मराठ्यांची दिल्लीतील नाणी : (इ. स. १७६०). पानिपतच्या तिसऱ्या लढाईपूर्वी मराठ्यांनी उत्तर भारतात पाडलेली नाणी. पानिपतच्या मोहिमेमध्ये मराठ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्यामुळे निरुपायाने सदाशिवराव भाऊंनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या दिवान-ई-खासचे चांदीचे छत उचकटून काढले (६ ऑगस्ट १७६०) व त्याचे सुमारे नऊ लाख चांदीचे रुपये पाडण्यात आले.

हे रुपये साधारणपणे महिनाभर पुरले व पुन्हा एकदा पैशांची चणचण भासू लागली. सदाशिवराव भाऊंच्या सांगण्याप्रमाणे अफगाणांत फूट पाडावी, याकरिता शुजाउद्दौल्याच्या प्रस्तावाप्रमाणे शाहजहान (तिसरा) याला पदच्युत करून त्या जागी शाह आलमला बादशाह घोषित केले. शाह आलम यावेळेस बिहारमध्ये असल्याने त्याचा मुलगा जवानबख्त याला वली अहद अर्थात अनभिषिक्त वारसदार घोषित केले व शाह आलमच्या नावाने नाणी पाडली. यानंतरही मराठ्यांच्या आर्थिक अडचणी संपल्या नाहीत व अखेरीस अफगाणांनी यमुना ओलांडली आणि मराठे-अफगाणांत पानिपतची तिसरी लढाई झाली (१४ जानेवारी १७६१).

शाहजहान तिसरा याच्या नावे मराठ्यांनी पाडलेला अर्धा रुपया.

सर्वसाधारणपणे या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी दिल्लीत दोन टप्प्यांत नाणी पाडली. शाहजहान (तिसरा) हा मराठ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर बादशाह असल्याने ६ ऑगस्ट १७६० ते १० ऑक्टोबर १७६० पर्यंत त्याच्या नावाची दिल्लीत मराठ्यांनी नाणी पाडली. शाहजहान (तिसरा) हा २९ नोव्हेंबर १७५९ पासून राज्यारूढ होता व एका वर्षाच्या आतच पदच्युत झाल्याने त्याच्या नाण्यांवरील जुलूस अर्थात राज्यारोहणाचे वर्ष हे ‘अहदʼ अर्थात १ हेच येते. तत्कालीन कित्येक मोगली नाण्यांवर जुलूस वर्षाखेरीज हिजरी वर्षही येते. हिजरी सन ११७३ हे वर्ष १३ ऑगस्ट १७६० रोजी संपल्याने शाहजहान (तिसरा) याची कारकिर्द ही हिजरी ११७३ व ११७४ या दोन्ही वर्षांत येते. त्याच्या नाण्यांवर दोन्ही हिजरी वर्षांचा उल्लेख येणे क्रमप्राप्त आहे. मराठ्यांनी दिल्ली घेतल्याची तारीख (३ ऑगस्ट १७६०) व हिजरी ११७४ वर्ष सुरू होण्याची तारीख (१३ ऑगस्ट) पाहता हिजरी वर्ष ११७४ चा उल्लेख असलेले शाहजहान (तिसरा) याच्या नावाचे दिल्ली टाकसाळीतील सर्व रुपये मराठ्यांनी पाडलेले असावेत. हिजरी वर्ष ११७३ नमूद असलेल्या सर्वच रुपयांबाबत असे खातरीलायकपणे सांगता येणार नाही, कारण मराठ्यांनी दिल्लीचा ताबा घेतल्यावर १० दिवसांतच ते वर्ष संपले.

हिजरी वर्ष ११७३ नमूद असलेल्या नाण्यांपैकी ज्या नाण्यांवरील आरेखनाचे हिजरी वर्ष ११७४ नमूद असलेल्या नाण्यांवरील आरेखनाशी साम्य आहे, ती नाणी मराठ्यांनी पाडली असावीत, असा संशोधकांचा तर्क आहे. शाहजहान (तिसरा) याच्या नावे मराठ्यांनी पाडलेले रुपये व मोहोरा ज्ञात आहेत. यांवर समोरच्या बाजूस ‘सिक्का मुबारक बादशाह गाझी शाह जहानʼ व मागच्या बाजूस ‘मानूस मैमनत सनह अहद जुलूस झर्ब दार-अल-खिलाफा शाहजहानाबादʼ असा फार्सी भाषेतील व लिपीतील मजकूर आहे. समोरच्या बाजूसच हिजरी वर्षही नमूद आहे. शाहजहान (तिसरा) याला पदच्युत करून त्याजागी शाह आलमला मोगल बादशाह केल्यानंतर मराठ्यांनी ऑक्टोबर १७६० पासून त्याच्या नावे दिल्लीत नाणी पाडली. या नाण्यांवर समोरच्या बाजूस ‘सिक्का झद बर हफ्त किश्वर बसाया फझल-इलाह हामी दीन-इ-मुहम्मद शाह आलम बादशाहʼ व मागील बाजूस ‘जुलूस मैमनत मालूस सनह अहद झर्ब दार-अल-खिलाफा शाहजहानाबादʼ असा मजकूर आहे. या नाण्यांवर जुलूस अर्थात राज्यारोहणाचे वर्ष ‘अहदʼ अर्थात १ आणि हिजरी वर्ष ११७४ असे नमूद आहे. समकालीन पत्रांत शाह आलमच्या नावचे रुपये व मोहोरा दोन्ही पाडल्याची नोंद आहे. वरील वैशिष्ट्ये असणारे रुपये व मोहोरा दोन्ही ज्ञात असून समकालीन पत्रांमधील पुराव्यांना नाणकशास्त्रीय पुराव्याचीही जोड मिळते. शाह आलमच्या नावे मराठ्यांनी पाडलेल्या नाण्यांवरील आरेखन हे शाहजहान (तिसरा) याच्या नावे पाडलेल्या हिजरी वर्ष ११७४ मधील नाण्यांच्या आरेखनासारखेच आहे.

दिल्लीखेरीज या मोहिमेत मराठ्यांनी अन्यत्र व खुद्द पानिपतातही अत्यावश्यक गरजेपोटी तात्पुरती टाकसाळ पाडून रुपये इ. पाडल्याचे समकालीन साधनांत ज्ञात आहे. सरहिंद, इटावा इत्यादी टाकसाळींची नाणी यांत ज्ञात आहेत.

संदर्भ :

  • Bhandare, Shailendra, ‘The Marathas in Delhi in the ‘Panipat’ Year: A Numismatic Insightʼ, Journal of the Oriental Numismatic Society, Vol. 209, pp.18-28, UK, 2011.
  • Maheshwari, K. K. & Wiggins, Kenneth W. Maratha Mints and Coinage, IIRNS, India,1989.
  • फाटक, न. र.; पगडी, सेतुमाधवराव, संपा., पानिपतचा संग्राम, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई, १९६१.
  • छायाचित्र सौजन्य : https://www.zeno.ru/

                                                                                                                                                                                         समीक्षक : संदीप परांजपे