सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आढळणारे एक इंद्रिय. प्लीहा हे मनुष्याच्या लसीका संस्थेतील सर्वांत मोठे इंद्रिय असून ते उदरपोकळीच्या डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असते. तिचा आकार साधारणपणे त्या व्यक्तीच्या मुठीएवढा असून वजन १५०–२०० ग्रॅ. असते. प्लीहा ही ग्रंथी रक्ताभिसरण संस्था आणि प्रतिक्षम संस्था यांच्या कार्यांत मदत करते. जुन्या लाल रक्तपेशींचा नाश करणे व आणीबाणीच्या परिस्थितीसाठी रक्ताचा साठा करून ठेवणे ही तिची कार्ये आहेत. या इंद्रियात पुनर्जनन-क्षमता असते. प्लीहेच्या अभावी काही रोगांचे संक्रामण होऊ शकते.

उदरपोकळीतील प्लीहेचे स्थान आणि प्लीहेतील रक्तवाहिन्या

प्लीहेची संरचना सुषिर स्पंजासारखी असून ती भ्रूणमध्यस्तरापासून निर्माण होते. जठर-धमनी आणि प्लीहा-धमनी यांच्यामार्फत प्लीहेला रक्तपुरवठा होतो. जाड संयोजी ऊतींपासून बनलेल्या संपुटात प्लीहा आच्छादित असून तिच्यातील ऊतींचे दोन प्रकार आहेत : पांढरी मज्जा आणि लाल मज्जा. या दोन्ही मज्जा प्लीहेच्या भागात वेगवेगळ्या नसून त्या एकमेकांत मिसळलेल्या असतात. पांढरी मज्जा आकाराने वर्तुळाकार असून तिच्या मज्जाक्षेत्रात लसीका ऊतींची पुंजके असतात. रोगसंक्रामणाला प्रतिकार करणे हे पांढऱ्या मज्जेचे कार्य आहे. यात बी-लसीका पेशी, टी-लसीका पेशी आणि काही अतिरिक्त पेशी असतात. या पेशी रक्तात खास प्रथिने स्रवतात. ही प्रथिने (प्रतिद्रव्ये) जीवाणू, विषाणू आणि तत्सम सूक्ष्मजीवांना दुर्बल करतात किंवा त्यांचा नाश करतात. लाल मज्जाक्षेत्रात सुषिकांचे (कोटर) जाळे असून त्या रक्ताने भरलेल्या असतात. रक्तातील निरुपयोगी घटक गाळण्याचे कार्य लाल मज्जेत होते. लाल मज्जाक्षेत्रात रक्तपेशी आणि बृहत्-भक्षी पेशी असतात. या भागातील बृहत्-भक्षी पेशी रक्तातील जुन्या व ऱ्हास पावलेल्या लाल रक्तपेशींचा नाश करतात. लाल रक्तपेशींचे आयुष्य साधारणपणे १२० दिवस असते. या ऱ्हास पावलेल्या लाल रक्तपेशी प्लीहेमध्ये रक्तप्रवाहातून वेगळ्या केल्या जातात आणि त्यांच्यातील हीमोग्लोबिनचे रूपांतर सहज उत्सर्जित होणाऱ्या रंगद्रव्यात होते. या प्रक्रियेत हीमोग्लोबिनचे रूपांतर ‘हीम’ आणि ‘ग्लोबीन’ अशा दोन घटकांमध्ये होते. यांतील ‘हीम’ घटकापासून शरीराच्या अन्य भागांत नवीन हीमोग्लोबीन तयार होते.

वेगवेगळ्या कारणांमुळे प्लीहेचे विकार संभवतात. प्लीहा अतिक्रियाशील झाली, हानिग्रस्त झाली किंवा रुग्णाला लसीका संस्थेचा कर्करोग झाला, तर शस्त्रक्रियेने प्लीहेचा काही भाग किंवा पूर्ण प्लीहा काढून टाकतात. उदरपोकळीला जोराचा धक्का लागून गंभीर रक्तस्राव झाल्यास प्लीहेला हानी पोहोचते; परंतु रक्तस्राव थांबला नाही, तर ती शस्त्रक्रियेने काढून टाकतात. काही वेळा प्लीहा अतिक्रियाशील झाल्यामुळे रक्तातील उपयुक्त घटक गाळले जातात. या घटकांच्या अभावी पांडुरोग, रक्तस्राव किंवा रोगसंक्रामण होते. उपचार केल्यास प्लीहा सुरळीत कार्य करू लागते. ती काढून टाकलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये कोणतेही जाणवण्याएवढे वाईट परिणाम दिसत नाहीत. मात्र काही रुग्णांमध्ये, खास करून बालकांमध्ये, प्लीहा काढून टाकल्यानंतर रोगाचे गंभीर संक्रामण होऊ शकते. अशा बालकांना फ्ल्यू व न्यूमोनिया या रोगांवरील प्रतिबंधक लस टोचतात. तसेच त्यांना वर्षातून एकदा फ्ल्यूची लस देतात.

This Post Has 2 Comments

  1. सुधीर

    खुप उपयोगी माहिती…धन्यवाद

  2. प्रणित विष्णू ढमढेरे

    माझे सुद्धा ह्या प्लिहेचे शस्त्रक्रिया झालेली आहे, माहिती खूप छान दिलेली आहे सर तुम्ही. धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा