मेक्सिको खोर्यातील ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता व पौरोहित्य राजा. केत्सालकोआत्ल असाही त्याचा उच्चार होतो. त्याच्यासंबंधी पुरातनकालीन मिथ्यकथा, आख्यायिका, दंतकथा आणि वदंता यांमधून वेगवेगळे पाठभेद व अर्थकथन आढळते. पुरातन वदंतेनुसार क्वेत्झलकोएत्ल हा ओमेतेकुहत्ली व ओमेतिकुहात्ल या विश्वनिर्मात्या दांपत्याचा पुत्र मानला जातो.
त्याचे ॲझटेक नाव कोलंबियन-पूर्व देवता आणि दंतकथात्मक मानवी वीर पुरुष असा भिन्न अर्थ दर्शविते. नावातल भाषेत या पवित्रदेवतेच्या नावाची फोड श्लेषात्मक केली असून ‘क्वेत्झल’ म्हणजे आकाशगामी पक्षी आणि ‘कोएत्ल’ म्हणजे सर्प किंवा जुळे असा अर्थ दिला आहे. त्याचा मतितार्थ असा की, पंखधारी सर्पाकृती पक्षी किंवा बहुमोल जुळे होय. इतर मेसोअमेरिकन भाषांत अशी समानार्थी अनेक नावे आढळतात. ॲझटेक संस्कृतीतील पुरातन पराक्रमी पुरुषांच्या कथांत क्वेत्झलकोएत्ल हा एक चेटक्या (जादुगार) पुरोहित राजा होता आणि त्याचे अधिराज्य तोस्तेकांची राजधानी असलेल्या तुला ह्या नगरराज्यावर होते. किंबहुना तुलाची रचना त्यानेच इ.स. ११ व्या शतकात केली होती. तो एक सुसंस्कृत, कर्तृत्ववान, सर्जनशील प्रभावी राजा असून तत्कालीन देवतासमूहातील त्याचे स्थान उच्चप्रतीचे होते. राजा म्हणून त्याची कारकीर्द कल्याणकारी व शांततेत गेली. त्याने कॅलेंडर व अनेक ग्रंथांचा शोध लावला. तो पुरोहितवर्गाचा आश्रयदाता आणि सुर्वणकार, कारागीर, लोहार आदींचा पोषिंदा होता. त्याने कलांना उत्तेजन दिले. कृषिक्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. त्याची प्रजा श्रीमंत व बलशाली होती. देवाच्या रूपात तो कालावर नियंत्रण ठेवी. मक्याच्या वाढीसाठी त्याने हवेवर नियंत्रण ठेवले; कारण तो उन्हाळी वार्याचाही देव होता. शिवाय दैनंदिन रात्र आणि दिवस यांवर त्याची हुकमत होती. पहिल्या प्रलय काळानंतर कुत्र्याचे शीर्ष असलेल्या झालोत्ल या देवाबरोबर तो नरकात गेला आणि त्याने मानवी हाडांवर स्वत:चे रक्त शिंपडून मानवाची निर्मिती केली. तो देवांना पक्षी, सर्प आणि फुलपाखरे यांचा बळी देई; मात्र त्याने कधीही मानव बळी दिला नाही. परंतु जेव्हा रजनीचा आकाशस्थ देव तेझ्कात्लिपोका याने त्याला काळीजादूद्वारे तुलातून हद्दपार केले, तेव्हा तो आल्हाददायक दैवी समुद्राच्या काठी (अटलांटिक महासागर) भ्रमंती करू लागला आणि त्यानंतर त्याने आत्मदहन केले. त्यातून व्हेनिस हा दिवस-रात्र यांवर नियंत्रण ठेवणारा तारा उदयास आला, तर दुसर्या एका दंतकथेनुसार तो सर्पांच्या पाडावात (नावेत) बसून पूर्व क्षितिजापलीकडे अदृश्य झाला.
प्राचीन कथांत त्याचे दोन रूपे वर्णिलेली आढळतात. त्यांपैकी पहिले त्याचे मूळ दैवी रूप पंखधारी सर्पाकृती‒रॅटल स्नेक‒असून त्याची पिसे क्वेत्झल या सुरेख पक्षाची होती, तर मानवी रूपात त्याने पक्षाच्या चोचीचा मुखवटा धारण केला असून तो हवा फुंकत आहे. त्याचे शीर्ष म्हणजे एक कवटी असून ते पुनर्जन्माचे हाड होय. तो गौरवर्णी, मोठे कपाळ व डोळे असणारा, दाढी असणारा, आखूड लुंगी नेसलेला असा आहे. त्या मूर्तीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटक आढळतात. उदा., त्याचे छातीचे कवच (झंझावती वादळाचे चिन्ह), त्याची जादुगारसदृश शंकूसारखी हॅट आणि समुद्र शिंपल्यासारखी कर्णभूषणे (त्याची पाताळ सहल द्योतक) आणि पक्षाचा मुखवटा (हवेचा देव द्योतक). नोव्हाप्रमाणे तो चंगळवादी झाल्याचा उल्लेख त्याने मद्यार्काचा, विशेषत: मॅगे बिअर (पल्क-Pulque) च्या शोधावरून दिसते. हे मद्यार्क प्राशन करून त्याने मद्यधुंद अवस्थेत अनेक अनैतिक कृत्ये केली. त्यांत त्याने स्वत:च्या बहिणीबरोबर संभोगसुख घेतले. पुढे त्याचा त्याला पश्चाताप झाला. तेव्हा त्याने आत्मदहन केले. तेव्हा त्याच्या शरीराचे रूपांतर आकाशस्थ तार्यात झाले, तर काही या आख्यायिकांनुसार त्याला अन्य देवांनी नरकात (मृतात्म्यांच्या जगात) हद्दपार केले.
आधुनिक मेक्सिकन समाज, विशेषत: तेथील अभिजन वर्ग, क्वेत्झलकोएत्लला राष्ट्रीय संस्कृतीचा प्रणेता मानतात. तेथील धर्मातील समाजाचे क्वेत्झलकोएत्ल हे समूहचिन्ह (सामुदायिक प्रतीक) असून पवित्र ऐतिहासिक घटनाचे ते प्रतीक होय. क्वेत्झलकोएत्लविषयीच्या प्राचीन कथा किंवा पुरातन वाङ्मय आणि तूला नगरी यांची तुलना होमरच्या ग्रीक महाकाव्याशी आणि ट्राय शहराशी केली जाते. स्पॅनिश वसाहतकाली पुराभिलेखागारात या प्राचीन कथांचे उपलब्ध तुकडे (अर्धवट भाग-Fragments) संग्रहित व संरक्षित केले आहेत. त्याला काही प्रमाणात पुरातत्त्वीय संशोधनाद्वारे उपलब्ध झालेल्या पुराव्यांची साथ लाभली असून ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्यास मदत होते.
स्पॅनिश वसाहतकारांनी मेक्सिकोवर इ.स. १५१९ मध्ये आक्रमण करून तो प्रदेश पादाक्रांत केला. तेव्हा तेथील जनतेला क्वेत्झलकोएत्ल मृत्यूलोकातून पृथ्वीवर अवतरला असे वाटले; पण तो त्यांचा भ्रमनिरास होता. मात्र वसाहतकारांनी त्याच्या पूर्वायुष्याच्या कथा, दंतकथा, वदंता यांचा साकल्याने विचार करून क्वेत्झलकोएत्लचे रूप म्हणजे येशू ख्रिस्त किंवा सेंट टॉमसच होय, असे मानले. त्यांनी स्पॅनिश-पूर्व काळातील संस्कृतीतील ख्रिस्ती धार्मिक मिथ्यकाशी संगती लावली. पुढे विसाव्या शतकात मेक्सिकन क्रांतीच्या कालखंडात क्वेत्झलकोएत्ल हा मेक्सिकन संस्कृतीचा व इतिहासाचा वारसदार ठरला. कलेच्या क्षेत्रात त्याला प्रसिद्धी प्राप्त झाली; तद्वतच समान दिवस-रात्र (सप्टेंबर २१ आणि डिसेंबर २१/२२) काळात (दिवशी) केल्या जाणार्या धर्मविधीत आणि ईस्टर (पुनरुत्थानाचा सण) उत्सवात त्याची भूमिका सन्मान्य मानली जाते.
ॲझटेक वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहे. ॲझटेक लोकांच्या कलेत सर्पाकृतीस विशेष महत्त्व असून त्यांच्या वास्तूत सर्पाकृती स्तंभ आढळतात. त्याचे सर्वांत प्रसिद्ध शिल्प म्हणजे त्याचे कोरलेले भव्य दगडी पंचाग होय. या कला संभारात क्वेत्झलकोएत्लची एक उत्तम वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती (पुतळा) आहे. त्यात त्याचे शीर्ष (डोके) आणि हात पुरुषाचे (मानवी) असून शरीर आणि शेपूट पंखधारी सर्पाची आहे.
संदर्भ :
- Albert, Revie, Native Religion of Mexico and Peru, New York, 1884.
- Brundage, Burr C. The Fifth Sun : Aztec Gods, Aztec World, Austin, 1979.
- Grahamme, Hancock, Finger-prints of God, London, 1955.
- Louise, Spence, The Mythology of Ancient Mexico and Peru, London, 1907.
समीक्षक : सिंधू डांगे