(जॉईंट्स अँड लिगामेंट्स). शरीरातील हाडांचे (अस्थींचे) एकमेकांशी असलेल्या जोडाला सांधा म्हणतात. सांध्यांमुळेच सर्व हाडांची मिळून कंकाल संस्था (सांगाडा) बनते आणि ती शरीराला आकार, आधार आणि संरक्षण देते. सांध्यांची रचना अशी बनलेली असते की, तिच्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि प्रमाणातल्या हालचाली साध्य होतात. शरीरातील काही सांधे जसे गुडघा, कोपर, खांदा हे स्वयं-वंगणशील व घर्षणहीन असतात. या सांध्यांवर अधिक ताण आणि भार असतानादेखील त्यांच्या हालचाली अचूकतेने आणि कुशलतेने घडतात. याउलट, कवटीच्या हाडांमधील शिवणीसारख्या सांध्यांच्या हालचाली खूप कमी असतात. त्यांच्या हालचाली मूल जन्मताना मेंदू व ज्ञानेंद्रिये सुरक्षित राहण्यापुरत्याच घडतात. दात आणि जबडा यांची जोडणीही सांध्याचाच प्रकार आहे. मनुष्याच्या शरीरातील सांध्यांचे वर्गीकरण त्यांची संरचना आणि कार्य यांनुसार केले जाते.
संरचनात्मक वर्गीकरण : हाडांना जोडणाऱ्या ऊती कोणत्या प्रकाराच्या असतात, त्यानुसार हे वर्गीकरण केले जाते.
(१) तंतुमय सांधे : यातील हाडे एकमेकांना कोलॅजेनयुक्त तंतूंपासून बनलेल्या घट्ट आणि नियमित संयोजी ऊतींनी जुळलेली असतात. मनुष्याच्या कवटीतील हाडांच्या शिवणी हे या प्रकारचे सांधे असतात. बाल्यावस्थेत हे सांधे पुरेसे घट्ट झालेले नसल्याने त्यांची काही प्रमाणात हालचाल होत असली, तरी प्रौढावस्थेत त्यांची हालचाल होत नाही. दात व जबडा यांचे सांधेही याच स्वरूपाचे असून या सांध्यांची थोडीशी हालचाल होऊ शकते. जसे, दंतपंक्तीला लावलेल्या चापामुळे कालांतराने तिचा आकार बदलतो. मनुष्याच्या हातामधील रेडिअस आणि अल्ना ही हाडेही तंतुमय सांध्याने जोडलेली असून त्यांची हालचाल काही प्रमाणात होऊ शकते.
(२) स्नेहल सांधे : या सांध्यातील हाडे थेट जोडलेली नसतात. त्यामुळे जोडलेल्या हाडांची हालचाल स्वैरपणे होऊ शकते. या हाडांमध्ये पोकळी असते. हाडांच्या आवरणाशी अस्थिरज्जूंनी बनलेली संधिस्थ पुटिका जुळलेली असते. पुटिकेच्या आतील बाजूस स्नेहल-पटल असते; तसेच हाडांच्या टोकाला कास्थी-आवरण असते. स्नेहल-पटल व कास्थी-आवरण यांनी पोकळी बंदिस्त झालेली असते. तिच्यात स्नेहल द्रव असतो. स्नेहल-पटलातून स्नेहल द्रव स्रवतो. या द्रवामुळे वंगण, आघातांचे शोषण आणि सांध्यांना पोषक घटक पुरवणे इ. कार्ये साध्य होतात. स्नेहल सांध्यांना आणखी मजबुती आणि आधार देण्यासाठी सांध्यातील हाडे पुटिकेच्या आत-बाहेर असलेल्या साहाय्यक अस्थिरज्जूंनी जोडलेली असतात. यांशिवाय काही सांध्यांच्या ठिकाणी सांध्यांचे कार्य आणखी प्रभावी होण्यासाठी स्नायू, कंडरा किंवा वंगणद्रव भरलेल्या पिशवीसारख्या संरचना (बर्सा) असतात. उदा., खांद्यातील उखळीचा सांधा, मनगटाचे सांधे, मानेतील खिळीचा सांधा, कोपरातील बिजागरीचा सांधा इत्यादी.
(३) कास्थिल सांधे : हे सांधे कास्थींनी जोडलेले असतात. या सांध्यांनी जोडलेल्या हाडांची हालचाल तंतुमय सांध्यांनी जुळलेल्या हाडांपेक्षा अधिक असते; परंतु ती स्नेहल सांध्यांच्या बाबतीत जशी स्वैर असते, तशी नसते. कास्थिल सांध्यांचे दोन प्रकार असतात; (अ) प्राथमिक कास्थिल सांधे (कास्थिसंधी) – हे सांधे पूर्णपणे काचाभ (काचेसारख्या, अर्धपारदर्शक) कास्थींचे बनलेले असतात. छातीच्या पिंजऱ्यातील मधले हाड आणि दोन्ही बाजूंची पहिली बरगडी यांच्यातील सांधा कास्थिसंधी असतो. (आ) द्वितियक कास्थिल सांधे (संधानक) – हे सांधे काचाभ कास्थींनी जुळलेले असून त्यांवर तंतुमय कास्थींचे आवरण असते. पाठीच्या मणक्यातील आंतरकशेरुक बिंबे ही संधानकच आहेत.
सांध्याचे विकार : अपघातामुळे होणाऱ्या दुखापती, श्रम, व्यवसायजन्य ताण, व्यायाम करताना किंवा खेळताना शरीराच्या झालेल्या अयोग्य हालचाली, संसर्गजन्य दाह, वाढते वय, चयापचयी विकार इ.मुळे सांध्यांचे विकार होऊ शकतात. अपघातामुळे किंवा खेळताना झालेल्या दुखापतींमुळे सांधे मुरगळणे किंचा लचकणे अशी स्थिती बऱ्याचदा उद्भवते. या दुखापती संलग्न स्नायू, कंडरा किंवा अस्थिरज्जू यांच्यावर पडलेल्या ताणामुळे उद्भवतात. गंभीर दुखापतीमुळे सांध्यापाशी एखादी ऊती फाटते किंवा तुटू शकते. आघात जोराचा असल्यास सांध्याच्या ठिकाणी असलेला हाडाचा भाग मोडू शकतो. अशा प्रकारच्या दुखापतींमुळे संधिशोथाची लक्षणे उद्भवतात (पाहा : कुवि भाग ३ – संधिशोथ). कधीकधी रक्तवाहिनी तुटल्यामुळे सांध्याच्या भागात रक्त साठून राहते, तर कधी हाड सरकल्याने हालचाली करणे अशक्य होते. पाठीच्या कण्यातील आंतरकशेरुक बिंब सरकल्यास पाठीच्या कण्यामध्ये बिघाड होऊन गंभीर परिणाम होतात.
बालकांमध्ये संक्रामणजन्य विकारांमुळे संधिशोथ होऊ शकतो. यात सांध्यांवर होणारे परिणाम (सूज, वेदना) अल्पकाळ टिकत असली, तरी त्याचे हृदयाच्या झडपांवर आणि स्नायूंवर गंभीर परिणाम होतात. चयापचय क्रियांच्या बिघाडामुळे सांध्यात यूरिक आम्लाचे स्फटिक जमा झाल्यास गाऊट विकार होतो. सांध्यांमध्ये समचतुर्भुजाकार कॅल्शियम पायरोफॉस्फेटचे स्फटिक जमा झाल्यास गाऊटसारखाच परंतु वेगळा विकार जडतो; त्याला आभासी गाऊट विकार म्हणतात. सांध्यांमध्ये संसर्ग झाल्यास पूयुक्त संधिशोथ होतो. उतारवयात शरीराचा भार पेलणाऱ्या गुडघ्यांच्या सांध्यांचा अस्थिसंधिशोथ होऊ शकतो; कास्थी पातळ होणे, तडे जाणे इ. लक्षणे दिसतात.
रोगनिदान : सांध्यांच्या दुखापतीसंबंधी रुग्णांकडून मिळालेली माहिती उपयोगी असते; कोणते सांधे दुखतात, अस्थिरज्जू रोजच्या व्यवहारात कोणते सांधे आखडतात, हालचाल करताना सांध्यांमध्ये करकर किंवा खटखट असा आवाज येतो का? इ. माहिती महत्त्वाची ठरते. प्रत्यक्ष तपासणीत वेदनेची जागा, सूज, स्पर्श, उष्णता, सांध्यांमध्ये झालेला बदल यांवरून सांधे / ऊती यांची बाधा तसेच संधिशोथाची तीव्रता लक्षात येते.
क्ष-किरण चित्रे घेतल्यास सांध्यांच्या विकारांसंबंधी प्राथमिक माहिती मिळते. सांध्यांच्या गुंतागुंतीच्या दुखापती, तसेच स्नायू, अस्थिरज्जू यांच्या विकारांचे नेमके निदान करण्यासाठी चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण (एमआरआय) तसेच संगणकीय अक्षीय छेदचित्रण (सीटी स्कॅन) इ. तंत्रांचा वापर करतात. आता सांध्यांमध्ये उपकरण घालून आतील भागाचे प्रतिमाकरण करणे शक्य झाले आहे. त्याचा उपयोग शस्त्रक्रियेसाठीही करतात. सांध्यात जमलेला द्रव, सांध्याच्या ठिकाणी वाढलेल्या गाठी यांची सूक्ष्मदर्शीखाली तपासणी, ऊतीपरीक्षण यांच्यापासून सांध्याच्या संक्रामणाची माहिती मिळते. रक्तातील यूरिक आम्लाच्या चाचणीवरून गाऊट विकाराची माहिती समजते.
सांध्यांच्या तंदुरुस्तीसाठी पोहणे हा व्यायामाचा प्रकार उत्तम मानला जातो.
अस्थिरज्जू
हाडांना हाडांशी जोडणारी ऊती. कंडरा आणि प्रावरणी (फॅसिया) यांच्याप्रमाणेच स्नायु-कंकाल प्रणालीमध्ये आढळणारी ही संयोजी ऊती आहे. कंडरा स्नायूंना हाडांशी जोडतात, प्रावरणी स्नायूंना स्नायूंशी जोडतात, तर अस्थिरज्जू हाडांना हाडांशी जोडतात. अस्थिरज्जू ऊती मुख्यत: हाडांच्या स्नेहल सांध्यांशी आढळतात. मात्र त्या शरीरात इतर भागातही असतात. जसे, दातांच्या मुळांना अशा ऊती खालच्या हाडांशी जोडतात, तसेच अशा ऊतींनी उदरच्छदाच्या घड्या बनतात. ज्याद्वारे उदरपोकळीतील इंद्रिये एकमेकांशी किंवा उदरभित्तीशी जुळलेली असतात.
अस्थिरज्जू हे कोलॅजेन तंतू आणि तर्कूच्या आकाराच्या तंतुपेशी यांच्या अस्थिरज्जू हे कोलॅजेन तंतू आणि तर्कूच्या आकाराच्या तंतुपेशी यांच्या दाट जुडग्यांपासून बनलेले असतात. तंतुपेशींभोवती जेलीसारखे आधारद्रव्य असते. अस्थिरज्जू दोन प्रकाराचे असतात; एक, पांढरे जे मजबूत आणि ताठर असतात आणि दुसरे, पिवळे जे मजबूत परंतु स्थितिस्थापक असतात. सांध्यांच्या ठिकाणी अस्थिरज्जू हाडांशी असे बांधलेले असतात की, त्यामुळे सांधे स्थिर राहतात आणि त्याचबरोबर हाडांची आवश्यक प्रमाणात हालचाल होऊ शकते. उदा., कोपराचा सांधा, बरगड्या. ताण आल्यास अस्थिरज्जूचा आकार बदलतो; परंतु ताण नाहीसा झाल्यास तो पूर्ववत होतो. मात्र हे ताणाच्या एका मर्यादेपर्यंत होते; ताण या मर्यादेपलीकडे वाढल्यास किंवा दीर्घकाळ राहिल्यास अस्थिरज्जू मूळच्या आकाराला येऊ शकत नाही. या परिस्थितीत सांधा दुर्बल होतो आणि भविष्यात निखळू शकतो. अस्थिरज्जूला जर थोडीशीच इजा झाली, तर तो ठीक होतो; परंतु दुखापतीमुळे अस्थिरज्जू फाटल्यास सांधा अस्थिर होतो. असा सांधा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. काही वेळा अशा शस्त्रक्रियेत बहुवारिकापासून (पॉलिमरपासून) बनविलेल्या कृत्रिम अस्थिरज्जूचा वापर केला जातो.