(स्किंक). सरड्यासारखा दिसणारा एक सरपटणारा प्राणी. सापसुरळीचा समावेश सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या स्किंकिडी कुलात केला जातो. जगात सर्वत्र सापसुरळ्या आढळतात आणि त्यांच्या सु. १५० प्रजाती असून सु. १,५०० जाती आहेत. सापसुरळ्यांना वापरला जाणारा ‘माबुया’ हा इंग्रजी शब्द आता उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या त्यांच्या एका प्रजातीपुरताच वापरतात. दक्षिण-पूर्व आशियात सापसुरळीच्या युट्रोपिस, किओनिनिया आणि ट्रॅकिलेपिस या प्रजाती प्रामुख्याने आढळतात. पूर्वी दक्षिण-पूर्व आशियातील ज्या सापसुरळ्यांचा समावेश माबुया प्रजातीत होत असे, त्यांचा समावेश युट्रोपिस प्रजातीत केला जातो.
सापसुरळीच्या आकारमानात विविधता आढळते. जसे स्किंकेला लॅटेरिस जातीच्या सापसुरळ्यांचे शरीर ७.५–१४.५ सेंमी. लांब असते आणि त्यांपैकी अर्धा भाग शेपटीचा असतो. बहुतेक सापसुरळ्या मध्यम, सु. १२ सेंमी. लांब असतात. काही आकारमानाने लांब असतात. जसे, कोरुसिया झीब्राटा ही सॉलोमन बेटावर आढळणारी सापसुरळी सु. ३५ सेंमी. लांब असते.
सापसुरळी सरड्यासारखी दिसत असली, तरी तिची मान स्पष्टपणे दिसून येत नाही. सापसुरळी इतर सरड्यांपासून ओळखण्याची खूण म्हणजे सापसुरळीच्या डोळ्यांच्या वरच्या पापण्यांवर असलेले ३०–३४ लहान आकाराचे खवले. पाय आखूड असतात; काही प्रजातींमध्ये पाय नसतात. त्यांच्या निओसेप्स प्रजातीच्या सापसुरळ्यांचे पाय खूपच आखूड असतात. त्यामुळे त्या सापांसारखी हालचाल करतात. त्यांच्या अनेक जातींमध्ये शेपटी लांब व निमुळती होत गेलेली असते. संकटात सापडल्यावर त्या शेपटी तोडून सुटका करून घेतात. अशा जातींमध्ये शेपटी पुन्हा वाढते. मात्र खुंटाप्रमाणे शेपटी असलेल्या सापसुरळ्यांमध्ये ती क्षमता नसते. सापसुरळीच्या काही जाती अंडज, तर काही अंडजरायुज असतात. त्यांचा आयु:काल साधारण ५ ते ९ वर्षांचा असतो.
भारतीय उपखंडात सापसुरळीच्या सु. १७ प्रजाती आढळून येतात. त्यांपैकी युट्रोपिस कॅरिनॅटा ही जाती बांगला देश, भारत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि भूतान या देशांत आढळते. महाराष्ट्रात तिला गणपती, गणेश, पोपई व सापाची मावशी असेही म्हणतात. तिच्या शरीराची लांबी सु. २५ सेंमी. असून शेपटी सु. १६.५ सेंमी. लांब असते. शरीराचा वरच्या बाजूचा रंग चकचकीत तपकिरी, हिरवट किंवा काळपट असतो, तर पोटाकडची बाजू पांढरी किंवा पिवळसर असते. शरीर लहान परंतु मजबूत असून मुस्कट मध्यम, बोथट असते. डोळ्यांच्या मागील बाजूपासून दोन फिकट तपकिरी पट्टे शेपटीपर्यंत गेलेले असतात. त्यामुळे शरीराच्या दोन्ही बाजू अधिक गडद दिसतात. डोके त्रिकोणी व नाजूक असते. शरीर बाह्यावरण ऑस्टिओडर्मपासून बनलेल्या चकचकीत खवल्यांचे असते.
सापसुरळी ही जाती भारतात सर्वत्र शेतात, वनांत किंवा गावांमध्ये घरालगत दिसून येते. सामान्यपणे ती जमिनीवर वावरते आणि बऱ्याचदा अंगणातून घरात येऊन जाते. रानात सहसा ती नजरेला पडत नाही; कारण पालापाचोळ्यातून ती हालचाल करते. त्या वेळेस सरपटल्याचा आवाज ऐकू येतो. पाय आखूड असले, तरी ती चपळतेने हालचाल करते. दिनचर असल्याने काळोख पडला की, निवासाच्या जागी परत येते. सापसुरळीची ही जाती अंडज आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मादी एकावेळी स्वत: तयार केलेल्या बिळात २–२० अंडी घालते. बहुधा मे-जून महिन्यांत पिले बाहेर येतात.
सर्व सापसुरळ्या मांसाहारी असून मुख्यत: कीटकभक्षी आहेत. माश्या, नाकतोडे, टोळ, भुंगेरे, पतंग यांसारखे कीटक, गांडूळ, गोगलगाय, सुरवंट, अन्य सरडे आणि कृंतक त्या खातात. पर्यावरणातील कीटकांच्या संख्येवर त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या नियंत्रण राखत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्या उपयुक्त समजल्या जातात.