एक फळभाजी. भेंडी ही वर्षायू वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अबेलमोशस एस्कुलेंटस  आहे. कापूस व जास्वंद या वनस्पतीदेखील या कुलात येतात. भेंडी मूळची आफ्रिकेतील असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत भाजीसाठी तिची लागवड  केली जाते.

भेंडी (अबेलमोशस एस्कुलेंटस) : अल्पखंडित पाने, फूल व फळांसह वनस्पती

भेंडीचे झुडूप १–२·५ मी. उंच वाढत असून त्याच्या खोडावर केस असतात. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती, ३–५ अल्पखंडित असतात. फुले मोठी, पिवळी, नरसाळ्याच्या आकाराची व द्विलिंगी असून पानांच्या बगलेत येतात. फुलांच्या मध्यभागी लाल किंवा जांभळा ठिपका असतो. याचे फळ लांबट, शेंगेसारखे आणि हिरवे किंवा पिवळट असून त्यावर ५–८ शिरा असतात. बिया अनेक, गोलसर व रेषांकित असतात. फळ वाळले की शिरांवर तडकते. कच्च्या फळात भरपूर श्‍लेष्मल पदार्थ असतो. फळात ८८% पाणी, २% प्रथिने, ८% कर्बोदके तसेच लोह, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वे असतात.

भेंडीची पाने भाजी करण्यासाठी तसेच सूप घट्ट करण्यासाठीही वापरतात. कच्ची फळे वेगवेगळ्या प्रकारे स्वयंपाकात वापरतात. फळे शक्तिवर्धक असून त्यांत पेक्टीन व स्टार्च असतात. ती मूत्रदोषांवर व पचनविकारावर गुणकारी आहेत. फळांचा काढा वेदनाशामक व मूत्रल असून घशाचा दाह व परमा या विकारांवर गुणकारी असतो. बियांत १६–२०% खाद्यतेल असते. पेंड जनावरांना खाद्य म्हणून देतात. भेंडीमधील चिकट पदार्थ सौंदर्यप्रसाधनांत वापरतात.

उसापासून गूळ तयार करताना रस स्वच्छ करण्यासाठी भेंडीच्या खोडातील श्‍लेष्मल पदार्थ वापरतात. त्यासाठी भेंडीची खोडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतात. पाण्याच्या साहाय्याने त्यांतील श्‍लेष्मल पदार्थापासून तयार झालेला चिकट विद्राव काढतात. रस गरम होत असताना तो विद्राव पाण्याबरोबर रसात मिसळतात. त्यापासून मळी तयार होते आणि ती विद्रावाला चिकटून पृष्ठभागावर आल्यामुळे सहज वेगळी करता येते. रसातील तरंगणारे पदार्थ अशा प्रकारे वेगळे झाल्यामुळे रस नितळ होतो. या रसापासून तयार केलेला गूळ कठीण, रवाळ व आकर्षक सोनेरी रंगाचा असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा