(कॉमन सेस्बॅन). सपुष्प वनस्पतींपैकी एक अल्पायुषी, वेगाने वाढणारी शोभिवंत वनस्पती. शेवरी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्बॅनिया सेस्बॅन आहे. सेस्बॅनिया ईजिप्शियाका अशा नावानेही ती ओळखली जाते. अमेरिका खंड वगळता उष्ण प्रदेशांतील अनेक देशांत शेवरी आढळते. भारतात सपाट मैदानी प्रदेशात सु. १,२०० मी. उंचीपर्यत तिची लागवड केलेली आढळते. पानमळे, द्राक्षांच्या बागा, चहा, कॉफी, हळद, संत्रे यांची लागवड जेथे केली जाते अशा मळ्यांत उन्हापासून तसेच वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी शेवरीची लागवड करतात. कुंपणाकरिता तसेच भातशेतीच्या बांधावर शेवरी लावतात.
शेवरीचे झुडूप किंवा लहान वृक्ष ६–८ मी. उंच वाढतो. मुळे खूप खोलवर न जाता जमिनीलगत वाढलेली असतात. खोडाचा घेर सु. १५ सेंमी. असतो. मुख्य खोड एकच असते. परंतु मोकळ्या जागेत असल्यास खोडाच्या तळाकडून त्याला फांद्या फुटतात. त्यामुळे शेवरीचे झाड एखादे झुडूप असावे, असे दिसते. पाने संयुक्त, पिसांसारखी असून त्यांच्या तळाशी लहान उपांगे (उपपर्णे) असतात; पाने ७.५–१५ सेंमी. लांब असून पर्णिकांच्या ८–२७ जोड्या असतात. फुले विरळ मंजरीवर, पानांच्या बगलेत, साधारणपणे ऑगस्ट–डिसेंबर या महिन्यात येतात; फुले ८–१०, द्विलिंगी, पतंगरूपी, मध्यम आकाराची, पिवळी असून पाकळ्यांवर जांभळ्या किंवा बदामी रंगाच्या छटा असतात. फुलांना गंध असतो, परंतु मोहक नसतो. शेंगा सरळ किंवा पिळदार, गाठाळ आणि टोकदार असून त्यात १०–५० बिया असतात. शेंगेतील बिया पातळ पापुद्र्याने अलग झालेल्या असतात.
आयुर्वेदानुसार शेवरीच्या बिया उत्तेजक, आर्तवजनक आणि स्तंभक असून बियांपासून बनवलेले मलम त्वचाविकारावर उपयुक्त आहे. शेवरीचा पाला, फुले आणि बिया जनावरांना खाद्य म्हणून देतात. मनुष्यासाठी ताज्या बिया विषारी असतात; त्या तीन दिवस पाण्यात भिजवून नंतर त्यांचा वापर करतात. सालीपासून तंतू काढून दोर बनवितात. लाकूड पांढरे व नरम असून त्याचा जळण आणि कोळसा यांसाठी उपयोग करतात. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच हिरवळीचे खत म्हणून शेवरीचा पाला वापरतात. गुरे आणि शेळ्या-मेंढ्या यांसाठी शेवरीची पाने प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून देतात. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी शेवरी उपयुक्त असते. दुष्काळासारख्या स्थितीत ती तग धरून राहते. पर्यावरणासाठी ती बहुपयोगी असल्यामुळे आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांत तिची लागवड करतात.