मुसळे, बाबाराव : (१० जून १९४९). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार. अस्सल ग्रामीण जीवनानुभव हा त्यांच्या लेखनातील प्रधान विषय असून, साहित्यातील ग्रामीण आणि त्यातही वैदर्भीय साहित्यप्रवाहात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मैराळडोह येथे त्यांचा जन्म झाला. याच जिल्ह्यातील ब्रह्मा हे त्यांचे गाव. प्राथमिक शिक्षण ब्रह्मा या गावीच झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी प. दि. जैन विद्यालय, अनसिंग ता. जि. वाशीम येथे घेतले. १९७३ साली ते बी.एस्सी झाले. त्यानंतर श्री. पारेश्वर विद्यालय, पार्डी टकमोर जि. वाशीम येथे सहशिक्षक पदावर रुजू झाले. साहित्य लेखनाच्या दृष्टीने ही नोकरी त्यांना उपकारक ठरली.
अभंग, ओव्या, भक्तिगीते इत्यादी संतसाहित्य आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजनगायन या बाबी त्यांच्या साहित्य प्रवासात प्रभावकारी ठरल्या. लेखनाच्या प्रारंभकाळात महाविद्यालयांनी आयोजिलेल्या महाविद्यालयीन कथास्पर्धांत त्यांच्या कथांना पुरस्कार मिळाले. त्यातून लेखनाबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांची पहिली कथा नाशिकच्या साप्ताहिक आपण या नियतकालिकात प्रकाशित झाली होती (१९६९). १९७०-८० च्या दशकात अनियतकलिकांची चळवळ जोमात सुरू झाली होती. त्यांच्या अनेक कथा – कविता महाराष्ट्रातील अनियतकालिकांतून त्याकाळात प्रकाशित झाल्या. अनुष्टुभ या द्वैमासिकाने आयोजित केलेल्या रेऊ कथास्पर्धांत लागोपाठ चार वेळा त्यांना बक्षिसे मिळाली. या स्पर्धेमुळे दमदार, सशक्त ग्रामीण कथालेखक म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. ‘शांती अरू’ या टोपण नावानेही त्यांच्या काही कविता प्रकाशित झाल्या आहेत.
कालांतराने आनंद यादवांनी सुरू केलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीच्या ते संपर्कात आले. ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ या उपक्रमात सहभागी ३९ हस्तलिखितांतून त्यांच्या हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीची निवड होऊन ती कादंबरी प्रकाशित झाली. येथून त्यांच्या साहित्यप्रवासास सुरुवात झाली. बाबाराव मुसळे यांची साहित्य संपदा : कादंबरी – हाल्या हाल्या दुधू दे (१९८५), पखाल (१९९५), वारुळ (२००४), पाटीलकी (२००५), दंश (२००९), स्मशानभोग (२०१२), आर्त (२०१३), झळाळ (२०१७), द लास्टटेस्ट (२०१९); कथासंग्रह – मोहरलेला चंद्र (१९९२), झिंगू लुखू लुखू (१९९४), नगरभोजन (२००९) आणि कवितासंग्रह – इथे पेटली माणूस – गोत्र (२०११) इत्यादी.
बाबाराव मुसळे यांच्या लेखनाची सुरुवात ही जागतिकीकरणाच्या दशकभराच्या आधी झाली आहे. या काळात ग्रामीण जीवन हे शहरीकरणाच्या प्रभावामुळे एका संक्रमण अवस्थेतून जात होते. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही स्तरांतील पारंपरिक रोजगारावर या काळात औद्योगिकीकरणामुळे गंडांतर यायला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागामध्ये उच्चवर्णीय आणि प्रस्थापित व्यवस्था ही शोषित, पीडित आणि समाजातील निम्न स्तरावर जीवन जगणाऱ्या घटकांसाठी अधिक शोषक होत होती. गरीब, अल्पभूधारक शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या अधिक अडचणीत यायला लागला होता. शैक्षणिक पातळ्यांवर ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणांना संधी आणि अडचणी ह्या दोन्ही बाबींना सामोरे जावे लागत होते. गरीब – श्रीमंत, मजूर – मालक, शहरी- ग्रामीण आणि निम्नवर्गीय आणि उच्चवर्णीय असे भेद ठळक होत होते, आणि त्यातून छोट्याश्या गावातही गटतट पडत होते. राजकीय आरक्षणामुळे जागृती आणि संघर्षही वाढला. ही सर्व पार्श्वभूमी मुसळे यांच्या कथा आणि कादंबऱ्यांच्या आशय आणि निवेदनात शब्दबद्ध झाली आहे. व्यामिश्र आणि ज्वलंत अनुभवाची खाण असणारे एक संपूर्ण गाव हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे कादंबरीलेखन शेतकरी, शोषित, पीडित, दलित, उपेक्षित, आदिवासी यांच्या समस्यावर आधारलेले आहे.
गावाचे एक संकल्पनाचित्र लक्षात घेतले तर ते बारा बलुतेदार या घटकांनी पूर्ण होते. गावातीलच अठरापगड जाती-जमातीचे अस्तित्व ठळकपणे दिसून येते. या सर्व समाजघटकांचे दुःख आणि संघर्ष मुसळे यांनी मांडला आहे. हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीत अल्पभूधारक शेतकऱ्याचे कष्टमय जीवन चित्रित झाले आहे. या कादंबरीतील भुकेच्या शोकांतिकेच्या मांडणीबद्दल पु. ल. देशपांडे यांनी गौरवोद्गार काढले आहेत. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांच्या पार्शभूमीवर परंपरा आणि नवता यातील एक हतबल संघर्ष पखाल या कादंबरीत व्यक्त झाला आहे. बलुतेदारी सोडून शहराकडे पलायन करावे लागण्याचे दुःख या कलाकृतीत संवेदनशील निवेदनातून मांडले आहे. वारुळ या कादंबरीत मातंग समाजात निर्माण झालेल्या संघर्षरत जाणिवांचे दर्शन घडते. राजकीय व्यवस्थेत एक उच्च आणि सधन वर्ग हा कायम प्रस्थापित असतो. राजकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने निर्माण केलेली आरक्षणाची बाब या प्रस्थापित मंडळींच्या अहंकाराला कशी धक्का लावते याची मांडणी पाटीलकी या कादंबरीत झाली आहे. शैक्षणिक संघर्ष हाही त्यांच्या लेखनातील एक मुलभूत विषय आहे.
मुसळे यांच्या लेखनाची आणि निवेदनाची भाषा पश्चिम विदर्भातील वऱ्हाडी बोली आहे. वऱ्हाडी बोलीतील प्रेममयी भावनिकता आणि मिश्कीलता त्यांच्या निवेदनातून दिसते. अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा ते त्यांच्या निवेदनात वापर करतात. त्यातून आशयाला अर्थाचे एक वेगळे परिमाण प्राप्त होते. अस्सल ग्रामीण परिवेश त्यांच्या लेखनात अभिव्यक्त झाला असल्याने त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतील वैदर्भीय बोली भाषेची एकसंधता साधलेली आढळते. त्यांच्या पखाल, वारूळ या कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे आणि इतर साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे (२००२). ५८ व्या विदर्भ मराठी साहित्य संमेलनाचे (धानोरा जि.गडचिरोली) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
संदर्भ :
- नागरे, शिवाजी, बाबाराव मुसळे नावाचा माणूस आणि त्यांचे साहित्य, जळगाव, २०२१.