राव, शिकारीपुरा रंगनाथ : (१ जुलै १९२२–३ जानेवारी २०१३). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय सागरी पुरातत्त्वाचे जनक. त्यांचा जन्म कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील आनंदपूरम या गावात झाला. राव यांनी सन १९४१ मध्ये म्हैसूर येथून इतिहास विषयात बी. ए. आणि नंतर नागपूर विद्यापीठातून एम. ए. पदवी संपादन केली. दरम्यान पदवी मिळाल्यावर काही काळ कुटुंबाला गरज असल्याने त्यांनी टपाल खात्यात आणि वर्तमानपत्रात नोकरी केली.

सन १९४८ मध्ये राव तत्कालीन बडोदा संस्थानाच्या पुरातत्त्व विभागात साहाय्यक संचालक या पदावर रुजू झाले. या कार्यकाळात त्यांना सर मॉर्टिमर व्हीलर (१८९०–१९७६) यांचे ओडिशातील शिशुपालगड येथे प्रशिक्षण मिळाले. तसेच त्यांना एफ. ई. झॉयनर (१९०५–१९६३) व ह. धी. सांकलिया (१९०८–१९८९) यांच्या गुजरातमधील पहिल्या प्रागैतिहासिक संशोधन मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली. बडोदा संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर राव यांची नेमणूक भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामध्ये झाली.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामध्ये असताना राव यांनी गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील अनेक महत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले (१९४९–१९८०). त्याची सुरुवात १९५२-५३ मध्ये गुजरातमधील अमरेली (गोहिलवाड टिंबो) उत्खननाने झाली. तेथे त्यांना इ. स. पू. पहिल्या शतकातील दहनानंतर केलेल्या दफनांचा पुरावा मिळाला. राव यांनी १९५३ मध्ये रंगपूर या हडप्पा संस्कृतीच्या स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननमुळे प्रथमच हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासकाळाविषयी ठोस माहिती मिळाली. त्यामुळे हडप्पा संस्कृती एकाएकी नष्ट झाली, या सर मॉर्टिमर व्हीलर यांच्या मताचे राव यांनी खंडन केले. तसेच त्यांनी १९५४-५५ ते १९६२-६३ या काळात लोथल येथे केलेले संशोधन प्रसिद्ध आहे. तेथे त्यांना गोदी आणि धक्क्यावरील गोदामे यांचे अवशेष मिळाले. त्यांनी या काळात गुजरातमध्ये हडप्पा संस्कृतीच्या ४० पुरातत्त्वीय स्थळांवर सर्वेक्षण-उत्खनन केले आणि हडप्पा संस्कृतीच्या सर्व टप्प्यांचा सांस्कृतिक कालक्रम प्रकाशात आणला.

राव यांनी १९६२-६५ या काळात तमिळनाडूतील कावेरीपट्टणम (पुम्पुहार) या चोल राजांच्या काळातील नगराचे उत्खनन केले. त्यात त्यांना प्राचीन बंदराचे आणि इतिहासाच्या प्रारंभिक काळातील व्यापारी संबंधाचे पुरावे मिळाले. पुम्पुहार येथे प्राचीन शहराचा मोठा भाग समुद्रात बुडला होता, अशा आख्यायिका होत्या. राव यांनी या शहराचे पुढील काळात सागरी पुरातत्त्वीय संशोधन हाती घेतले, त्याची ही पार्श्वभूमी होती. नवाश्मयुग आणि महापाषाणयुग यांच्यात काही काळाचे अंतर असावे, अशी कल्पना प्रचलित होती. राव यांनी तमिळनाडूतील अर्काट जिल्ह्यात पियामपल्ली येथे ही कल्पना खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी १९६४-६८ या काळात उत्खनन केले. त्यात या दोन सांस्कृतिक काळांमध्ये काही खंड पडला नव्हता, असे आढळले.

सन १९६७ ते १९७५ या दरम्यान राव यांनी आंध्र प्रदेशातील कर्नूल, महाराष्ट्रातील कान्हेरी व शास्तेवाडी, आणि कर्नाटकातील ऐहोळे आणि पट्टदकल येथे उत्खनन कार्य केले. सन १९७५ ते १९८७ या काळात त्यांनी कर्नाटकातील हंपी या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीच्या उत्खननाचा मोठा प्रकल्प पूर्ण केला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रातील रायगड आणि घारापुरी (एलिफंटा बेट) येथे महत्त्वाची उत्खनने केली.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सेवेत असताना राव यांनी हाती घेतलेला शेवटचा प्रकल्प गुजरातमधील द्वारकेचे प्राचीनत्व शोधण्याचा होता. त्यांच्या सन १९७९-८० मधील उत्खननात द्वारकाधीश मंदिराच्या समोरच्या भागात इ. स. पू. पंधराव्या शतकापासूनचे अवशेष मिळाले. तसेच द्वारकेला आदिऐतिहासिक व प्रारंभिक ऐतिहासिक काळातील वसाहती पाण्यात बुडल्या असल्याचे मत त्यांनी मांडले.

राव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातून १९८० मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ते गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाशी (एन. आय. ओ. National Institute of Ocenography) संलग्न झाले. लोथल येथील उत्खननापासून राव यांनी सागरी पुरातत्त्वाचे (Marine Archaeology) महत्त्व ओळखले होते आणि त्यांनी ही शाखा भारतात सुरू करायचे ठरवले. एन. आय. ओ. मध्ये सन १९८१ ते १९९५ या काळात सुप्रतिष्ठीत वैज्ञानिक असताना त्यांनी सुंदरेश, शिल त्रिपती, अनिरुद्धसिंग गौर आणि एस. एन. बांदोडकर या तरुण संशोधकांची फळी तयार करून त्यांना सागरी पुरातत्त्वीय संशोधनाचे प्रशिक्षण दिले. राव आणि त्यांच्या या चमूने सोमनाथ, द्वारका, बेट द्वारका, लक्षद्वीप आणि पुम्पुहार येथे सागरी पुरातत्त्वीय मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ’भारतीय सागरी पुरातत्त्वाचे जनक’ असे यथार्थपणे संबोधले जाते. राव यांच्या द्वारकेतील कामामुळे त्यांना पुरातत्त्व क्षेत्राबाहेरही भरपूर प्रसिद्धी मिळाली.

राव यांनी हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा उलगडा केल्याचा दावा केला आणि संस्कृतचा आधार घेऊन अनेक चिन्हांचे अर्थ लावले. त्यांचे द डिसायफरमेंट ऑफ इंडस स्क्रिप्ट हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच हडप्पा संस्कृती आणि ऋग्वेदातील संस्कृती एकच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले; तथापि त्यांनी लावलेला हा अर्थ सर्वांना मान्य झाला नाही. तसेच सध्या पाण्यात बुडलेली द्वारका हीच श्रीकृष्णाची द्वारका असल्याच्या त्यांच्या मतावर इतिहास व पुरातत्त्व क्षेत्रातून भरपूर टीका झाली.

पुरातत्त्वातील संशोधन आणि वारसास्थळांचे संवर्धन यांमधील त्यांच्या विस्तृत कामामुळे आणि मूलभूत योगदानामुळे राव यांना अनेक मानसन्मान लाभले. ते जवाहरलाल नेहरू फेलो होते (१९७७-७८). बंगळुरूच्या मिथिक सोसायटीने त्यांना सुवर्णपदकाने गौरवले (१९८१). त्याच वर्षी म्हैसूर विद्यापीठाने मानद डी. लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

बंगळुरू येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Gaur, A. S. ‘S. R. Rao (1922–2013)ʼ, Journal of Geological Society of India, 81: 287-288,  2013. https://doi.org/10.1007/s12594-013-0033-7
  • Mani, B. R.; Ray, Purnima & Patil, C. B. Remembering Stalwarts, Archaeological Survey of India, New Delhi, 2014.

                                                                                                                                                                                  समीक्षक :  सुषमा देव