निरीक्षण या तंत्राला वैज्ञानिक अथवा शास्त्रीय पद्धती म्हटले जाते. निरीक्षण केवळ वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वाचा मूलाधार नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाला समजून घेण्यासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नैसर्गिक शास्त्र, भौतिक शास्त्र इत्यादींचे ज्ञान वर्षानुवर्षे सूत्रबद्धपणे निरीक्षणाच्या आधारावरच मानवाने संग्रहित केले आहे. या संदर्भात जॉन डॉलार्ड म्हणतात, संशोधनाचे सर्वांत महत्त्वाचे प्राथमिक तंत्र हे मानव आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे केलेले ‘निरीक्षण’ आहे. ज्याद्वारे घडलेल्या महत्त्वाच्या घटनांना आपण जाणून घेऊ शकतो. निरीक्षणाचे महत्त्व अधिक स्पष्ट करताना गुड आणि हॅट म्हणतात, विज्ञानाचा प्रारंभच मुळी निरीक्षणाने होतो. म्हणून समाजशास्त्रज्ञांनी निरीक्षण करताना अतिशय सावधानता बाळगली पाहिजे. मोझर म्हणतात, निरीक्षण हे शास्त्रीय/वैज्ञानिक संशोधनासाठी शास्त्रीय पद्धती (क्लासिकल मेथड) आहे. ती वैज्ञानिक पद्धतीची महत्त्वपूर्ण पद्धत आहे. कोणत्याही प्रकारचे ज्ञान संपादन करण्यासाठी निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोणत्याही विषयाबाबत संशोधन करताना ते शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य संशोधन पद्धती वापरून करणे आवश्यक असते. चुकीच्या पद्धतींवर अवलंबून संशोधन केल्यास चुकीचे निष्कर्ष हाती लागतात आणि त्याचा काही उपयोग होत नाही. संशोधन करत असताना एक किंवा एकापेक्षा जास्त संशोधन पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो; परंतु संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, उद्दिष्ट्ये व गृहीतके यांवर आधारित साधनांची निवड करावी लागते.

सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये निरीक्षण पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका विशिष्ट वातावरणात मनुष्य अथवा समूह कसे वर्तन करतात, तसेच त्यांच्या दैनंदिन समस्या, जीवन जगण्याची पद्धत, समाज संस्कृती इत्यादी हे निरीक्षण पद्धतीचा वापर करून जाणून घेता येते. अशा प्रकारे नैसर्गिक वातावरणात राहून संशोधक आपली निरीक्षणे नोंदवीत असतो. त्यामुळे संशोधकाने केलेले निरीक्षण हे प्रत्यक्ष असते आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट गटाचे अथवा व्यक्तीचे वर्तन नेमके कसे घडते, त्यामागे काही घटक कार्य करतात का, याचे वास्तव दर्शन या पद्धतीमार्फत होते.

निरीक्षण पद्धत ही संशोधनासाठी माहिती गोळा करण्याची एक नैसर्गिक पद्धत म्हणून ओळखली जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मानवशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांनी या पद्धतीचा वापर करून विविध संशोधन अभ्यास समोर आणले. या पद्धतीचा वापर मुख्यतः गुणात्मक पद्धतीशास्त्र व लोकलेखा केंद्रित अभ्यासांमध्ये जास्त होतो. या निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधित समूहाचे अथवा व्यक्तीचे आणि त्याच्या वर्तणुकीचे तपशीलवार वर्णन व नंतर विश्लेषण केले जाते. जेव्हा संशोधकास विशिष्ट सामाजिक किंवा सांस्कृतिक वातावरणामधील लोकांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते, परंतु इतर कोणत्याही प्रकारे तो माहिती मिळवू शकत नाही, तेव्हा निरीक्षण पद्धत वापली जाते. ही पद्धत वापरत असताना संशोधकाने संशोधित समूह अथवा व्यक्तीच्या वर्तनावर सूक्ष्म लक्ष ठेवणे आवश्यक असून तपशीलवार क्षेत्रनोंदी घेणे गरजेचे असते. संशोधक संशोधित समूह/व्यक्तीच्या मुलाखतही घेऊ शकतात, संशोधन क्षेत्रामधून कागदपत्रे गोळा करू शकतात, ध्वनीमुद्रित करू शकतात, आणि दृक-श्राव्य (व्हिडिओ रेकॉर्डिंग) साधनाचा वापर करून तशा नोंदी घेऊ शकतात.

निरीक्षण पद्धतीचे प्रकार : निरीक्षण पद्धतीचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. (१) नियंत्रित निरीक्षण : मुख्यतः नियंत्रित निरीक्षण पद्धतीचा वापर मानसशास्त्रामध्ये प्रयोगशाळा अथवा जिथे वातावरण पूर्णपणे नियंत्रित आहे, अशा ठिकाणी केला जातो. या पद्धतीमध्ये संशोधक ठिकाण, वेळ, सहभागींची संख्या, परिस्थिती हे सर्व निश्चित करतो. उदा., डिमेंट आणि क्लीटमॅन यांनी झोपेच्या दरम्यान डोळ्यांच्या हालचालींचा स्वप्नातील कृतींशी संबंध अभ्यासण्यासाठी नियंत्रित वातावरणात तपशीलवार नोंदी करत अभ्यास केला होता (१९५७).

(२) नैसर्गिक निरीक्षण : या पद्धतीमध्ये संशोधक नैसर्गिक वातावरणात ज्या समूहाचा अथवा व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे, तेथे जाऊन आपले निरीक्षण नोंदवितो. येथे संशोधकाचे नियंत्रण नसते. उदा., प्रतिकाराचे अतिरंजन (रोमान्स ऑफ रेसिस्टन्स) या अभ्यासामध्ये लीला अबु-लुघोद या पॅलेस्टाइन-अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी निरीक्षण पद्धतीचा अवलंब करत बेदूइन (उत्तर आफ्रिका खंडातील एक भटकी जमात) जमातीतील स्त्रिया दैनंदिन जीवनामध्ये सत्तासंबंधांना कशा प्रकारे आव्हान निर्माण करीत प्रतिकाराचे अवकाश निर्माण करतात, याविषयी मांडणी करतात. मानवाच्या अभ्यासापद्धतीमध्ये लुघोद यांनी बेदूइन जमातीमधील स्त्रियांच्या दैनंदिन वर्तणुकीचे लैंगिकता, विवाह, गाणी या बाबींचे बारीक निरीक्षण केले आहे.

(३) सहभागी निरीक्षण : ही पद्धत लोकजीवनशास्त्र पद्धत म्हणूनही ओळखली जाते. या पद्धतीमध्ये संशोधक ज्या समूहाचा अथवा व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे तेथे जाऊन त्या समूहाचा भाग बनून आपले संशोधनाचे काम पूर्ण करतो. उदा., क्लिफर्ड गिर्ट्झ या अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी बाली (इंडोनेशिया) गावातील कोंबड्यांची झुंज हे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिकाशी कसे संबंधित आहे, याचा अभ्यास करताना लोकजीवनशास्त्र पद्धत आणि सहभागी निरीक्षण पद्धत यांचा वापर करून अभ्यास करताना नमूद केले की, बालीमध्ये कॉक फाइट्स बेकायदेशीर आहे, तरीही त्या ठिकाणी छुप्प्या पद्धतीने झुंजी लढविल्या जातात. असे असताना क्लिफर्ड यांनी स्वतःला स्थानिक संस्कृती आणि स्थानिक लोकांमध्ये विलीन (त्यांच्यातीलच एक भाग असल्याचे दाखविले) करून घेतले होते. त्यामुळे झुंज बेकायदेशीर असली, तरीही स्थानिक लोक त्यांच्याशी उघडपणे, मोकळेपणाने चर्चा करत होते. क्लिफर्ड यांना झुंज ज्या ठिकाणी होत असे, त्या ठिकाणी स्थानिक लोक घेऊन जात असे. भारतातही (खास करून महाराष्ट्र-विदर्भात) कोंबड्याच्या झुंजीला कायद्याने बंदी असूनसुद्धा अनेक ठिकाणी त्याचे छुप्यापद्धतीने आयोजन केले जातात.

निरीक्षण पद्धतीचे फायदे :

 • ही पद्धत वापरण्यास सोपी असून कमी खर्चाची आहे.
 • संशोधकांसमोर घटना घडत असल्याने संशोधित समूहाशी तिचा थेट संबंध येतो. त्यामुळे प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण करण्यास सोपे जाते.
 • संशोधित समूह त्यांच्या नैसर्गिक वातावरणात व्यवहार अथवा वर्तणूक करतात. त्यामुळे त्यांची वर्तणूक ही नियंत्रित नसून नैसर्गिक असते आणि त्याने अचूक व खात्रीलायक माहिती मिळण्यास मदत होते.
 • संशोधकास जवळून घटना अनुभवायला मिळतात. यातून संशोधक संशोधित समूहासोबत चांगला संबंध अथवा जवळीक निर्माण करून अधिक सखोल माहिती मिळवू शकतो.

निरीक्षण पद्धतीचे तोटे :

 • काही वेळेस संशोधकाचे अस्तित्व संशोधित समूहावर परिणाम करू शकते. त्यामुळे संशोधिताच्या लक्षात येते की, तिच्या वर्तनाचे कोणी तरी निरीक्षण करत आहे. तेव्हा त्याचे वर्तन स्वाभाविकपणे घडत नाही, त्यात कृत्रिमता येते. त्यामुळे आधी संशोधकाने विश्वासपूर्ण नाते तयार करणे आवश्यक बनते.
 • नैसर्गिक वातावरणात केलेले अभ्यास हे विशिष्ट अथवा मर्यादित संख्येमध्ये केले जाते. यामध्ये अभ्यास लिंग, जात, वर्ग, वयोगट किंवा इतर वैशिष्ट्यांपुरते हा अभ्यास मर्यादित केला जातो. त्यामुळे या अभ्यासाचे निष्कर्ष संपूर्ण लोकसंख्येमध्ये सामान्य अथवा लागू केले जाऊ शकत नाहीत.
 • त्याच प्रमाणे बाह्यचल, घटना संशोधकाच्या नियंत्रणात नसल्यामुळे संशोधित समूहाने केलेल्या वागणुकीचे कारण निश्चित करणे अवघड जाते.
 • तसे पाहिल्यास ही पद्धत वेळ खाऊ आहे. संशोधित समूहाची वर्तणूक, व्यवहार जाणून घेण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अल्प मुदतीत करण्यात येणाऱ्या अभ्यासांमध्ये ही पद्धत वापरता येत नाही.

थोडक्यात, निरीक्षण पद्धत ही संशोधनाद्वारे माहिती मिळविण्यामधील सोपी आणि विश्वासार्ह अशी पद्धत आहे. विविध सामाजिक संशोधनामध्ये ही पद्धत वापरली जाते. त्याच प्रमाणे संशोधकाच्या सामाजिक, सांस्कृतिक स्थानानुसार निरीक्षण नोंदवित व विश्लेषण करीत असताना फरक पडू शकतो. संशोधकाने माहिती गोळा करताना पूर्वग्रह दूषित अथवा पूर्वकल्पित असू नये. माहिती मिळविताना संशोधक खुले/मनमोकळे असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा संशोधक निरीक्षण करताना केवळ अभ्यासाच्या उद्दिष्टांना पुष्टी देणाऱ्या बाबींचे टिपण काढतात अथवा त्या संशोधनाकडे पाहण्याचा त्यांचा कल सिमीत असतो. त्यामुळे जे उद्दिष्टांच्या चौकटीत बसत नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सुसान गायगर या स्त्रीवादी अभ्यासक अधोरेखित केले की, संशोधकाने ‘एकच एक खरी कहाणी’ लिहिण्यावर भर न देता संशोधन क्षेत्रातून अधिकची काय माहिती समोर येत आहे, याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. बहुतांशी वेळा ही नवीन माहिती महत्त्वपूर्ण असते.

संदर्भ :

 • American Ethnologist, 1990.
 • Bryman, Alan, Social Research Methods, UK, 2016.
 • Clough, Peter.; Nutbrown, C., A Student’s Guide to Methodology, New Delhi 2012.
 • Corbetta, Piergiorgio., Social Research : Theory, Methods and Techniques, New Delhi 2003.
 • Denzin, Norman K.; Lincoln, Yvonna S., The Sage Handbook of Qualitative Research, New Delhi, 2011.
 • Journal of Experimental Psychology, 1957.
 • Journal of Women’s History, 1990.

समीक्षक : प्रियदर्शन भवरे