(कस्टर्ड ॲपल / सुगर ॲपल). सीताफळ हा वृक्ष ॲनोनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोना स्क्वॅमोजा आहे. या पानझडी वृक्षाचा प्रसार जगभर झाला असल्याने त्याचे मूळस्थान कोणते याबद्दल वेगवेगळी मते आहेत. सर्वसाधारणपणे तो अमेरिका व वेस्ट इंडीज येथील असावा, असे मानले जाते. पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांनी हा वृक्ष भारतात आणला व त्याची लागवड केली. आज सीताफळाच्या फळांसाठी जगभर त्याची लागवड केली जाते.
सीताफळाचा मध्यम आकाराचा वृक्ष ३—८ मी. उंच वाढतो. खोड लहान असून त्याला अनेक पण अनियमितपणे वाढलेल्या पसरट फांद्या असतात. फांद्यांवर पाने निखळून पडल्यावर किण दिसून येतात. खोडाचा आतील भाग पिवळसर असतो, तर बाहेरचा भाग तपकिरी रंगाचा असतो. कोवळ्या फांद्या प्रथम हिरव्या, नंतर तपकिरी रंगाच्या होतात आणि त्यांवर चॉकलेटी (धुपेली) रंगाचे बारीक डाग असतात. पाने साधी, एकाआड एक, हिरवी, पातळ असतात. ती ५—१७ सेंमी. लांब, २—६ सेंमी. रुंद असून रोमहीन असतात. पाने टोकाला टोकदार, तर देठाजवळ गोलाकार असतात. पानांचे देठ लांब, निमुळते, हिरवे व लोमश असते. फुले एकेकटी किंवा २–४ च्या झुबक्यात येत असून सु. २.५ सेंमी. लांब, हिरवट पिवळ्या रंगाची, लोमयुक्त असतात. बाहेरील दलपुंज तीन, फिकट हिरव्या रंगाचे असून आतील तीन दलपुंज कधी नसतात, तर कधी बारीक पापुद्र्यासारखे असतात. पुंकेसर अनेक व पांढरे असतात. अंडाशय फिकट हिरवे असते. कुक्षीवृंत अनेक, पांढऱ्या रंगाचे वर आलेल्या अक्षावर दाटीने असतात. परागण भुंगेऱ्यांद्वारे होते. फुलात असलेल्या अनेक, सैल पण एकत्रित असलेल्या जायांगापासून घोसफळ बनते, मोठे होते आणि पिकते. ॲनोना प्रजातीतील अन्य फळांपेक्षा सीताफळाचे फळ वेगळे असते. फळ गोल किंवा हृदयाच्या आकाराचे, ५—१० सेंमी. व्यासाचे असून फळावर साधारण गोलसर ‘डोळे’ व खरबरीत साल असून आत पांढरा गर असतो. फळावर कधीकधी पांढरा पावडरीसारखा थर असतो. घोसफळातील मूळ जायांगे एकत्र जुळून गोलसर, मगजयुक्त, गोड व पिवळसर फळ बनलेले असते. एकेका जायांगात बी एकच असते. बिया भ्रूणपोषी, काळ्या, कठीण, गुळगुळीत व टोकदार असतात.
सीताफळाची पक्व फळे तशीच खातात किंवा मगजापासून पेय बनवितात. या फळांच्या प्रति १०० ग्रॅ. मगजात पाणी ७३.२ ग्रॅ., कर्बोदके २३ ग्रॅ. आणि प्रथिने २ ग्रॅ. असतात. तसेच सीताफळे पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि क-जीवनसत्त्व यांचाही महत्त्वाचा स्रोत आहेत. फळे थंड, रुचकर व रक्तवृद्धी यांसाठी उपयुक्त असून पित्तविकारावर व वांतीवर गुणकारी असतात. मूळ तीव्र रेचक (पोट साफ करणारे) आहे. त्यांमध्ये ॲटिसीन हे अल्कलॉइड असते. बी दाहक (आग करणारे), गर्भपात करणारे व मत्स्यविष आहे.
सीताफळाचे झाड कोणत्याही जमिनीत उगवते. पाने औषधी गुणधर्मयुक्त असल्याने गुरे ती खात नाहीत. त्यामुळे शेतीला किंवा बागेला कुंपण म्हणूनही ही झाडे फायदेशीर ठरतात. सीताफळावर सहसा रोग व कीड पडत नाही. ही झाडे १५–२० वर्षे जगतात. भारतात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील अहमदनगर, परभणी, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांत सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात.