गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यात पोरबंदर शहरापासून पाच किमी. अंतरावर आहे. गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांना सर्वेक्षण करताना पोरबंदर खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर पुरातत्त्वीय अवशेष आढळले (२००४) व त्यांनी तेथे उत्खनन केले.

बोखिरा येथील उत्खनन, गुजरात.

बोखिरा या गावाजवळ एक मोठी खोलगट जागा असून स्थानिक लोक त्या जागी जुना धक्का होता, असे मानतात; परंतु तेथे कोणतेही पुरातत्त्वीय अवशेष मिळाले नाहीत. बोखिरा उत्खननात मिळालेली खापरे गुजरातमधील रोजडी, कुंतासी व लोथल या हडप्पा काळातील स्थळांवर मिळालेल्या खापरांशी साम्य असणारी होती. तसेच दगडी अवजारे, गोफणीचे दगड, तांब्याची अंगठी, भाजलेल्या मातीचे मणी, शंखशिंपले आणि प्राण्यांची हाडे हे इतर अवशेष मिळाले. सात प्रजातींचे शंखशिंपले मुख्यतः अन्न म्हणून वापरलेले होते. पाळीव प्राण्यांवर आधारित उपजीविकेत वन्य प्राण्यांच्या शिकारीचा भाग कमी होता; तथापि तेथे वन्य म्हशींची शिकार केल्याचा पुरावा मिळाला असून तो पशुपालनाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

पोरबंदर येथील प्राचीन धक्का, गुजरात.

रेडिओकार्बन कालमापन, पुरातत्त्वीय अवशेष आणि खापरांच्या तौलनिक अभ्यासावरून असे दिसते की, बोखिराची वसाहत इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकापासून ते इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकाच्या प्रारंभापर्यंत होती. परागकणांच्या अभ्यासातून दिसून आले की, हडप्पा काळात समुद्र किनारा बोखिरापासून बराच लांब असावा. त्यामुळे थेट बंदर म्हणून बोखिराकडे बघता येत नाही.

गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांनी २००५ मध्ये किंडारी खाडीत समुद्र किनाऱ्यापासून ५०० मी. अंतरापर्यंत पाण्याखालील अवशेषांचा शोध घेतला. पुरातत्त्वीय अवशेष ५ ते ८ मी. खोलीवर आढळले. त्यात तीन प्रकारच्या दगडी नांगरांचा समावेश होता. बेसॉल्ट दगडाचा एक व वालुकाश्माचा एक असे दोन नांगर इंडो-अरबी प्रकारचे होते. विसवाडा जवळ पाण्यात मिळालेले नांगर ऐतिहासिक व मध्ययुगीन कालखंडातील आहेत. तसेच विसवाडा येथे प्रारंभिक ऐतिहासिक काळातील पुरातत्त्वीय स्थळ आढळले आहे. किंडारी खाडीचा हा भाग सुरक्षित असल्याने प्राचीन काळापासून तेथे जहाजे आसरा घेत असावीत, असे अनुमान काढण्यात आले आहे.

पोरबंदर हे प्राचीन बंदर असून टॉलेमीने त्याचा उल्लेख ‘बार्डाक्सेमाʼ असा केला आहे. गुजरातमधील परंपरेनुसार पोरबंदरचे मूळ नाव सुदामपुरी असून श्रीकृष्णाचा मित्र सुदामा येथे राहात असे. पोरबंदरच्या किनारी भागात २००४-०५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पोरबंदरपासून १५ किमी. अंतरावरील तुकाडा गावात अनेक दगडी नांगर आढळले. पोरबंदरजवळ एक किमी. अंतरावर कोटडा बंदर नावाच्या ठिकाणी उत्तर हडप्पा काळातील वसाहतीचे पुरावे मिळाले. खाडीच्या किनारी भागात तीन किमी.च्या परिसरात पाच जुने धक्के आहेत. हे धक्के मध्ययुग व आधुनिक काळातले आहेत. खाडीच्या पाण्यात ५ ते ८ मी. खोलीपर्यंत केलेल्या सागरी पुरातत्त्वीय सर्वेक्षणात एक दगडी नांगर, दगडी शिल्पांचे तुकडे आणि फुटलेल्या जहाजाचे अवशेष मिळाले. जहाजबुडीचे हे अवशेष प्रामुख्याने लोखंडी पत्रे, सळया व खिळे अशा स्वरूपाचे असून तेथे मिळालेल्या लोखंडी नांगरांवरून ते ब्रिटिश काळातील जहाजाचे असावेत, असे अनुमान काढण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Gaur, A. S.; Sundaresh & Joglekar, P. P. ‘Excavations at Bokhira (Porbandar) on the Saurashtra Coastʼ, Man and Environment, XXIX (1):  103-107, 2006.
  • Gaur, A. S.; Sundaresh & Odedra, Ashok D. ‘New Light on the Maritime Archaeology of Porbandar, Saurashtra Coast, Gujaratʼ, Man and Environment, XXXI (1):  33-39, 2004.
  • Gaur, A. S. & Sundaresh, Maritime Archaeology Around Porbandar, Aryan Books International, New Delhi & NIO, Goa, 2013.

                                                                                                                                                                                   समीक्षक : श्रीनंद बापट