हेन्री एव्हरी : (२० ऑगस्ट १६५९- ?). एक इंग्लिश खलाशी व समुद्री लुटारू. इ. स. १६९५ मधील गंज-इ-सवाई या मोगल जहाजावरील दरोड्याचा प्रमुख सूत्रधार. इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागातील डेव्हनशायरमध्ये एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. जॉन किंवा जॅक अव्हेरी असेही त्याचे नाव सांगितले जाते. १६७० च्या दशकात तो शाही नौदलात (रॉयल नेव्ही) रुजू झाला. त्याने आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर अल्जेरियन चाच्यांविरुद्धच्या मोहिमेत भाग घेतला. नौदलात असतानाच रूपर्ट या लढाऊ जहाजावर मिडशिपमन म्हणूनही त्याने भाग घेतला. याच जहाजाने १६८९ मध्ये फ्रान्सच्या उत्तर किनारपट्टीजवळ एक मोठा फ्रेंच काफिला काबीज केला. ११ सप्टेंबर १६९० रोजी त्याने डोरोथी आर्थर हिच्याशी लग्न केल्याची नोंद उपलब्ध आहे. लग्नानंतर दोनच आठवड्यांत रॉयल नेव्हीतून त्याची मुक्तता करण्यात आली. यानंतर १६९३ च्या सुमारास कॅरेबियन बेटांच्या प्रदेशात तो गुलामांचा व्यापारी म्हणून कार्यरत असल्याची नोंद मिळते.

इ. स.१६९४ साली इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक धनाढ्य गुंतवणूकदार आणि इंग्लिश पार्लमेंटचा सदस्य जेम्स हूब्लॉन याने त्याच्या परिचितांसमोर ‘दि स्पॅनिश एक्स्पीडिशन’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना मांडली. वेस्ट इंडीजमधील स्पॅनिश लोकांना काही शस्त्रे विकणे आणि अंतिमत: तेथील समुद्रात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांवरील खजिना बाहेर काढून पैसा मिळवणे, असे याचे स्वरूप होते. या कामी त्याने एकूण चार जहाजे व जवळपास २०० लोक जमवले. हा ताफा इंग्लंडहून स्पेनला निघाला. तिथे आ कोरुना नामक बंदरात जहाजांनी नांगर टाकला. एकदोन आठवड्यांत तेथून निघण्याचा बेत होता. पण माद्रिदहून येणारी कागदपत्रे न आल्यामुळे तब्बल पाच महिने त्यांना तेथेच थांबावे लागले. त्या शिवाय कराराप्रमाणे खलाशांचा षण्मासिक पगारही न दिल्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे वारे वाहू लागले. यातून सुटकेसाठी हेन्री एव्हरी आणि इतरांनी उठाव करून दुसरा चार्ल्स हे जहाज बळकावण्याचा बेत केला. रात्रीच्या अंधारात शिताफीने दुसरा चार्ल्स जहाज ताब्यातही घेतले. यानंतर एव्हरीने उठावाविरुद्ध असणाऱ्या काहीजणांना एका बोटीतून पुन्हा बंदरात जायची परवानगी दिली. नंतरच्या न्यायालयीन सुनावणीत हा मुद्दा कळीचा ठरणार होता.

बंदरातून निघाल्यावर एव्हरीने अगोदर आपल्या सहकाऱ्यांसह लूट वाटून घेण्याचा एक आराखडा रचला. यात एव्हरीखेरीज सर्वांना लुटलेल्या कोणत्याही खजिन्याचा समान वाटा व एव्हरीला त्याच्या दुप्पट वाटा मिळेल असे सर्वानुमते ठरले. जायबंदी झालेल्या खलाशांना निवृत्तीवेतन (पेन्शन) आणि विमा इत्यादींसारख्या सुविधाही होत्या. बाहेर पडल्यावर एव्हरीने दुसरा चार्ल्स जहाजाचे नामकरण फॅन्सी असे केले व आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीकडे जाऊ लागला. तांबड्या समुद्रातील जहाजांना लुटण्याचा त्याचा बेत होता. मजल दरमजल करीत एव्हरीचे जहाज मादागास्करला पोहोचले. तेथे त्यांनी काही यूरोपीय जहाजे लुटली. १६९५ च्या पूर्वार्धात तांबड्या समुद्रात एव्हरीला काही अमेरिकन लुटारूही आढळले. त्यांनी त्याच्याशी युती केली. लुटारूंकडे एकूण सहा जहाजे व ४४० लोक होते. त्यांचे नेतृत्वही एव्हरीकडेच देण्यात आले.

इ. स.१६९५ च्या सप्टेंबरमध्ये त्यांना काही व्यापारी जहाजांची बातमी समजेपर्यंत ती जहाजे रात्रीच्या अंधारात पुढे निघून गेली होती. पण अतिशय शिताफीने एव्हरीने त्यांच्या मागावर त्याची जहाजे नेली. जवळपास दहा दिवसांच्या तणावपूर्ण पाठलागानंतर एव्हरीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच धुक्यातून एक मोठे जहाज समोर दिसले. सुरतेतील धनाढ्य व्यापारी अब्दुल गफूरचे फतह-इ-मुहम्मदी नावाचे ते जहाज होते. थोड्या मारगिरीनंतर ते जहाज एव्हरीच्या ताब्यात येऊन त्याला त्यात मोठा खजिना सापडला. जेम्स हूब्लॉनतर्फेच्या स्पॅनिश एक्स्पीडिशनमध्ये मिळणाऱ्या दोन वर्षांच्या पगाराइतके धन प्रत्येकाला एका झटक्यात मिळाले. यानंतर १० सप्टेंबर १६९५ रोजी एव्हरीला गंज-इ-सवाई या आणखी एका जहाजाची चाहूल लागली.. औरंगजेबाच्या मालकीच्या या जहाजावर एक हजारापेक्षा जास्त लोक राहू शकत. त्याची भारवहनक्षमता दीड हजार टन व त्यावर ऐंशी तोफा आणि शेकडो बंदूकधारी शिपाईही होते. हज यात्रा करून येणाऱ्या यात्रेकरूंसह त्यावर व्यापारी आणि मोगल राजघराण्याशी संबंधित काही स्त्रियाही होत्या.

एव्हरीचे फॅन्सी जहाज गंज-इ-सवाईजवळ आल्याबरोबर त्याने तोफांचा मारा सुरू केला. योगायोगाने तोफगोळ्याचा नेम मुख्य डोलकाठीवर बसून ती कोसळली. प्रतिकारादाखल गंज-इ-सवाईकडून तोफ डागली जाण्याआधी अनपेक्षितरीत्या त्या तोफेचाच स्फोट झाला. यामुळे जहाजावर एकच कोलाहल माजून, एव्हरीच्या हाती हे प्रचंड मोठे घबाड आयतेच लागले. आजच्या हिशेबाने पाहता शेकडो कोटींचा मुद्देमाल लुटारूंना मिळाला. पण या चाच्यांनी लुटालुटीखेरीज जहाजावरील अनेक स्त्रियांवर अत्याचार केला. समकालीन यूरोपीय साधनांत मात्र जहाजावरील मोगल राजकन्येने एव्हरीशी लग्न केल्याचा उल्लेख येतो. यात लुटारूंच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचाच हेतू असावा.

गंज-इ-सवाईवरील प्रवाशांनी सांगितलेल्या अत्याचारांच्या कहाण्या इतिहासकार खाफी खान या मोगल अधिकाऱ्याच्या कानी पडल्या. त्याच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, गंज-इ-सवाईचा कप्तान इब्राहिम खानाचे मनोधैर्य डळमळीत झाल्याने प्रतिकारही विशेष झाला नाही. अब्दुल गफूरच्या फतह-इ-मुहम्मदी जहाजातील लोक सुरतेस पोहोचल्याबरोबर त्यांच्याकडून ब्रिटिश चाच्यांनी केलेल्या अत्याचारांची माहिती घेऊन मोगल अधिकाऱ्यांसोबत सुरतेतील स्थानिकांनी तेथील कंपनीच्या वखारीला वेढा घातला. औरंगजेबापर्यंत ही बातमी पोहोचायला लागणाऱ्या वेळामुळे वातावरण निवळेल, असा वखारप्रमुख सॅम्युअल ॲनेस्लीचा अंदाज होता. मात्र दोनच दिवसांत गंज-इ-सवाई जहाजावरील प्रवासीही सुरतेस कसेबसे पोहोचल्यावर ॲनेस्लीच्या अंदाज चुकीचा ठरला. सुभेदार इतिमाद खानाने ॲनेस्ली व इतर इंग्रजांना बेड्या घातल्या. या आधीच काही वर्षांपूर्वी कंपनी व मोगल संबंध व्यापारविषयक वाटाघाटी फिसकटल्यानंतर मोठ्या कष्टाने उभयपक्षी संबंध पुन्हा सुरळीत झाले होते. यथावकाश ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचवल्यानंतर त्याने सुरतेची वखार ताब्यात घेऊन, मुंबईवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा आदेश दिला. कंपनीला लुटारूंपेक्षा आपण वेगळे असून या लुटालुटीला आपले समर्थन नाही, हे दर्शवणे भाग होते. अन्यथा भारतातून त्यांना गाशा गुंडाळावा लागला असता.

मुंबईचा गव्हर्नर जॉन गेयरने इंग्लंडला पत्रे लिहून परिस्थितीचे गांभीर्य तपशीलवार वर्णन करून यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. यावर इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायसंस्थेकडून हेन्री एव्हरी आणि त्याच्या हाताखालील माणसांना ताब्यात घेण्याचे फर्मान सुटले. एव्हरीला पकडून देणाऱ्यास स्वत: ईस्ट इंडिया कंपनीने कित्येक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आणि अशा प्रकारे एका माणसाच्या शोधार्थ जागतिक स्तरावरील पहिली शोधमोहीम राबवण्यात आली. याच वेळी ॲनेस्लीच्या मनात वेगळे बेत होते. औरंगजेबाने कंपनीला दिलेल्या आदेशानुसार भारतात राहायचे, तर लुटारूंचा बंदोबस्त करण्याबरोबर मोगल व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही टाकली होती. जॉन गेयरला पुरेशा पैशाअभावी यातील दुसरे कलम मंजूर नव्हते; परंतु ॲनेस्लीने गेयरला समजावून सांगितल्यावर अखेरीस गेयरने त्याला मान्यता दिली.

एव्हरी बरोबरच्या लुटारूंमध्ये लुटलेला अवाढव्य खजिना अगोदर ठरल्याप्रमाणे विभागण्यात आला. लुटीनंतर एव्हरीने मादागास्करजवळील रियुनियन बेटाकडे कूच केले. त्याबरोबरचे पन्नासजण तेथेच राहिले. उरलेल्यांसह कॅरेबियन प्रदेशातील बहामा बेटांकडे जाऊन, तेथे फॅन्सी हे जहाज सोडून सर्वांनी विखरून जावे, असे ठरले. त्या प्रमाणे ठरल्यानुसार केप ऑफ गुड होपला वळसा घालून, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या सु. एक हजार किमी. पश्चिमेस खुल्या समुद्रातील असेन्शन बेटावर पोहोचले. काहीजणांनी त्या बेटावर राहणे पसंत केले. बहामातील न्यू प्रॉव्हिडन्सकडे पोहोचल्यावर तेथील गव्हर्नर निकोलस ट्रॉटचा अंदाज घेऊन एव्हरीने त्याला फॅन्सी जहाज आणि त्यातील काही धन दिले.

एव्हरी व त्याच्या साथीदारांसमोर इंग्लिश शासनाचा ससेमिरा चुकवण्याचे आव्हान होते. न्यू प्रॉव्हिडन्समध्ये एव्हरीसोबतचे काही लोक राहिले. उरलेल्यांपैकी काही जणांनी विविध अमेरिकन वसाहतींमध्ये जाणे पसंत केले. खुद्द एव्हरीसह वीसजण सीफ्लॉवर नावाच्या लहान जहाजातून आयर्लंडच्या उत्तर भागातील डनफॅनगी बंदरात पोहोचले.

जॉन डॅन नामक एव्हरीसोबतचा एक खलाशी इंग्लंडमधील रॉचेस्टरमध्ये असताना साफसफाई करणाऱ्या महिलेला त्याच्या कोटाचे वजन संशयास्पदरीत्या जास्त असल्याचे आढळले. तक्रारीनंतर तब्बल हजार नाणी कोटात लपवल्याचे निष्पन्न झाल्याबरोबर रॉचेस्टरच्या नगराध्यक्षाने त्याला तुरुंगात टाकले. त्यानंतर आणखी काहीजण अन्य गावांमधून पकडले गेले. एकूण आठ कैद्यांना लंडनला आणले गेले. या कैद्यांना शिक्षा देऊन इंग्लंडच्या न्यायप्रियतेची ग्वाही जगाला द्यायची होती.

लंडनमधील ओल्ड बेली येथे १६९६ च्या ऑक्टोबर महिन्यात कैद्यांना न्यायालयापुढे आणले गेले. कैद्यांना सुटकेची संधी न मिळता प्रचलित न्यायालयीन मार्गानेच फासावर लटकवण्याचा मुख्य हेतू होता. समुद्रावर लूटमार केल्याचा ठपका ठेवून, या गुन्ह्यामुळे कोणा एका व्यक्तीऐवजी राष्ट्रांना धोका पोहोचत असल्याने त्याची तीव्रता जास्त असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. जॉन डॅन आणि फिलिप मिडलटन या दोघांची प्रथम चौकशी करण्यात आली. त्यांनी उर्वरित सहाजणांवर ठपका ठेवला. आश्चर्यकारकरीत्या ज्यूरीने मात्र या सर्वांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. या सर्वजणांना अखिल मानवजातीचे शत्रू घोषित करूनही असा निकाल येणे ही मोठीच नामुष्कीची बाब होती.

ही नामुष्की टाळण्याकरिता बराच खल झाला. जेम्स हूब्लॉनच्या स्पॅनिश मोहिमेवरील दुसरा चार्ल्स या जहाजावर बंडाळी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर पुन्हा एकदा खटला भरण्यात आला. नव्याने झालेल्या सुनावणीत आठपैकी पाचजणांनी स्वत: निर्दोष असल्याचे प्रतिपादन केले. जॉन डॅन आणि फिलिप मिडलटन या दोघांना पुन्हा एकदा सुनावणीकरिता बोलावण्यात आले. दोघांनी आ कोरुना बंदरापासून गंज-इ-सवाईच्या लुटीपर्यंत आणि त्यानंतरही बहामा बेटांपर्यंतची पूर्ण कहाणी सांगितली. अखेरीस ही बंडाळी जाणूनबुजून स्वत:च्या मर्जीने केल्याचे, तसेच बहामातील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे दाखवल्यावर डॅन आणि मिडलटन वगळता उर्वरित सहा जण २५ नोव्हेंबर १६९६ रोजी फासावर गेले.

खुद्द एव्हरीचा मात्र त्यानंतर कधीच थांगपत्ता लागला नाही. त्याबद्दल त्यानंतर बरेच काही लिहून आले. त्याची जनमानसातील प्रतिमाही उंचावण्यात आली. राजसत्तेने राबवलेल्या जागतिक स्तरावरील शोधमोहिमेला हुलकावणी देऊन एव्हरी यशस्वीरीत्या निसटला.

संदर्भ :

  • Johnson, Steven, Enemy of All Mankind : A True Story of Piracy, Power and World’s First Global Manhunt, Penguin Random House, New York, USA, 2020.
  • Marley, David F. Pirates of the Americas, Santa Barbara, CA: ABC-CLIO, 2010.

                                                                                                                                                                             समीक्षक : प्रमोद जोगळेकर