कर्नाटकातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. सन्नती हे ठिकाण कलबुर्गी जिल्ह्यात कलबुर्गीपासून दक्षिणेस ६० किमी. अंतरावर, चित्तापूर तालुक्यात भीमा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. आजचे सन्नती हे नाव प्राचीन ‘शांतीमती’ या नावावरून रूढ झाले असावे. सन्नती येथील ऐतिहासिक पुरावशेषांचा शोध लागण्यापूर्वी हे ठिकाण ‘चंद्राला परमेश्वरी’ या देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते. परंतु १९८९ साली चंद्रालांबा मंदिर संकुलातील देवी कालिकांबा मंदिरात सम्राट अशोकाद्वारे जारी केलेले १२ व १४ क्रमांकांचे शिलालेख आणि स्वतंत्रपणे कोरलेले शिलालेख क्र. १ व २ सापडल्याने सन्नतीचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. त्यानंतर सन्नती परिसरातील कनगनहल्ली येथे सम्राट अशोकाचे शिल्प नव्याने उजेडात आल्याने या स्थळाचे महत्त्व आणखी वाढले.

अधोलोक स्तूप, कनगनहल्ली.

सन्नती व परिसरातील कनगनहल्ली, अनेगुट्टी, हसरगुंडगी, शिरवळ इ. ठिकाणी केलेल्या उत्खनन व सर्वेक्षणातून येथे मध्य पुराश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचे भरपूर पुरावशेष प्राप्त झाले. सन्नतीचे पुरातत्त्वीय महत्त्व के. के. राव यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९५४). येथे त्यांना काही बौद्धावशेष प्राप्त झाले होते. त्यानंतर कर्नाटक शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाचे एम. शेषाद्री यांनी एस. नागराजू यांच्यासह या परिसराचे सर्वेक्षण केले (१९६४-६६). त्यांना येथून शंभर प्राचीन शिल्पे प्राप्त झाली. त्यानंतर कन्नड संशोधन संस्था, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथील पी. बी. देसाई यांनी सन्नतीचे सर्वेक्षण करून हे कर्नाटकातील सर्वांत मोठे बौद्ध केंद्र असल्याचे निदर्शनास आणून दिले (१९६८). पुढील संशोधनात एम. एस. नागराज राव यांना सन्नती परिसरात विविध ठिकाणी स्तूपावशेष आढळून आले. त्यांनी येथील काही शिलालेख व शिल्पांवर के. वी. रमेश यांच्यासोबत एक शोधलेखही लिहिला. १९८६-८७ साली ए. सुंदरा यांनी सन्नती येथील ‘रणमंडळ’ या पांढरीच्या टेकाडाच्या दक्षिण-पश्चिम भागात मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. या उत्खननात सातवाहनकालीन अनेक खोल्यांसह विटांची आयताकृती रचना प्राप्त झाली. १९८६-८७ सालीच जे. आर. हॉवेल यांनी भारतीय पुरातत्त्व विभागासोबत मिळून ‘अनेगुट्टी’ येथे स्तूपाच्या टेकाडाचे उत्खनन केले. त्यांना स्तूपासोबत आद्य ऐतिहासिक काळातील मृद्भांडी, मृत्तिकामूर्ती, मणी, भग्न प्रतिमा, आहत व सातवाहनकालीन नाणी इ. अवशेष प्राप्त झाले.

कर्नाटक शासनाच्या पुरातत्त्व खात्याने सन्नती येथील तटबंदीयुक्त ‘रणमंडळ’ नावाच्या टेकडीच्या मध्यवर्ती भागात उत्खनन केले (१९९३-९५). उत्खननात प्राप्त झालेल्या अवशेषांवरून सन्नतीचा कालखंड इ. स. पू. सु. पहिल्या शतकापासून ते इ. स. तिसऱ्या-चौथ्या शतकापर्यंत निर्धारित करण्यात आला. या उत्खननात उत्तरेकडील काळी झिलईदार मृदभांडी, रूलेटेड मृद्भांडी, लाल रंगाची चकचकीत मृद्भांडी, उत्कीर्ण मृद्भांडी (Inscribed pottery), तसेच हस्तिदंती भग्न लघु काम्य (Votive) स्तूप, रोमन सम्राट टायबेरीयसचे अंकन असणारी पुतळी, मणी, सातवाहन नाणी व अश्व, सिंह, हत्ती, काळवीट, पक्षी, पुष्पांसह अलंकृत दगडी चकत्या इ. अवशेष मिळाले. एकंदरीत या उत्खननातून मध्याश्मयुग, महापाषाण संस्कृती, मौर्यकाळ व सातवाहन काळातील सांस्कृतिक अवशेष उजेडात आले.

श्रीमुख सातकर्णी याचा शिल्पपट, सन्नती.

कर्नाटक शासनाने १९९०-९१ साली कनगनहल्ली जवळ भीमा सिंचन प्रकल्पांतर्गत भीमा नदीवर एक धरण बांधण्याचे योजिले होते. त्यामुळे या परिसरात भारतीय पुरातत्त्व विभागाकडून के. पी. पूनाचा यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल सर्वेक्षण करण्यात आले. सन्नती परिसरातील २४ गावांतील सर्वेक्षणांतून आद्य आणि मध्य पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, आद्य ऐतिहासिक व मध्ययुगीन असे अवशेष मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले. या सर्वेक्षणात रणमंडळ टेकडीवर मौर्यकालीन झिलई असलेला कणाश्म (ग्रेनाइट) दगड, ५४ x २७ x ९ आणि ४७ x २४ x ८ सेमी. आकाराच्या विटा व सिंह स्तंभशीर्षाचे अवशेष आढळून आले. ‘शिरवळ’ व ‘हसरगुंडगी’ या भागांत काही प्रागैतिहासिक कालीन हत्यारे व आद्य ऐतिहासिक कालीन पांढरीचे टेकाड मिळाले. हसरगुंडगी येथून प्राचीन स्तूप व यक्ष प्रतिमा, तर अनेगुट्टी येथूनही एका प्राचीन स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले. उपलब्ध अवशेषांवरून सन्नती येथे स्थापत्यशैलीचे दोन भिन्न कालखंड दिसून येतात. पहिला कालखंड मौर्यकाळाशी संबंधित असून दुसरा सातवाहन काळाशी संबंधित आहे. सातवाहन कालखंड पुन्हा पाच टप्प्यांमध्ये वर्गीकृत केला गेला आहे. या सर्वेक्षणातील सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे सन्नतीच्या पूर्वेस ३ किमी. अंतरावर कनगनहल्ली येथून प्राप्त झालेले महास्तूपाचे अवशेष.

कनगनहल्ली जवळील महास्तूपाचे ठिकाण चंद्रालांबा मंदिरापासून १.५८ किमी अंतरावर स्थित आहे. येथे प्राचीन स्तूपासह शिलालेख, नाणी, मृद्भांडी इ. अवशेष आढळून आले. १९९१-९३ या दरम्यान के. पी. पूनाचा यांनी भीमा नदीच्या डाव्या तीरावर असणाऱ्या या प्राचीन टेकाडावर मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याकडून विस्तृत उत्खननाची परवानगी मिळताच १९९६-९७ व १९९७-९८ या काळात येथे उत्खनन केले गेले. उत्खननात एका चुनखडीच्या दगडातील (Limestone) विशाल अलंकृत महास्तूप व त्याभोवती अन्य १० छोट्या चुनखडीच्या दगडांच्या व भाजलेल्या विटांच्या वास्तू आढळून आल्या. यामध्ये मठ, विहार, चापाकार चैत्य व वर्तुळाकार काम्य स्तूप इ. वास्तू होत्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने २००१-०२ व २००५-०६ साली पुढील उत्खनन करण्यात आले. या महास्तूपाच्या मध्यभागातही उत्खनन करण्यात आले होते.

कनगनहल्ली महास्तूपाचा बराचसा भाग कोसळलेल्या अवस्थेत होता. महास्तूपाच्या अवशेषांत वेदिका (कठडे), चंद्रशिला, स्तंभ, सूची, उष्णीश, प्रदक्षिणापथ, वेदिका, आयक स्तंभ, मेढी, अंड, शिल्पपट असलेल्या शिळा, छत्रावली इ. स्थापत्य घटक आढळून आले. काही अवशेष आपल्या मूळ स्वरूपात आढळले होते. या स्तूपाचे सौंदर्यवर्धन हीनयान व महायान या दोन टप्प्यांत झाल्याचे दिसून येते, ज्यात हीनयान काळात शिल्पपट मोठ्या प्रमाणात कोरण्यात आले. शिवाय मूळ स्तूपाचा, नंतरच्या काळात विस्तार झाल्याचे पुरावे येथे आढळून आले. हा स्तूप पहिल्या कालखंडात तसेच दुसऱ्या कालखंडाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत हीनयान मताशी निगडित होता. नंतर पाचव्या टप्प्यात तो महायानी पंथामध्ये रूपांतरित झाल्याचे निदर्शनास येते. या टप्प्यात महायानी पंथीयांनी स्तूपात बुद्ध प्रतिमांची भर घातली.

मूळ स्तूपाचा व्यास सु. २६ मी. असून तो वेदिकेपर्यंत वाढविल्यास ९४.३० मी. भरतो. स्तूपाचा व्यास खालच्या मेढीपर्यंत ७४.३५ मी. असून वरच्या मेढीपर्यंत ६८.१४ मी. आहे. महास्तूपाच्या खालील व वरील मेढी सुशोभित केल्या गेल्या होत्या. खालच्या मेढीवरतीही चुनखडीच्या शिळांवर चैत्य उपासना, धर्मचक्र पूजन, मुचलिंद नाग, वृक्ष चैत्य, नागबंध चैत्य व प्रसिद्ध मठांचे शिल्पांकन केले गेले होते.

खालच्या भागावर महास्तूपाच्या चारीबाजूंनी सुमारे ३.६० मी. लांब व १.२५ मी. रुंद आकाराचे आयक पीठ (ओटे) आहेत. आयक पीठांवर गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित विभिन्न दृश्य, तसेच जातककथा कोरलेल्या होत्या. जातक कथांमध्ये वेस्संतर, हंस, शुक, छ्द्दंत, नलपान, मांधाता, सेनकीय, सुतसोम, विदुर पंडीत इ. कथा प्रामुख्याने दिसतात.

सम्राट अशोक त्याच्या राणीसह असलेला शिल्पपट, कनगनहल्ली.

मेढीवरील एका शिल्पपटात सम्राट अशोकाचे शिल्प त्याच्या नावाच्या उल्लेखासह कोरण्यात आले आहे. याशिवाय या शिल्पपटात सम्राट अशोकाची राणी, दोन चौरीधारिणी व छत्र धारण केलेल्या एका स्त्रीचे चित्रण केले गेले आहे. सम्राट अशोकाला विविध अलंकार तसेच यज्ञोपवितासमवेत दर्शविले आहे.

या महास्तूपावर सिमुक सातवाहन, सातकर्णी, वासिष्ठीपुत्र पुळुमावी, मातलक, सुंदर सातकर्णी या सातवाहन राज्यांची शिल्पे असलेल्या शिळाही बसविण्यात आलेल्या होत्या. यांपैकी बहुतेक शिल्पे त्यांच्या नामोल्लेखांसहित आहेत. या व्यतिरिक्त स्तूपावर सोमरात, कासिराज, मांधाता, महागोविंद, उदयन, कुमार अरिंदम इ. बुद्धांच्या समकालीन किंवा परंपरेनुसार प्रसिद्ध राजांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या होत्या. याशिवाय वरच्या मेढीवर शिळांच्या शीर्षभागावर काही प्राण्यांची शिल्पे कोरण्यात आलेली होती. स्तूपाचे अंड पूर्णपणे नष्ट झाले असून छत्राचे काही भग्न तुकडे उत्खननात मिळालेले आहेत. सद्यस्थितीत स्तूपाच्या बऱ्याचशा शिल्पांकित शिळा मूळ स्तूपापासून विलग करून ठेवलेल्या आहेत.

आयकपीठांच्या समोर मुख्यतः उत्तर, दक्षिण व पश्चिम प्रवेशद्वारावर यक्ष प्रतिमा ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रदक्षिणापथ व आयक पीठ, मानुषी बुद्ध व स्थानक बुद्धांच्या प्रतिमांसह सुशोभित केले गेले होते. खालची मेढी व वेदिकेच्यामध्ये ३.७५ मी.चा फरश्यांनी आच्छादिलेला प्रदक्षिणापथ आहे. स्तूपाचा सुशोभित कठडा १.९५ मी. उंच होता. त्यावर  कमळाच्या पाकळ्यांची चार मोठी पदके (Medallions) होती. उष्णीशांवर प्राण्यांची शिल्पे कोरण्यात आलेली होती.

कनगनहल्ली येथील महास्तूपाच्या स्थापत्यरचनेच्या दुसऱ्या कालखंडातील पाचव्या टप्प्यात  साधारणतः १० बुद्ध प्रतिमा बसविण्यात आल्या. या प्रतिमा आयकपीठाच्या दोन्ही बाजूला प्रदक्षिणामार्गात बसविल्या होत्या. विशेष म्हणजे या प्रतिमा वाकाटक विषयातील मूर्तिकारांनी बसविल्या होत्या. या संबंधीचे लेख सदर प्रतिमांवर कोरलेले आहेत. शिलालेखांनुसार यातील आठ प्रतिमा मानुषी बुद्धांच्या निदर्शक आहेत.

कनगनहल्ली येथून यक्ष, बुद्धपाद, धर्मचक्र, यक्षी, तसेच समकालीन समाज जीवनाविषयी व बौद्ध धर्माविषयी भाष्य करणारी अनेक शिल्पे मिळाली आहेत.

सन्नती व परिसरांतून प्राप्त झालेले सर्व अभिलेख त्यांच्या अक्षरवटिकेवरून इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून ते इ. स. दुसऱ्या-तिसऱ्या शतकादरम्यानचे आहेत. हे सर्व कोरीव लेख प्राकृत भाषेतील असून ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. कनगनहल्ली येथून सुमारे २७० शिलालेख प्राप्त झाले आहेत. कनगनहल्ली येथील महास्तूपाला अभिलेखांमध्ये ‘अधोलोक महाचेतीय’ या नावाने संबोधित केले आहे.

सन्नती हे दक्षिणापथातील एक महत्त्वाचे व्यापारी व बौद्ध केंद्र होते. सध्याच्या महाराष्ट्रातील पैठण व तेर या प्राचीन नगरांशी सन्नतीचा संपर्क होता. येथील अभिलेखांमध्ये धान्यकटक (अमरावती), कोटूर, इशिला (ब्रह्मगिरी), रामग्राम, उज्जैन, काशी, चेदी इ. स्थळांचा उल्लेख आढळून येतो.

संदर्भ :

  • Desai, P. B., ‘A New Buddhist Centre’, Journal of Karnataka University-Social Sciences, Vol. IV, Dharwad, 1968.
  • Howell, J. R., Excavations at Sannati (1986-89), New Delhi, 1995.
  • Nagaraja Rao, M. S. Eds., Asher, F. M. & Gai, G. S. ‘Brahmi Inscriptions and their bearings on the Great Stupa at Sannatiʼ, Indian Epigraphy, New Delhi, 1985.
  • Poonacha, K. P. ‘Excavations at Kanaganahalliʼ, Memoirs of the Archaeological Survey of India, No.106, New Delhi, 2011.
  • Ramesh, K. V., ‘The Ashokan Inscriptions at Sannati’, The Indian Historical Review, Vol. XIV (1-2), Delhi.
  • Sundara, A. Excavations at Sannati, Puratattva, New Delhi, 1986-87.

                                                                                                                                                                                                                                        समीक्षक : मंजिरी भालेराव