हेल्व्हाइट

हेल्व्हाइट हे बेरिलियमचे सिलिकेट खनिज डॅनॅलाइट व जेंथेल्व्हाइट (रा.सं. लोहासह) या खनिजांशी समरूप आहे. त्याचे स्फटिक घनीयचतुष्फलकीय असून स्फटिकांशिवाय ते गोल पुंजांच्या रूपातही आढळते. त्याचे पाटन अंधुक; भंजन अनियमित ते शंखाभ; ठिसूळ; कठिनता ६-६.५; वि.गु. ३.१६-३.३६; चमक काचेसारखी; किंचित राळेसारखी; दुधी काचेप्रमाणे पारभासी; रंग मधासारखा पिवळा, पिवळसर, तांबूस तपकिरी, हिरवट; कस रंगहीन. ते तापविद्युतीय गुणधर्माचे आहे. रा.सं. (Mn,Fe,Zn)Be3(SiO4)3S.

त्याची संरचना घनीय प्रणालीची असून, स्थिरतेसाठी या खनिजांना सल्फाइडीकरणाची विशिष्ट परिस्थिती गरजेची असते, म्हणून ही खनिजे अधिक मर्यादितपणे आढळतात. जेथे शिलारसविषयक किंवा जलतापीय प्रक्रियांनी फॉस्फरस व गंधक संहत (एकत्रित) झालेले असतात, अशा ठिकाणीच ही खनिजे आढळतात. सिलिकेचे प्रमाण तुलनेने कमी असलेल्या पर्यावरणात ही खनिजे सामान्यपणे कमी आढळतात. हेल्व्हाइट याला हेल्व्हाइन असेही म्हणतात. बेरिलियमचा ‘हेल्व्हाइट खनिजे’ हा महत्त्वाचा गट असून, मधासारखा पिवळा रंग या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून त्याचे हेल्व्हाइट हे नाव पडले आहे.

संदर्भ : http://www.handbookofmineralogy.org

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर