देशपांडे, वामनराव हरी : (२७ जुलै १९०७ – ७ फेब्रुवारी १९९०). महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक. त्यांचा जन्म भोर येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव हरी सखाराम देशपांडे. त्यांचे बालपण शिरवळ (जि. सातारा) येथे गेले. नंतर त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे थोरले बंधू पांडुरंगशास्त्री (पंडितराव) यांचे त्यांना सर्वच बाबतींत प्रोत्साहन होते. प्रतिकूल परिस्थितीत शिकतशिकत वामनराव जी.डी.ए., एफ.सी.ए आदी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या वर्षी एफ.सी.ए परीक्षेचे दोन्ही भाग एकाच वेळी पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय होते.

वामनरावांना लहानपणापासून संगीताची ओढ होती. ग्वाल्हेरगायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. मॅट्रिकनंतर मुंबई येथे त्यांच्या गायकीचे शिक्षण सुरू झाले. शंकरराव कुलकर्णी व यादवराव जोशी यांची तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर १९२८ मध्ये ते नोकरीच्या निमित्ताने पुन्हा पुण्यास आले व किराणाघराण्याचे गायक सुरेशबाबू माने यांच्या संपर्कात आले. सुरेशबाबूंची उत्तम तालीम आणि जिव्हाळ्याचा सहवास त्यांना लाभला. तसेच त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्या तालमीचाही प्रभाव त्यांच्यावर पडला. वामनराव हे सुरेशबाबूंपेक्षा फक्त पाच वर्षांनी लहान होते; पण दोघांचा अकृत्रिम आणि मायेचा संबंध निर्माण झाला. ही तालीम सुमारे दहा वर्षे चालली. सुरेशबाबू शिकवतही उत्तम; पण पुढे आपल्या अपेक्षेनुसार ही गायकी आपल्या गळ्यावर चढत नाही, असे वामनरावांना वाटू लागले आणि त्यांना विफलता येऊ लागली. या अवस्थेतून त्यांना विख्यात हार्मोनियमवादक गोविंदराव टेंबे यांनी बाहेर काढले आणि जयपूरघराण्याचे गायक नथ्थनखाँ यांच्याशी त्यांची भेट घडवली. या वेगळ्या गायकीचीही  वामनरावांना गोडी वाटू लागली. त्यांचे गंडाबंधनदेखील झाले आणि त्यानंतर नथ्थनखाँच्या निधनापर्यंत सुमारे सहा वर्षे ही तालीम चालली. सुरेशबाबूंनी वामनरावांना सुरांचा साक्षात्कार घडविला, तर नत्थनखाँ यांनी ताललयीची अनुभूती. त्यानंतर त्यांचे शिक्षण मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे सुरू झाले, ते अखेरपर्यंत. दोन्ही घरांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. वामनरावांनी संगीताची उपासना अगदी मनापासून केली. गोविंदरावांचे त्यांना मार्गदर्शन होतेच. त्यांचा रियाझही भरपूर होता. तरीही व्यवसायाच्या दृष्टीने विचार करून त्यांनी जाहीर मैफली न करण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ तीस वर्षे त्यांनी सनदी लेखापाल (Chartered Accountant) म्हणून काम केले. मे. बाटलीबॉय अँड पुरोहित चार्टर्ड अकौंटंट्स, मुंबई येथे ते सनदी लेखापाल व ज्येष्ठ भागीदार होते.

वामनरावांचे लेखन विचारसंपन्न व दर्जेदार आहे. ते कसदार आणि माहितीपूर्ण आहेच; पण त्याची भाषादेखील स्पष्ट व प्रासादिक आहे. गायनाच्या घराण्यांची प्रदीर्घ चर्चा त्यांनी सुरू केली, असे मत त्यावेळी व्यक्त होत असे. घरंदाज गायकी  (१९६१), आलापिनी (१९७९), एका गायकाचा ताळेबंद,  Maharashtra’s Contribution to Music (१९७२) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप गाजली. त्यांच्या काही लिखाणावर आक्षेपही घेण्यात आले. त्यांच्या घरंदाज गायकी  या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद इंडियन म्युझिकल ट्रॅडिशन्स (१९७३) या नावाने झाला असून हिंदी अनुवाद घराणेदार गायकी  या नावाने झाला आहे. त्यांच्या या ग्रंथास संगीतातील उत्कृष्ट समीक्षाग्रंथ म्हणून १९६२ या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा व १९६१ –६९ या कालावधीतील संगीतक्षेत्रातील उत्कृष्ट मराठी ग्रंथ म्हणून संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार लाभला. या ग्रंथामध्ये सुरुवातीपासूनचे रागदारी संगीत, त्यातील घराणी, त्या-त्या घराण्याचे वैशिष्ट्य आणि हार्मनी व मेलडी यांचा ऊहापोह केलेला आहे. त्यांच्या आलापिनी  या ग्रंथाचा Between two tanpuras (१९८९) या नावाने इंग्रजी अनुवाद झाला असून या ग्रंथासही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे. त्यांच्या Maharashtra’s Contribution to Music  या ग्रंथाचा मराठी अनुवाद त्यांचे बंधू श्रीधर हरी देशपांडे यांनी महाराष्ट्राचे संगीतातील कार्य (१९७४) ह्या नावाने केला आहे. गोविंदराव टेंबे ह्यांच्या माझा संगीत व्यासंग (१९८४)  ह्या ग्रंथाचे संपादन वामनरावांनी केले आहे.

वामनराव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कलाशाखेचे व सेंट्रल ऑडिशन बोर्ड ऑफ ऑल इंडिया रेडिओचे सदस्य होते. देवधर्स स्कूल, आर्य संगीत मंडळ आदींचे ते पदाधिकारी होते. मुंबई विद्यापीठात संगीत विभाग सुरू करण्यात पु.ल.देशपांडे, प्रो.ढेकणे यांच्या बरोबरीने वामनरावांचाही मोलाचा वाटा होता.

त्यांचे पुत्र सत्यशील देशपांडे हेदेखील नावाजलेले गायक आणि संगीतज्ञ आहेत.

वामनरावांचे पुणे येथे निधन झाले.

समीक्षक – मनीषा पोळ

#किराणा घराणे #ग्वाल्हेर घराणे

प्रतिक्रिया व्यक्त करा