जमिनीत सापडलेल्या नौकांचे पुरातत्त्व हे नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अपघातग्रस्त होणे, मुद्दाम बुडवल्या जाणे, रेतीत रुतणे अशा विविध कारणांमुळे प्राचीन काळापासून नदी, तलाव, सरोवरे व समुद्रात नौका व जहाजे बुडत असत. बुडलेल्या ठिकाणी पाण्याची पातळी नैसर्गिकरीत्या कमी होणे (उदा., समुद्र किनारा मागे हटणे) अथवा ती मुद्दाम कमी केली जाणे (उदा., पाणी हटवून कोरडा केलेला हॉलंडमधील फ्लेवोलॅन्ड भाग) अशा कारणामुळे ही जलवाहतुकीची साधने जमिनीत गाडल्या गेलेल्या अवस्थेत मिळतात.
जमिनीत सापडलेल्या नौकांच्या पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को (सॅन फ्रॅन्सिस्को) शहर. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात सटर्स मिल येथे १८४८ मध्ये सोने सापडले. ही बातमी पसरताच हजारो लोक आपले नशीब आजमावण्यासाठी सोन्याच्या शोधात तिकडे धावले. याला ‘गोल्ड रशʼ असे म्हणतात. एका वर्षाच्या आत ८०,००० जण कॅलिफोर्नियात पोहोचल्याची नोंद आहे. हे लोक पूर्वेकडून जमिनीवरून किंवा दक्षिण अमेरिकेच्या टोकाला वळसा घालून जहाजांनी सान फ्रान्सिस्कोला येत असत. त्यासाठी लोक कोणत्याही अवस्थेतील जहाजांचा वापर करण्याचा धोका पतकरत असत. साहजिकच त्यातली अनेक बुडत असत. त्याचप्रमाणे येणाऱ्या जहाजांच्या कप्तानांना परतीसाठी प्रवासीच मिळत नसत. शिवाय बहुतेक कप्तानांना आणि खलाशांना स्वतःलाही सोने शोधायचे असे. त्यामुळे आलेली बरीचशी जहाजे सान फ्रान्सिस्को बंदरात सोडून दिली जात. काही जहाजे मुद्दाम बुडवली जात, कारण त्या वेळच्या प्रचलित कायद्यानुसार जहाज बुडलेली जागा ते बुडवणाऱ्याच्या मालकीची होत असे. असे मुद्दाम बुडवलेले ‘रोमʼ नावाचे जहाज रस्ता तयार करताना १९९० मध्ये सापडले आहे. अशा प्रकारे विविध कारणांनी बुडलेली व बुडवलेली शेकडो जहाजे सान फ्रान्सिस्को शहराच्या खाली जमिनीत आढळली आहेत. त्यांचा पुरातत्त्वीय अभ्यास करण्यात आला आहे व ती जागा आता ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून विकसित करण्यात आली आहे.
हॉलंडमधील समुद्र मागे हटवून नवीन जमीन निर्माण करण्याची सुरुवात १९२४ मध्ये झाली. समुद्रात बांध घालून प्रथम कृत्रिम जलाशय तयार करण्यात आले आणि मग तो भाग कोरडा करण्यात आला. अशा कमी पातळीवरच्या भागाला ‘पोल्डरʼ असे म्हणतात. १९३२ मध्ये अशा प्रकारे ‘झुइडरझीʼ म्हणजे दक्षिण समुद्र (Zuyderzee) भाग कोरडा करून फ्लेवोलॅन्ड हा भाग तयार झाला. हे केल्यावर तेथे बुडलेली ४३५ जहाजे मिळाली. ही जहाजे तेराव्या शतकापासूनची आहेत. त्यांमधील काहींचे (२२०) उत्खनन केले गेले, तर ६८ जहाजे आहेत त्याच अवस्थेत काळजीपूर्वक जतन करण्यात आली आहेत. हा सगळा भाग मेरिटाइम इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरातत्त्वीय वारसा आहे.
फ्लेवोलॅन्ड भागातील नूर्डुस्टपोल्डर (Noordostpolder) नगरपरिषदेचे क्षेत्र ट्युलिप फुलांसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी २००३ मध्ये ओंडक्यातून कोरून काढलेली नाव (Canoe) सापडली. या नावेची लांबी ५ मी. आणि रुंदी ७० सेंमी. आहे. पुरातत्त्वीय अभ्यासातून दिसले की, ही नाव इ. स. पू. ५२० ते ४६० या दरम्यान सहाशे वर्षे जुन्या ओक वृक्षाच्या खोडातून कोरली होती.
भारतात केरळमधील पट्टनम व कडक्करपल्ली आणि महाराष्ट्रातील देर्दे येथे अशा एकूण तीन ठिकाणी जमिनीत गाडलेल्या अवस्थेत नौका आढळून आल्या आहेत.
संदर्भ :
- Van Popta, Y. ‘No Country for Men: Searching for Late Medieval Submerged Settlements in the North-Eastern Zuiderzee Area in the Netherlandsʼ, European Journal of Archaeology, 22 (4): 567-587, 2019.
- https://www.nationalgeographic.com/history/article/map-ships-buried-san-francisco
- https://www.holland.com/global/tourism/destinations/provinces/flevoland/polder-area-flevoland.htm
- https://www.canonnoordoostpolder.nl/en/sea/1-pre-history
समीक्षक : भास्कर देवतारे