एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. इटलीच्या उत्तरेकडील भागात असिसी या गावामध्ये कपडे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाराचा फ्रान्सिस (इ.स.११८१–१२२६) नावाचा तरुणवयीन मुलगा एक दिवस सान दोमिंगो या चर्चमध्ये प्रार्थना करायला गेला असता क्रूसावर खिळलेल्या येशूच्या पुतळ्यासमोर तो भाविकपणे प्रार्थना करीत होता. तेव्हा त्या चर्चमध्ये अंत:प्रेरणेच्या रूपाने एक ‘वाणी’ त्याला ऐकू आली. ती वाणी होती : “फ्रान्सिस, माझ्या मंदिराची पुनर्बांधणी कर”. ज्या चर्चमध्ये फ्रान्सिस प्रार्थना करीत होता ते चर्च तसे डबघाईला आले होते. मोजक्या सहकाऱ्यांच्या मदतीने फ्रान्सिसने त्या चर्चची डागडुजी सुरू केली.

फ्रान्सिसच्या अंत:करणात खोलवर उमटलेल्या या वाणीप्रमाणे फ्रान्सिसने चर्चचे बांधकाम तत्काळ सुरू केले तरी त्या वाणीचा व्यापक अर्थ त्याला सुरुवातीला उमगला नव्हता. ‘चर्चची दुरुस्ती’ म्हणजे केवळ एका इमारतीची दुरुस्ती नसून ‘चर्च’ या विश्वव्यापी संघटनेची दुरुस्ती व्हायला हवी होती. ख्रिस्ताच्या शिकवणुकीसारखे ‘मानवी दगड-विटा एकत्र राहणे आणि एखाद्या इमारतीप्रमाणे त्या एकसंघ राहणे’, हा त्या वाणीचा व्यापक अर्थ लक्षात येताच फ्रान्सिसने इमारतीला लागणारे दगड-धोंडे बाजूला सारले व चर्चच्या जागतिक इमारतीच्या दुरुस्तीला सुरुवात केली. त्या कामासाठी त्याला शेकडो तरुण येऊन मिळाले. त्यांतून व्रतस्थांचा एक ‘संघ’ निर्माण झाला. फ्रान्सिसच्या नावावरून त्या संघाला ‘फ्रान्सिस्कन’ म्हणण्यात येऊ लागले.

जगापासूनचा आपला विरक्तपणा दाखविण्यासाठी या संघाचे सदस्य आपल्या डोक्याच्या कवटीभोवती गोलाकार केशवपन करीत. अंगात तपकिरी रंगाचा पायघोळ झगा परिधान करीत. स्वीकारलेल्या तीन व्रतांचे कायमस्वरूपी स्मरण राहावे म्हणून तीन गाठी असलेला लोंबकळता दोरा ते कमरेला बांधीत. आत्मक्लेश म्हणून त्याच्या साह्याने रात्री-अपरात्री पाठीवर चाबकांचे कोरडे ओढून घेत. ते सदस्य साधीसुधी पादत्राणे वापरीत. गळ्याभोवती पाठीवर अडकविलेल्या झोळीत लोकांनी दिलेला दानधर्म घालीत.

संत क्लेअर यांसोबत त्यांचे व्रतस्थ स्त्री-संघ

स्वत:साठी व गोरगरीब सदस्यांसाठी तयार केलेल्या काहीशा कठोर नियमावलींना दि. २९ नोव्हेंबर १२२३ रोजी पोप तिसरे होनोरिअस यांची संमती मिळाली. तीन व्रते ते घ्यायचे म्हणून त्यांना ‘व्रतस्थ’ म्हटले जाई व भिक्षा मागून स्वत:ची व गोरगरिबांची उपजीविका करीत म्हणून त्यांना भिक्षू वा संन्यासी (Mendicant) असेही म्हटले जाई. वरील तीन व्रतांनुसार या संघाचे धर्माधिकारी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी धर्मसुधारणा करण्यासाठी पाठवू लागले व धर्माच्या बाबतीत ख्रिस्ती समाज जिथे जिथे भरकटत चालला होता, तिथे तिथे जाऊन त्यांच्या अंतर्यामी ख्रिस्ती श्रद्धा ते अधिक दृढमूल करू लागले.

हेच फ्रान्सिस्कन संघीय व्रतस्थ इ.स. १५१० मध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन या बंदरात आले. आधुनिक काळात ख्रिस्ती धर्माचे रोपटे भारतात प्रथम लावण्याचे श्रेय त्याला मिळाले. कालांतराने धर्मप्रसार व मिशनरी कार्य हे या संघाकडे काही प्रमाणात येऊ लागले.

आजवर या संघाच्या हजारो व्रतस्थांनी गेल्या ८०० वर्षांत शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रांत महान कामगिरी बजावली आहे. भारतातही त्यांनी प्रशंसनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याचा प्रभाव भारतभर इतका पडला की, १९८२ मध्ये संत फ्रान्सिस यांच्या आठव्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारच्या टपाल विभागाने त्या संघाचे एक खास टपाल तिकीटदेखील प्रकाशित केले.

संत फ्रान्सिस यांनी सूचविलेल्या आध्यात्मिक जीवनाच्या चौकटीवर आपल्या जीवनाची घडी बसविण्यासाठी क्लेअर नावाची एक तरुणी मठवासी जीवन कवटाळण्यासाठी पुढे आली. संत फ्रान्सिस यांच्या प्रेरणेने प्रभावित होऊन तिच्या स्त्रियांच्या संघाला अनेक तरुणी येऊन मिळाल्या. त्यांना प्रेरणा व पाठबळ होते संत फ्रान्सिस यांचे; तर आदर्श होता संत क्लेअर यांचा. इ.स. १२२१ या वर्षी जन्माला आलेल्या स्त्रियांच्या या व्रतस्थ मठवासी संघाचे नाव ‘क्लेअराच्या दीनदासी’ (Poor Clares) हे होते; तथापि ते स्वत:ला ‘फ्रान्सिस्कन’ ह्या नावानेच संबोधित.

संदर्भ :

  • Mausofe, A. J. M.; Mausolfe, J. K. Saint Companisons, Bandra, 2004.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो