ज्या वेळेस कोणताही विवेकपूर्ण व सारासार विचार न करता एखादा माणूस काही कृती करतो, त्या वेळेस हा शब्दप्रयोग वापरला जातो. लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या एखाद्या गाडीमध्ये इतरांच्या बरोबरीने जागा पटकावून बसणे, असा या शब्दप्रयोगाचा ढोबळ अर्थ आहे. हा मोठा व विचारपूर्वक निर्णय नसून यात अंधानुकरणाचा भाग आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये हा शब्दप्रयोग लोकप्रिय आहे. मतदान करीत असताना उमेदवाराचे गुणविशेष ध्यानात घेऊन जबाबदारीने मतदान करणे, असे न होता इतरांनी एखाद्या विशिष्ट उमेदवारास किंवा पक्षास मत दिले म्हणून आपणही मेंढ्यांच्या कळपाच्या वागणुकीसारखे मतदान करणे, या संदर्भात या शब्दप्रयोगाचा वापर होतो. शेअर बाजार जेव्हा तेजीमध्ये असतो, तेव्हा अल्पकाळात भरपूर नफा कमाविण्यासाठी गुंतवणूकदार असा आंधळेपणाने व फारसा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता गुंतवणुकीचे निर्णय घेताना दिसतात. या निर्णयामागे गुंतवणूकदाराला शेअर बाजाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास, बाजारातील बदलांचा अचूक अंदाज असतोच, असे नाही. गर्दीच्या मानसिकतेनुसार असे निर्णय घेतले जातात. प्रत्येक गुंतवणूकदारामध्ये किंवा मतदारामध्ये असा विवेकपूर्ण व वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता आणि सवडही नसते. त्यामुळे असे अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती समाजात दिसून येते. कपड्यांच्या फॅशनमागील लोकप्रियता, एखाद्या खेळाची (उदा., क्रिकेट) लोकप्रियता यांमागे अशी भाऊगर्दी का उभी राहाते, हे येथे स्पष्ट होते. एखाद्या उद्योगधंद्यामध्ये अनेक नवीन उद्योगसंस्था दाखल होताना दिसतात. त्यामागे अशी गर्दी करण्याची वर्तणूक दिसते. त्यामुळे एखादा विस्तारक्षम उद्योगधंदा (उदा., चिट फंड, माहिती तंत्रज्ञान, लीझिंग इत्यादी) असला, तरी त्यातील सर्वच उद्योगसंस्था यशस्वी ठरतात असे नाही. त्यामागे अशी विवेकशून्य भाऊगर्दी करणे, असे कारण असू शकते.

अर्थशास्त्रातील मागणी सिद्धांताला अपवाद म्हणून बँडवॅगन परिणाम सांगितला जातो. वस्तू तुलनेने स्वस्त झाली की, ती अधिक मागितली जाते. अशी पारंपरिक वर्तणूक दिसण्याऐवजी एखादी वस्तू इतरांनी खरेदी केली म्हणून ती आपणही खरेदी करावी, या विचाराने मागणीत वाढ होताना आढळते. बँडवॅगन परिणाम नेमका केव्हा होईल, कोणत्या वस्तूच्या बाबतीत होईल किंवा किती प्रमाणात होईल हे सांगणे कठीण असते. त्यामुळे या घटनेचा पूर्वअंदाज बांधणे फारसे शक्य होत नाही; मात्र तो कमी-जास्त प्रमाणात आढळून येतो.

संदर्भ : Leibenstein, H., Quarterly Journal of Economics, vol. 64, 1950.

समीक्षक : दि. व्यं. जहागिरदार