गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. सौराष्ट्रात मूळ द्वारका येथे होती, असे मानणाऱ्या दोन स्थानिक परंपरा आहेत. त्यातील एका परंपरेनुसार ही द्वारका गीर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार या गावाजवळ ती होती, तर किंडारी खाडीच्या काठी विसवाडा या ठिकाणी मूळ द्वारका होती, असे तेथील लोक मानतात. मूळ द्वारका (कोडिनार) प्रमाणे या ठिकाणीही सागरी पुरातत्त्वीय संशोधन झालेले आहे.

विसवाडा हे ठिकाण सौराष्ट्र किनाऱ्यावर पोरबंदर व मियानी यांच्या दरम्यान किंडारी खाडीच्या काठी आहे. किंडारी खाडी ही मोठी असून किंडर खेडा या गावापर्यंत पसरलेली आहे. पोरबंदरपासून २० किमी. अंतरावर असलेले किंडर खेडा हे देखील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून तेथे उत्तर हडप्पा कालखंडातील वसाहतीचे पुरावे सापडले आहेत.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमधील पुरातत्त्वज्ञांनी किंडारी खाडीत समुद्र किनाऱ्यापासून ५०० मी. अंतरापर्यंत पाण्याखालील अवशेषांचा शोध घेतला. पुरातत्त्वीय अवशेष ५ ते ८ मी. खोलीवर आढळले. त्यात तीन प्रकारच्या दगडी नांगरांचा समावेश होता. बेसॉल्ट दगडाचा एक व वालुकाश्माचा एक असे दोन नांगर इंडो-अरबी प्रकारचे होते. विसवाडा जवळ पाण्यात मिळालेले नांगर ऐतिहासिक व मध्ययुगीन कालखंडातील आहेत. तसेच विसवाडा येथे प्रारंभिक ऐतिहासिक काळातील पुरातत्त्वीय स्थळ आढळले आहे. किंडारी खाडीचा हा भाग सुरक्षित असल्याने प्राचीन काळापासून तेथे जहाजे आसरा घेत असावीत, असे अनुमान काढण्यात आले आहे. या ठिकाणी गेल्या सु. ४००० वर्षांमध्ये समुद्राच्या पातळीत फारसा बदल झाल्याचे भूपुरातत्त्वीय संशोधनातून दिसले नाही. त्यामुळे लोकांमध्ये समजूत असली, तरी प्राचीन भारतीय साहित्यात वर्णन असलेली व पाण्यात बुडालेली द्वारका या ठिकाणी नव्हती, हे स्पष्ट झाले.
संदर्भ :
- Gaur, A. S. & Sundaresh, Maritime Archaeology Around Porbandar, New Delhi, 2013.
- Tripati, Sila, ‘An Overview of Maritime Archaeological Studies in Indiaʼ, Maritime Contacts of the Past, G. B. Books, Delhi, 2015.
समीक्षक : शंतनू वैद्य
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.