ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन बंदरांपैकी माणिकपटणा हे एक बंदर होते. ते ब्रह्मगिरी तालुक्यात पुरी या तीर्थक्षेत्रापासून ४५ किमी. अंतरावर चिल्का सरोवर जेथे बंगालच्या उपसागराला मिळते, त्या मुखाजवळ आहे. सध्या येथे गाळ साचल्याने मोठ्या नौका चिल्का सरोवराच्या मुखातून आत येऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या त्याचा वापर फक्त किनारी मच्छिमारीसाठी केला जातो.
माणिकपटणाचे सगळे क्षेत्र हे वाळूच्या मोठ्या दांड्याचा एक भाग आहे. माणिकपटणाचे पुरातत्त्वीय स्थळ सात कमी उंचीच्या वाळूच्या टेकाडांवर असून त्यातल्या एका टेकाडावर भावकुंडलेश्वर हे कोणार्कच्या मंदिराच्या समकालीन शिव मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर वाळूच्या टेकाडात गाडले गेलेले होते व अलीकडच्या काळात ते बाहेर काढण्यात आले आहे. सध्याच्या मच्छिमारांच्या गावाजवळ एकोणिसाव्या शतकातील एक मशीद आहे.
मुखापासून थोडे आत असल्याने मध्ययुगात माणिकपटणा येथे जहाजांना सुरक्षित जागा उपलब्ध होती. माणिकपटणाचा सर्वात जुना उल्लेख पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील ‘मदलपांजीʼ या वृत्तांतात आहे. पंधराव्या शतकात राजा पुरुषोत्तम देव कांचीवर स्वारी करण्यासाठी जात असताना माणिकपटणा येथे थांबला असल्याची घटना त्यात आहे. सोळाव्या शतकातील ओडिशाच्या नकाशांमध्ये माणिकपटणाचा बंदर असा उल्लेख आहे. तसेच व्यापाराच्या दृष्टीने हे महत्त्वाचे बंदर असल्याची नोंद आईन-ए-अकबरी या ग्रंथात आहे.
ओडिशा शासनाच्या पुरातत्त्व विभागाने १९८९ व १९९४ दरम्यान माणिकपटणाचे उत्खनन केले. प्राचीन साहित्यातील वर्णने व पुरातत्त्वीय संशोधन यांच्यावरून माणिकपटणाचे प्राचीनत्व इ. स. पू. पहिल्या सहस्रकापर्यंत असल्याचे मत मांडण्यात आले आहे; तथापि या उत्खनन केलेल्या नेमक्या जागांची, तेथे मिळालेल्या पुरावस्तूंची स्तरनिहाय माहिती आणि कोणत्या आधारावर इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकामध्ये माणिकपटणाहून व्यापार चालत असल्याचे म्हटले आहे, याची सविस्तर तांत्रिक पुरातत्त्वीय माहिती उपलब्ध नाही.
सन २०१० मध्ये डेक्कन कॉलेजमधील रबींद्रकुमार महंती आणि प्रमोद जोगळेकर यांनी माणिकपटणाचे प्राचीनत्व आणि बंदरांचे पुरावे शोधण्यासाठी तेथे उत्खनन केले. उत्खननात चिनी मातीची पांढऱ्या रंगावर निळी नक्षी असलेली व हिरव्या रंगाची झिलईदार खापरे मिळाली. या उत्खननात मिळालेल्या एकूण अवशेषांवरून असे दिसते की, माणिकपटणा येथील वसाहतीचा पहिला कालखंड इ. स. पाचवे-सहावे शतक असून व्यापारी बंदर म्हणून माणिकपटणा पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत कार्यरत होते. दहावे ते तेरावे शतक हा भरभराटीचा काळ होता. या काळात चीन व पूर्वेकडील देशांशी असलेला व्यापार तेजीत होता व याच काळात तेथे भावकुंडलेश्वर मंदिर बांधण्यात आले होते. या उत्खननाच्या अगोदर माणिकपटणा हे प्रारंभिक ऐतिहासिक काळात महत्त्वाचे बंदर असल्याच्या, मुख्यतः लिखित पुराव्यांवर आधारलेल्या मताला पुष्टी देणारा कोणताही पुरातत्त्वीय पुरावा २०१० मधील उत्खननात आढळला नाही.
चिल्का सरोवराच्या निर्मितीबद्दल जे भूवैज्ञानिक संशोधन झाले आहे, त्यात असे दिसते की, प्रारंभिक ऐतिहासिक काळात (सु. दोन हजार वर्षांपूर्वी) माणिकपटणा ज्या दांड्यावर आहे तो अस्तित्वात नव्हता. हा दांडा सुमारे हजार ते पंधराशे वर्षांपूर्वी तयार झाला आणि त्यामुळे माणिकपटणा येथे सुरक्षित बंदर निर्माण झाले व तेथून सुमारे सहाशे वर्षे पूर्वेकडील देशांशी व्यापार होत असे.
संदर्भ :
- Behera, K. S. ‘Maritime Contacts of Orissa: Literary and Archaeological Evidenceʼ, Utkal Historical Research Journal, 5: 55-70,1994.
- Mohanty, R. K. & Joglekar, P. P. ‘A Preliminary Report of the Excavation at Manikpatanaʼ, Orissa, Puratattva, 40: 222-228, 2010.
समीक्षक : शंतनू वैद्य