टिआन ये : ( १९७१ ) टिआन ये यांचा जन्म तसेच शिक्षण चीनमध्ये झाले. चेंग्डू येथील सिचुआन विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात झाले. त्याच संस्थेतून, शाऊ-वू-झँग (Shau-wu Zhang) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Euler Systems of CM Points on Shimura Curves’ या प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. नंतर ते चीनमधील बीजिंग येथील चायनीज ॲकेडमी ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

टिआन ये यांचे संशोधन मुख्यत: अंकशास्त्रातील ‘बहुलत्व एक अटकळ’ (Multiplicity one conjecture), हेग्ने बिंदू (Heegner Points) तसेच एकरूप संख्या समस्या (Congruent Number Problem) याविषयी आहे.

त्यांनी इतर गणितींसह अंकशास्त्रातील स्थानिक थीटा संगती (Local Theta Correspondences) संदर्भातील बहुलत्व एक अटकळीच्या सिद्धतेत योगदान दिले आहे. या सर्वांनी मिळून, अर्किमिडीयन नसलेल्या आणि लक्षणांक शून्य असलेल्या स्थानिक क्षेत्रावरील, लंब-सांकेतिक अन्योन्य जोड्यांच्या स्थानिक थीटा संगतीचे बहुलत्व जतन करणारी सिद्धता दिली. हीच सिद्धता, अंतररक्षी गटांच्या अन्योन्य जोड्यांनाही लागू पडते.

अंकशास्त्रात तसेच बैजिक भूमितीत, एखाद्या समानक वक्रावरील (Modular Curve) काही विशिष्ट बिंदू, हेग्ने बिंदू म्हणून ओळखले जातात. एक प्रतांक (rank) असलेल्या विवृत्ती वक्रांवरील अत्यंत विस्तृत (very large) परिमेय बिंदू – जे सोप्या पद्धतीने शोधता येत नाहीत, त्यांची गणना करण्यासाठी या बिंदूंचा उपयोग करता येतो. ‘मय= क्ष– क्ष’, या समीकरणाने दिलेल्या विवृत्ती वक्रावरील अनंत कोटिकेचा परिमेय बिंदू शोधण्यासाठी जर्मन गणिती कुर्त हेग्ने (Kurt Heegner) यांनी ‘म’ च्या काही ठराविक किंमतीसाठी अशा परिमेय बिंदूंची रचना केली. टिआन ये यांनी इतर गणितींसह या रचनेचा विस्तार करून, ती अनेक मूळ भाजक असणाऱ्या ‘म’ ह्या पूर्णांकासाठी व्यापक केली.

त्याशिवाय टिआन ये यांनी, विवृत्ती वक्रांसंदर्भातील एक खुली समस्या बर्च आणि स्विनर्टन – डायर अटकळ (Birch and Swinnerton– yer or BSD Conjecture), मोटनित फर्मा वक्रांवरील (Twisted Fermat Curves) बिंदूंचे अस्तित्व तसेच एकरूप संख्या समस्या (Congruent Number Problem) या संबंधीच्या संशोधन कार्यांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांनी स्वतंत्रपणे तसेच इतर गणितींसह अठरा शोधलेख लिहिले आहेत. चार विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे.

चीनमधील प्रॉमिनंट टीचर पुरस्कार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील तरुणांना दिला जाणारा चीनचा राष्ट्रीय पुरस्कार याचेही ते मानकरी ठरले आहेत.

पंचेचाळीस वर्षाखालील, चिनी वंशाच्या गणितींना दिले जाणारे चीनच्या ॲकेडेमी ऑफ मॅथेमॅटिक्स अँड सायन्सेस (AMSS) चे गणिताचे मॉर्निंगसाईड रजत पदक तसेच सुवर्णपदक टिआन ये यांना प्रदान करण्यात आले आहे. बत्तीस वर्षांखालील तरुण गणितींना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय ‘सास्त्रा रामानुजन’ (SASTRA Ramanujan) पुरस्कार देऊनही त्यांना गौरविण्यात आले आहे.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर