बौद्ध अर्थशास्त्र हा शब्द १९५५ मध्ये जर्मन सांख्यिकीतज्झ व अर्थतज्ज्ञ इ. एफ. शुमाकर यांनी आपल्या ‘एशिया : ए हँडबुक’ या शोधनिबंधात सर्वप्रथम उपयोगात आणला. पुढे १९७३ मध्ये त्यांनी आपल्या स्मॉल इज ब्युटीफुल  या पुस्तकातसुद्धा हा शब्द वापरला. भारतीय बौद्ध सम्राट अशोक यांच्या कार्यकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी बौद्ध धोरण प्रथम लागू केले होते. सम्राट अशोकाची कारकीर्द बौद्ध धोरणांतर्गत सार्वजनिक बांधकाम ज्यामध्ये रुग्णालये, वसतीगृहे, उद्याने व निसर्गाचे जतन या सर्व आर्थिक कार्यासाठी ओळखला जातो.

बौद्ध अर्थशास्त्र एक आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. तो पारंपरिक दैविक संकल्पना, कर्मकांड या आध्यात्मिक विचारांचा त्याग करून मानवी मन, इच्छा, चिंता, भावना यांसंबंधी आर्थिक क्रिया कशा प्रकारच्या असतात, यावर लक्ष केंद्रित करते. मानवी वस्तूंचे उत्पादन व वापर करताना काय फायदेशीर आणि काय हानिकारक यांविषयी मार्गदर्शन करते. ही विचारधारा बौद्ध धर्माच्या ‘मध्यम मार्ग’मधून अधोरेखित होते.

बुद्धाची शिकवण शुद्ध तर्क व तर्कसंगत विचारांवर आधारित आहे. बुद्ध एक विवेकवादी व्यक्ती असल्याने पारंपरिक तत्त्वज्ञान शुद्ध नाही; कारण जीवनातील सर्व दु:खाचे आर्थिक दृष्टीने गरजांचे कारण अज्ञात आहे. अज्ञान हे तृष्णेमुळे म्हणजेच विविध इच्छांमुळे आहे. ज्यामुळे मानवाच्या गरजा निर्माण होतात व यातच मानव गुरफटून जातो, असा विचार मांडून बौद्ध अर्थशास्त्र विवेकवादाकडे नेते. हे अज्ञान दूर करण्यासाठी ‘प्रतित्यसमुत्पाद’ हे तत्त्व मांडले. ज्यानुसार मानवी जीवनामध्ये कोणतीही घटना घडण्यामागे एक कारण आहे, असा साधा व समजणारा विचार बुद्धांनी मांडला. त्यामुळे कोणतीही घटना मानवी गरजा निर्माण होण्यासाठी कोणते तरी कारण असते, याचा विचार या तत्त्वामध्ये आढळतो. बुद्धांच्या धम्मपदाच्या तेविसाव्या भागामध्ये असे म्हटले आहे की, ‘भूक किंवा उपासमार हा समाजाला लागलेला सर्वांत मोठा रोग आहे आणि तो निर्मुलनासाठी शासकांनी उपाय योजावीत.’ यावरून राहणीमानाचा स्तर योग्य राखण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे, असा आर्थिक विचार बौद्ध अर्थशास्त्रात मिळतो. बुध्द-धम्म-संघ यामधील संघाची स्थापना करून समाजाच्या गरजा दूर कराव्यात, असे बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते.

श्रीलंकेचे अर्थशास्त्रज्ञ नेव्हल करुणातिलके हे बौद्ध अर्थशास्त्राविषयी म्हणतात, ‘बौद्ध आर्थिक व्यवस्थेचा गट जीवनातील सहकारी आणि सुसंवादी प्रयत्नांच्या विकासासाठी पाया आहे. स्वत:चा विकास करून आत्मनिर्भरता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न बोधी करतो.’ हा विचार सम्राट अशोकांनी सांगितलेल्या विचारात देखील आहे. भूतानचा राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक आणि त्यांच्या सरकारने १९७२ पासून बौद्ध आध्यात्मिक मूल्यांवर आधारित ‘सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांक’ची संकल्पना उपयोगात आणली. हा निर्देशांक देशाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी उपयोगात आणला गेला.

अमेरिकेच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका क्लेअर ब्राउन यांनी बौद्ध अर्थव्यवस्थेचे चौकटीत रूपांतर केले. ज्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे उच्च दर्जाचे व चांगले जीवन कसे असावे यांसाठी बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग महत्त्वाचा मानला. तसेच भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीदेखील व्यक्तीचे कल्याण भौतिक संपत्तीपेक्षाही बुद्धांनी सांगितलेल्या आध्यात्मिक तत्त्वावर म्हजणे मानवाच्या मन, बुद्धी, संस्कार यांवर आधारित असावे, असा विचार मांडला.

बौद्ध अर्थशास्त्र असे मानते की, तर्कशुद्ध निर्णय तेव्हाच घडतात, जेव्हा आपण समजतो की, तर्कहीनता कशामुळे निर्माण होते. लोक भितीमुळे अधिक दयाळू होतात. इच्छेतूनच त्यांची भौतिक सुख प्राप्त करण्याची धडपड होते. बौद्ध अर्थशास्त्र हे पारंपरिक आध्यात्मिक सिद्धांत व तत्त्वावर आधारित नसून बुद्धिमत्ता, सहानुभूती आणि संयम या आवश्यक मानवी शक्तींवर अवलंबून आहे. बुद्धाचे अर्थशास्त्र हे ज्ञानाच्या चौकटीवर आधारित वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतो. मानवाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुद्धाचे अर्थशास्त्र हे समस्यांचा एकत्रित केलेला एक भाग आहे. सामाजिक, वैयक्तिक आणि पर्यावरणीय क्षमतेच्या सामान्य उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी बुद्धाचे अर्थशास्त्र मार्गदर्शन करते.

बौद्ध अर्थशास्त्रामध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत उदाहरण देतांना सांगितल जाते की, धूम्रपानामुळे आरोग्य तर धोक्यात येतेच, परंतु त्यामुळे पर्यावरण प्रदूषितदेखील होते. म्हणजेच बौद्ध अर्थशास्त्र हे नैतिक दृष्टीकोनावरही भर देते. बौद्ध दृष्टीकोन तीन प्रकारे समजला जातो. एक, माणूस; दोन, माणसाच्या अंगी असणारी पात्रता आणि तीन, ती विकसित करण्याची संधी. सामान्य कामधंद्यामध्ये स्वत:च्या उन्नतीसोबतच एक चांगले अस्तित्व निर्माण करून समाजालादेखील मदत करावे, हा विचार प्रतित होतो.

पाश्चात्त्य अर्थशास्त्र संपत्तीला अधिक महत्त्व देते, जे भौतिक संपत्ती आणि इच्छेला उत्तेजन देते. येथील लोक आपल्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पैसा मिळविण्यासाठी संपूर्ण जीवनभर धडपडत असतात; परंतु बौद्ध अर्थशास्त्रात इच्छेतूनच मानव दु:खी होतो. या इच्छा सहज साध्य करणे आवश्यक असते. त्यांना अधिक महत्त्व दिल्यास समाधानाची पर्यायाने संतुष्टी प्राप्त होत नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधे यांसारख्या मुलभूत गरजांव्यतिरिक्त इतर भौतिकवादी गरजांची तीव्रता कमी करणे आवश्यक आहे. लोक निरर्थक इच्छेचा पाठपुरावा करतात व त्यातून कल्याणापासून व्यक्ती दुरावतो. इच्छेची तीव्रता कमी केल्यास त्याचा समाजाला आणि निसर्गाला उपयोग होतो. पाश्चात्त्य आर्थिक विचारांनुसार बाजारांमध्ये संतुष्टी, संतुलन करण्याच्या बाबींवर अधिक भर दिला जातो. ज्यामध्ये अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी विक्रेता अधिकाधिक प्रयत्न करतो. त्यामुळे उपभोक्त्यांचे म्हणजेच ग्राहकांचे कल्याण कमी होण्याला वाव मिळतो. बौद्ध अर्थशास्त्रानुसार अहिंसा या तत्त्वावर आधारित बाजाराची रचना असावी. यामध्ये विक्रेत्यांसोबत ग्राहकांचेही हित साधले जाण्यावर भर दिला जातो. म्हणजेच इच्छेची तीव्रता कमी करण्याचा विचार बौद्ध अर्थशास्त्र सांगते.

बौद्ध आर्थिक विचारसरणीनुसार अधिकाधिक समाधान मिळविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना कष्टाची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे इच्छांची तीव्रता कमी असल्यास पर्याप्त समाधानाची प्राप्ती होवू शकते. आयात-निर्यातीमुळे खुली अर्थव्यवस्था स्वीकारणे हे आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण आहे; मात्र भौतिक वस्तूंचा उपयोग मर्यादित ठेवला, तर देशातच स्थानिक आवश्यक वस्तू निर्माण करून विदेशांवर आधारित राहण्याची गरज उरणार नाही.

देशातील संपत्तीच्या असमान वितरणावर बौद्धिक आर्थिक विचारप्रणाली विरोध करते. या विचारप्रणालीनुसार संपत्तीचे वितरण समान असावे. नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक वापर करून मानवांचे आर्थिक शोषण केल्यामुळे माणसांमध्ये हिंसा निर्माण होते. परिणामत: देशाच्या सुरक्षेसाठी संरक्षणावरील खर्च वाढतो. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त उपयोग करण्याचा विचार बौद्ध अर्थशास्त्र देते.

बौद्ध अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये : (१) मध्यम मार्ग अर्थशास्त्र : बौद्ध अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम मार्ग होय. तथागत गौतम बुद्धांनी हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सांगितला आहे. अष्टांगिक मार्गामध्ये ‘सम्यक’ शब्दाचा अर्थ ‘योग्य किंवा अचूक’ असा आहे. यामध्ये योग्य समज, योग्य विचार, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य उदरनिर्वाह, योग्य प्रयत्न, योग्य सावधानता आणि योग्य एकाग्रता हा अष्ष्टांगिक मार्ग आहे. हा मध्यम मार्गच बौद्ध अर्थशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. बौद्ध विचारप्रवर्तक शुमाकर म्हणतात की, बौद्ध धर्माच्या आठ मार्गांनी जीवन जगणे म्हणजे बौद्ध अर्थशास्त्राचा स्वीकार करणे होय; कारण या आठही मार्गांनी प्रत्येक व्यक्तीचा व देशाचा विकास संभव आहे. जेव्हा व्यक्ती अधिकाधिक भौतिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला अधिकाकधिक समाधान मिळविताना अनेक आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या उपभोगाला पूर्ण करण्यासाठी त्यांना संतुष्टीचा त्याग करावा लागतो. बौद्ध अर्थशास्त्रामध्ये सम्यक म्हणजे योग्य किंवा आवश्यक इतकाच उपभोग घेणे यावर भर आहे.

परंपरावादी विचारसरणीमध्येसुद्धा अधिकाधिक समाधानावर भर आहे; मात्र हा विचार बौद्ध अर्थविचारप्रणालीमध्ये दिसून येत नाही. जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध वस्तू आवश्यक ठरतात. त्यामुळे त्यांचा उपभोग अनिवार्य ठरतो; परंतु बौद्ध तत्त्वज्ञानानुसार उपभोग फक्त समाधानाच्या भावनेनेच असते आणि त्या भावनांच्या आहारी जाऊन गरजा पूर्ण करणे म्हणजे एकप्रकारे वासनांच्याच आहारी जाणे होय. वासनांतून मिळणारे समाधान हानिकारक असू शकते. त्यामुळे जीवनाची गुणवत्ता कमी होऊ शकते. आर्थिक क्रियाकलाप हे एक साधन आहे; मात्र हे अंतिम समाधान नक्कीच नाही. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार भुकेल्या व्यक्तींना आर्थिक ज्ञान दिले, तर व्यर्थच; कारण त्याचे जोपर्यंत पोट भरत नाही, तोपर्यंत हे ज्ञान तो पचवू शकत नाही. लोकांच्या जेवढ्या जास्त गरजा आहेत, तेवढ्याच जास्त त्यांच्या आर्थिक समस्या आहेत. त्यामुळे बौद्ध धम्मामध्ये भिक्कुंना दिवसातून एकचदा जेवण घेण्याची संहिता आहे; कारण अधिक गरजेतून तृष्णा, वासना निर्माण होते व त्यातून दु:ख, पर्यायाने आर्थिक प्रश्न निर्माण होतात. यावरून बौद्ध आर्थिक विचारानुसार मर्यादित जेवण, मर्यादित गरजा या जीवनाच्या गुणवत्तेच्या विकासासाठी लाभदायक आहे.

(२) स्वत:स किंवा इतरांना हानी न पोहचविणे : योग्य मोबदला किंवा योग्य रक्कम हे बौद्ध अर्थशास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. या संकल्पनेमध्ये स्वत:चे किंवा इतरांना नुकसान न पोहोचविणे हे एक बौद्धिक तत्त्व आहे आणि बौद्ध धर्मात त्याचा योग्य निकष म्हणून वापर होतो. हे तत्त्व केवळ मानवालाच लागू होत नाही, तर ते सर्व जीवनासाठी व संपूर्ण पर्यावरणाला लागू होतो. यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना साधर्म्य साधते. पर्यावरणाच्या दृष्टीने मनुष्य, निसर्ग आणि समाज ही तीन परस्पर तत्त्वे बौद्ध दृष्टीकोनातून परस्पर संबंधित आर्थिक तत्त्वेदेखील आहेत. बौद्ध अर्थशास्त्र हे संपूर्ण कार्यकारणाच्या प्रक्रियेच्या एकरूपतेमध्ये असले पाहिजे आणि ते त्या तीन तत्त्वांसह सुसंगत असणे आवश्यक आहे. स्वत:च्या गरजा पूर्ण करताना इतरांना (मनुष्य, निसर्ग व समाज) हानी पोहोचणार नाही, असा विचार बौद्ध अर्थशास्त्र सांगते. अशा प्रकारचे आचरण एकप्रकारे इतरांना हानी न पोहोचविता जीवनाच्या गुणवत्तेत वाढच करीत असते. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनदेखील होते, असा महत्त्वाचा विचार बौद्ध आर्थिक विचारामध्ये आहे.

सध्याच्या पर्यावरणीय प्रश्नांची विकसित देशांमध्ये जागरुकता वाढली आहे. लोक विषारी रसायनांचा वापर, जीवाश्म इंधनाचा वापर, अणुचाचण्या, वाढता आर्थिक दहशतवाद इत्यादींसारख्या आर्थिक हालचालींबाबत संपूर्ण जग चिंतीत व स्पर्धेत आहे. अशा बाबी आज वैश्विक कल्याणास हानीकारक आहेत. त्यामुळे बौद्ध अर्थशास्त्राच्या ‘जस्ट दी राईट अमाउंट’ या तत्त्वाचा स्वीकार केल्यास जगामध्ये वैश्विक कल्याण साधले जाईल.

संदर्भ : Brown, Clair, Buddhist Economics : An Enlightened Approach to the Dismal Science, UK, 2017.

समीक्षक : ज. फा. पाटील