महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध शहर. जुन्नर शहर तालुक्याचे ठिकाण असून ते पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या दक्षिण काठावर समुद्रसपाटीपासून सु. २००० फुट उंचीवर आहे. या तालुक्यातुन कुकडी, मीना आणि पुष्पावती या नद्या वाहतात. शहराच्या उत्तरेस लेण्याद्री डोंगररांग, पूर्वेस रुंद पठार, दक्षिणेस मानमोडी डोंगररांग, तर पश्चिमेस शिवनेरीचा गिरीदुर्ग आहे. प्राचीन काळी जुन्नर हे धार्मिक, राजकीय व आर्थिक असे फार महत्त्वाचे ठाणे होते. जुण्ण-जीर्णनगर-जुन्नीनगर-जुनेनगर-जुन्नर असे जुन्नरच्या नावात बदल होत गेले. जुन्नर परिसरात अनेक लेण्या खोदलेल्या असून हे शहर कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. जुन्नरचे ‘जुन्नीनगर’ किंवा ‘जीर्णनगर’ हे नाव आपल्याला सिंदवंशीय महासामंत ‘आदित्यवर्मन’ याने जुन्नर मधील मुक्कामी ६ मार्च ९६५ या दिवशी दिलेल्या एका ताम्रपटात कोरलेले दिसून येते. या परिसरावर इ. स. ९७३ पर्यंत राष्ट्रकूट राज्यकर्ते राज्य करत होते. यानंतर ११८४ पर्यंत पश्चिमी चालुक्यांचे राज्य होते. सिंद राज्यकर्त्यांचा इ. स. १२९४ मधील मंचर येथील एका विहिरीवर शिलालेख आहे. पुढे हा प्रदेश इ. स. १३०० पर्यंत देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता.

राष्ट्रकूट, चालुक्य राजवटीनंतर हा परिसर यादवांकडे गेला. यादवांच्या काळात जुन्नर परिसरात अनेक शिवमंदिरे बांधलेली असून त्यांतील चावंड जवळील कुकडेश्वर मंदीर, चावंड किल्ल्यावरील मंदीर व पुष्कर्णी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या शिवाय जुन्नर शहरातील तलाव, शिवनेरी किल्ल्यावरील गंगा-जमुना सारखी खांब टाकी ही जुन्नर आणि परिसरातील यादवकालीन बांधकामांची उदाहरणे आहेत. १२९६ मध्ये महाराष्ट्रातील यादव सत्तेवर उत्तरेकडून अल्लाउद्दीन खल्जी (खिलजी) याने स्वारी करून अखेर यादवांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला (१३०७-०८). खल्जीनंतर हा प्रदेश मुहम्मद तुघलकाच्या ताब्यात गेला. तुघलकांनंतर हा प्रदेश बहमनी सत्तेच्या हाती गेला. १४४३ मध्ये शिवनेरी व आजूबाजूचे सर्व किल्ले ‘मलिक-उल-तुजार’ या बहमनी सरदाराने स्थानिक सरदारांकडून जिंकून घेतले. अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनीच्या मृत्यूसमयी त्याने आपले राज्य चार भागांत विभागले (१३५८). यातला जुन्नर, दौलताबाद, बीड, चौल हा परिसर आपला पुतण्या मुहम्मद बिन अलिशाह याच्याकडे सोपवला. १४७० मध्ये अफानासी निकितिन हा रशियन प्रवासी चौल, पाली मार्गे १६ दिवसांचा प्रवास करून जुन्नरमध्ये आलेला होता. येथे तो पावसाळ्याचे चार महिने मुक्कामी होता. जुन्नरचे वर्णन करताना तो लिहितो की, ‘इथे सगळीकडे खूप पाणी आणि चिखल असून हे शहर एका खडकाळ बेटावर वसलेले आहे. येथे येण्यासाठी असलेला रस्ता खूप अरुंद असल्याने एकावेळी एकच माणूस येऊ शकतो. येथील माणसे घोड्यांना वाटाणे खायला घालतात आणि आपल्या जेवणात साखर व लोणी घालून बनवलेली खिचडी व भाज्या खातात’. पुढे तो लिहितो की, ‘इथे मसाले सोडून इतर वस्तू खूप महाग मिळतात. येथे येणारा माल हा समुद्री मार्गाने येत असल्या कारणांनी आमच्यासारख्या लोकांना खूप महाग मिळतो’. तत्कालीन जुन्नर कसे होते, हे समकालीन प्रवासवर्णनांतून दिसून येते.

बहमनी राज्य निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन १४८६ नंतर मलिक हसन निजाम उल्मुल्कचा मुलगा मलिक अहमद याने बहमनी राज्यकर्त्यांचा पक्ष सोडला. मलिक अहमदने बहमनी साम्राज्यातील किल्ले व आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेऊन जुन्नरमध्ये १४९० साली निजामशाहीची स्थापना केली. जुन्नरमध्येच मलिक अहमदने ‘निजामुल्मुक बहिरी’ असे नवे नाव धारण केले. १४९४ मध्ये अहमद निजामशाहाने आपली राजधानी अहमदनगर येथे हलवली. पुढे १७ व्या शतकाच्या सुरुवातीला निजामशाहीतील कर्तबगार मलिक अंबर याने मोगलांविरुद्धच्या लढ्यात जुन्नर ही राजधानी केली होती. पर्शियन इतिहासकार फेरीश्ता याने जुन्नरचा उल्लेख ‘जुनागड’ म्हणून केलेला आहे. तर शिवनेरीबद्दल लिहिताना, ‘मलिक अहमद याने डोंगरावर असलेल्या मजबूत अशा ‘सुनेरे’ किल्ल्यावर हल्ला केला’, असे लिहिले आहे. १५९५ मध्ये बहादुर निजामशहा (दुसरा) याने पुणे आणि सुपे यांखालील प्रदेश व त्यातील किल्ले मालोजी भोसले यांना जहागीर म्हणून दिले. मालोजी राजांच्या नंतर जुन्नर हे शहर शहाजीराजांच्या जहागिरीत होते. पुढे १६०५ मध्ये मोगली राज्यकर्त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केले. मलिक अंबरने मुर्तजा निजामशहा (दुसरा) यास गादीवर बसवले आणि जुन्नर शहर निजामशाहीच्या राजधानीचे मुख्य केंद्र बनवले. शहाजीराजे निजामशाही वाचवण्यासाठी निजामशाहीच्या वतीने मोगलांशी लढत होते. या धामधुमीत शहाजी महाराजांनी जिजाबाईंना १६२९ मध्ये जुन्नर शेजारील शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षिततेसाठी ठेवले होते.

बहमनी व निजामशाही कालखंडात जुन्नरमध्ये अनेक इमारतींची बांधकामे होऊन जुन्नरच्या वैभवात भर घालण्यात आली. जुन्नर शहरात मातीचा कोट बांधून संपूर्ण शहराच्या संरक्षणासाठी तटबंदी बांधण्यात आली. या तटबंदीत हत्ती वेस, पणसुंभा वेस, लाल वेस, फाटक वेस, ओव्हनबाजार वेस, आदितवार वेस, कथावार वेस, फाकीरपुरा वेस, ओतूर वेस, दिल्ली वेस, आगरवेस आणि नागझरी वेस अशा १२ वेशी बांधण्यात आल्या. याच बरोबर जुन्नरला पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्नरच्या दक्षिणेकडील बराबावडी, लाल वेशी जवळची कुंडलवाडी विहीर आणि ईशान्येकडील कावळ्याच्या विहिरीतून खापरी नळांद्वारे शहरात पाणी आणण्यात आले. कोटात हमामखाने बांधण्यात आले. सांप्रत या कोटाची आणि हमामखान्याची अवस्था अतिशय बिकट आहे. जुन्नर शहराच्या पूर्वेला काही अंतरावर हबशी माणसाने बांधलेली ‘हफ्झ’ किवा ‘हपुसबाग’ म्हणून ओळखली जाणारी इमारत आहे. याच इमारतीत शहाजहान, मुमताज महल तसेच ८-९ वर्षे वयाचा औरंगजेब व त्याची सर्व भावंडे काही काळ वास्तव्य केल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. या कोटाच्या पूर्वेस मुसलमानी अमदानीत बांधलेली जुम्मा मशीद, लाल वेशी जवळील रोशन मशीद, सौदागर गुंबज व टेकडीवरील इदगाह या त्या राजवटीची साक्ष देतात.

जुन्नर शहरात निजामशाही व मोगल कालखंडातील काही शिलालेख आहेत. या शिलालेखांचे वाचन इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी केलेले आहे. मुस्लीम इमारतींशिवाय जुन्नरमध्ये हिंदू व जैन मंदिरे आहेत. जुन्नर हे शहर हातकागदासाठी प्रसिद्ध आहे. येथील हाताने बनवलेला गुळगुळीत कागद बोरूने लिहिण्यास अतिशय उत्तम दर्जाचा असल्याचे उल्लेख पेशवाईतील कागदपत्रांत सापडतात. आजही जुन्नरमध्ये कागजीपुरा परिसरात तयार होणारा हातकागद प्रसिद्ध आहे.

संदर्भ :

  • Major, R. H. India in the Fifteen Century being A Collection of Narratives of Voyages to India,  Hakluyt Society, London, 1857.
  • कुंटे, भ. ग. गुलशन ए इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • खरे, ग. ह. ऐतिहासिक फार्सी साहित्य (खंड १), भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३४.
  • खरे, ग. ह. महाराष्ट्राचा इतिहास – मध्ययुगीन कालखंड भाग १, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  • देव, शां. भा. महाराष्ट्र व गोवे शिलालेख, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९२८.
  • भावे, वा. कृ. मुसलमानपूर्व महाराष्ट्र (भाग १), वरदा प्रकाशन, पुणे, १९४६.

समीक्षक : जयकुमार पाठक