समुद्रातील मोठ्या माशांचे अन्न म्हणून परिचित असलेला मासा. हेरिंग माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. त्यांच्या क्लुपिया हेरेंगस हेरेंगस (अटलांटिक हेरिंग) आणि क्लु. हेरेंगस पालसी (पॅसिफिक हेरिंग) या दोन प्रमुख जाती आहेत; त्यांपैकी क्लु. हेरेंगस हेरेंगस ही जाती मोठ्या संख्येने आढळते. उत्तर पॅसिफिक आणि उत्तर अटलांटिक महासागर तसेच दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील समुद्राच्या उथळ पाण्यात ते आढळतात. ज्यांना ‘हेरिंग’ म्हटले जाते, ते मासे अरबी समुद्र, भारतीय महासागर, बंगालचा उपसागर येथेही आढळतात.
हेरिंग माशाचे शरीर प्रवाहरेखित असते. शरीराचा रंग चंदेरी असून गडद निळ्या रंगाची झाक असते. पृष्ठपर एकच व मऊ बिनकाट्यांचा असतो. डोके लहान असून त्यांचा खालचा जबडा थोडा मोठा असतो. त्यांच्या उपजातींच्या आकारमानात विविधता आढळते. क्लु. हेरेंगस मेंब्रास (बाल्टिक हेरिंग) ची लांबी १४–१८ सेंमी., क्लु. हेरेंगस हेरेंगस (अटलांटिक हेरिंग) ची लांबी सु. ४६ सेंमी., तर क्लु. हेरेंगस पालसी (पॅसिफिक हेरिंग) ची लांबी सु. ३८ सेंमी. पर्यंत असते.
लहानलहान कोपेपॉड आणि इतर कवचधारी प्राणी, मृदुकाय प्राणी, तसेच इतर माशांचे डिंभ यांवर हेरिंग मासे वाढतात. भक्ष्य पकडताना ते समूहाने वावरतात आणि जाळ्यासारखी रचना करून चतुराईने भक्ष्य पकडतात. वेगवेगळे समुद्रपक्षी, डॉल्फिन, व्हेल, सील यांसारखे सस्तन प्राणी आणि ट्यूना, कॉड, सामन मासे यांचे ते भक्ष्य आहेत.
वर्षाच्या प्रत्येक महिन्यात हेरिंग माद्यांचा कोणता तरी समूह अंडी घालतो. समुद्राच्या तळाशी, खडक, दगड, वाळू यांवर मादी साधारणपणे २,००० ते ४,००० अंडी घालते. उबवण कालावधी ३० से. तापमानाला ४० दिवस, तर ७० से. तापमानाला १५ दिवस असतो. १९० से. तापमानाला अंडी मरून जातात. अंडी घातल्यावर हेरिंग मासे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यांच्या वार्षिक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येतात, कारण जिवंत राहणाऱ्या लहान माशांच्या संख्येत वर्षावर्षाला फरक पडत असतो. हे मासे जन्मापासून चार वर्षांत जननक्षम होतात. त्यांचे आयुष्य सु. २० वर्षांचे असते.
हेरिंग मासे ओमेगा-३ मेदाम्ले आणि ड-जीवनसत्त्व यांचा उत्तम स्रोत आहेत. यूरोपमध्ये त्यांना पकडून खारवतात आणि तुकडे करून लोणचे करतात. धूर दिलेले आख्खे हेरिंग मधोमध चिरून त्यात मसाला भरून विकले जातात. त्यांना किपरर्ड म्हणतात. छोट्या हेरिंग माशांना ‘सार्डीन’ म्हणतात. कॅनडा, अमेरिका या देशांत खारवलेले ‘सार्डीन’ बंद डब्यात साठवून विकतात. पॅसिफिक महासागरात त्यांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते.