(सेना). एक औषधी वनस्पती. सोनामुखी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना ॲलेक्झांड्रिना आहे. सेना प्रजातीत सु. ३०० जाती असाव्यात, असा अंदाज आहे. त्यांपैकी सु. ५० जाती लागवडीखाली आहेत. सेना ॲलेक्झांड्रिना ही या प्रजातीतील प्रातिनिधिक जाती असून टाकळा ही वनस्पतीही सेना प्रजातीतील आहे. सोनामुखी मूळची ईजिप्तमधील असून तेथे आणि सुदान, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, भारत इ. देशांत तिची व्यापारी लागवड केली जाते. भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांत तिची लागवड होते.
सोनामुखी हे बहुवर्षायू झुडूप ५०–१०० सेंमी.पर्यंत वाढते. क्वचितच ते २-३ मी.पर्यंत वाढलेले दिसते. खोड फिकट हिरवे असून उभे वाढते. पाने संयुक्त, पिसांसारखी असून पानांस ५–८ पर्णिकांच्या जोड्या असतात. पर्णिकांची टोके टोकदार असतात. मध्यशीर पर्णिकांना तळाशी दोन समान भागात विभागते. फुले पिवळी, मोठी आणि स्तबकात येत असून कालांतराने करडी होतात. शेंगा चपट्या, शिंगासारख्या असून त्यात सहा बिया असतात.
सोनामुखीची वाळलेली पाने तसेच शेंगा औषधांमध्ये वापरतात. पानांमध्ये सेनोसाईड हा औषधी घटक असतो. सोनामुखीची चव कडवट व चिकट असून त्याचा उपयोग रेचक म्हणून करतात. अपचन, अजीर्ण यांमुळे झालेल्या पोटदुखीवर सोनामुखीची पाने, हिरडा, बेहडा, आवळकाठी व सैंधवचूर्ण यांचे मिश्रण घेतल्यास कोठा साफ राहतो. पचनशक्ती व भूक वाढविणे, चेहऱ्यावरील मुरूम, पुरळ दूर करणे यांसाठी सोनामुखीचा वापर केला जातो. कवकनाशक म्हणूनदेखील ती वापरली जाते.