आयुर्वेदामधील महारसातील एक खनिज. याला संस्कृतमध्ये माक्षिकम्, हिंदीमध्ये माक्षिक, तर इंग्रजीत चॅल्कोपायराइट (Chalcopyrite) किंवा कॉपर पायराइट (Copper Pyrite) संबोधले जाते. माक्षिकमध्ये असलेल्या रासायनिक संघटनेनुसार (Cu2S, Fe2S3) ज्या माक्षिकामध्ये अल्पसा सुवर्णाचा (Au) अंश असतो, त्यास सुवर्णमाक्षिक म्हटले जाते. यामध्ये तांबे (Cu), लोखंड (Fe) आणि गंधक (S) असल्यामुळे यास ‘ताम्रगन्धायस’ असेही म्हणतात. ज्या माक्षिकात चांदीचा (Ag) अल्पसा अंश असतो, त्यास रौप्यमाक्षिक (Fe2S3) संबोधले जाते. यामध्ये लोखंड (Fe) आणि गंधक (S) असल्यामुळे यास ‘गन्धायस’ असेही म्हटले जाते. पिवळा, पांढरा आणि लाल रंगांच्या माक्षिकाला अनुक्रमे सुवर्णमाक्षिक, रौप्यमाक्षिक आणि कांस्यमाक्षिक असे म्हणतात. आयुर्वेदात सुवर्णमाक्षिकाला धातुमाक्षिक, ताप्य, स्वर्णमाक्षिक, हेममाक्षिक, मधुमाक्षिक, क्षौद्रधातु, कदम्ब, चक्रनाम आणि गरुड ही पर्यायी नावे आहेत. रौप्यमाक्षिकाला तारमाक्षिक, रजतमाक्षिक, श्वेतमाक्षिक, तारज ही पर्यायी नावे आहेत.

प्राचीन काळापासूनच भारतीयांना माक्षिकाचे ज्ञान आहे. चरकसंहितेमध्ये याचे औषधीय प्रयोग मिळतात. मधासारखा याचा रंग असल्याने, तसेच मेणाप्रमाणे अग्नीत ज्वलन होत असल्याने यास ‘माक्षिक’ म्हटले जाते. चरकसंहितेनुसार सुवर्णाप्रमाणे चमक गुण असल्याने व क्वचित अल्पसा सोन्याचा अंश असल्याने ‘स्वर्णमाक्षिक’ म्हणतात. सूर्याच्या उन्हाने ते तापते व चकाकते म्हणून त्यास ‘ताप्य’ म्हणतात. रजतसारखा (चांदीप्रमाणे) रंग असल्याने ‘रौप्य माक्षिक’ संबोधले जाते.

औषधामध्ये प्रामुख्याने सुवर्णमाक्षिकाचा उपयोग केला जातो. जे सुवर्णमाक्षिक औषधात वापरावयाचे आहे, ते गुरु, स्निग्ध, निळसर, काळसर रंगाचे तसेच तुकडा तोडल्यावर त्या पृष्ठभागावर सुवर्णाप्रमाणे चकाकी असावी असे स्वर्णमाक्षिक ग्राह्य मानावे असे आयुर्वेद सांगते. सुवर्णमाक्षिक भस्म तयार करण्यापूर्वी त्यावर शोधन, मारण इत्यादी संस्कार करणे आवश्यक असते.

सुवर्णमाक्षिक भस्माचा उपयोग प्रमेह (Diabetes), पांडु (Anaemia), अर्श (Piles), अरुचि (Dyspepsia), अनिद्रा (Insomnia), अपस्मार (Epilepsy), जीर्णज्वर (Chronic fever), कुष्ठ (Disease of skin) इत्यादी व्याधींचा नाश करण्यासाठी होतो. ग्रहणीकपाट रस, चतुर्मुख रस, जयमंगल रस, बृहतवागेश्वर रस, गर्भचिंतामणी रस, कुमार कल्याण रस, त्रिलोचन रस, चन्द्रप्रभावटी, पंचामृतपर्पटी, ताप्यादीलोह, सर्वेश्वर पर्पटी, प्रभाकरवटी इत्यादी औषधनिर्मितीमध्ये सुवर्णमाक्षिक भस्माचा वापर केला जातो.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर