे, कॅरॅबियन बेटे तसेच आफ्रिका खंडात केला गेलेला आहे. अर्जीरिया प्रजातीत जगात सु. २२० जाती आढळून येतात. त्यांपैकी सु. २० जाती भारतात आढळतात. शुष्क प्रदेश वगळता या वनस्पतीचा प्रसार भारतात सर्वत्र झालेला आहे. अनेक देशांत ही वनस्पती बागेत शोभेकरिता मांडवांवर चढवितात.

समुद्रशोक ही वनस्पती वेलीच्या रूपात जोमाने वाढते. वेलीचे खोड बळकट, मोठे असून त्यावर पांढरी लव असते. पाने मोठी, तळाशी हृदयाच्या आकाराची, अंडाकृती असून वरच्या बाजूने गुळगुळीत तर खालून लवदार असतात; ती १२–१५ सेंमी. रुंद असतात. फुले मोठी व फिकट जांभळी असून फुलोऱ्यात येतात. दलपुंज कर्ण्यासारखा असून बाहेरून लवदार व आतून लवहीन असतो. मृदुफळ लहान, कठीण, गोलसर पण शुष्क व टोकदार असते. बिया चार व त्रिकोणी असतात.

समुद्रशोक वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. मुळे आयुर्वेदानुसार पौष्टिक, शक्तिवर्धक, कामोत्तेजक असून संधिवातासारख्या विकारांवर गुणकारी असतात. पाने दाहनाशक असून जखमेवर पोटीस व त्वचा यांच्या विकारांवर बाहेरून लावतात. गळवावर पाने गरम करून बांधल्यास ते फुटायला मदत होते. बिया चेतासंस्थेवर परिणाम करणाऱ्या असून भुरळकारी असतात. बियांमध्ये अल्कलॉइड गटातील काही संयुगे असल्याने बियांचे अतिसेवन विषारी असते.